राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) काश्मीरमधून एकास अटक केली. लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन ही कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी एटीएसने या प्रकरणी पुण्यातील दापोडीतील एका तरुणासह तिघांना अटक केली होती. हे अरोपी देशभरात घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असल्याची माहिती राज्य दहशतवाद विरोधी पथकाने दिली आहे.

तिघांची चौकशी

युसुफ (रा. जम्मू काश्मीर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या अगोदर एटीएसने लष्कर ए तोयबाशी संबंध असल्याच्या संशयावरून जुनैद महंमद (वय २८, सध्या रा. दापोडी, मूळ रा. गोंधनपूर, ता. खामगाव, जि. बुलढाणा) इनामुल हक आणि साथीदार आफताब हुसेन अब्दुल जब्बार शाह (वय २८, रा. किश्तवाड, जम्मू-काश्मीर) यांना अटक केली आहे. जुनैद, आफताब , इनमुल यांची चौकशी करण्यात आली. चौकशीत युसुफ लष्कर ए तोयबाच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

लष्कर ए तोयबाच्या सदस्यांच्या संपर्कात

सोमवारी महाराष्ट्र एटीएसच्या अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांनी उत्तर प्रदेशमधून इनामुल हक याला अटक केली आहे. पाकिस्तानस्थित एलईटी आणि कट्टरपंथी तरुणांशी संबंध असल्याबद्दल उत्तर प्रदेश एटीएसने हकला यावर्षी मार्चमध्ये अटक केली होती. तो यूपीमधील तुरुंगात होता, तेथून महाराष्ट्र एटीएसने त्याला ताब्यात घेतले. तसेच जुनैद मूळचा महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव गावचा रहिवासी आहे. तो गेल्या काही वर्षांपासून पुण्यात काम करत होता. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लष्कर ए तोयबाच्या दहशतवादी नेटवर्कच्या काही सक्रिय सदस्यांच्या संपर्कात होता.

Story img Loader