Maharashtra Budget Session 2025 Live Updates, 04 March 2025 : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ या दिवशी हत्या करण्यात आली. या घटनेचे तीव्र पडसाद हिवाळी अधिवेशनातही उमटले. तर आता अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या एक दिवस आधी संतोष देशमुख यांची हत्या कशी करण्यात आली? यासंदर्भातले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये क्रौर्यालाही लाज वाटेल असं क्रौर्य आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड आहे त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारुन धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे यासाठी विरोधक आग्रही होते. आता हे फोटो व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी आधी धनंजय मुंडेंचा राजीनाम घ्या तोपर्यंत कामकाज चालूच देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. भाजपाचे आमदार सुरेश धस यांनीही माध्यमांना प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की जे फोटो समोर आले आहेत ते कृत्य जल्लाद आणि हैवान यांनाही लाजवणारं आहे. दरम्यान आज अधिवेशनात संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुद्दा पुन्हा उपस्थित होतो आहे. तर मस्साजोग या ठिकाणी मनोज जरांगेंनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली. त्यावेळी धनंजय देशमुख यांना अश्रू अनावर झाले. या संदर्भातल्या सगळ्या बातम्या आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार आहोत.
Maharashtra Budget Session 2025 Live, Day 2
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया
धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला आहे हे मला आत्ताच समजलं आहे. यासंदर्भात आता पुढची जी काही भूमिका पक्षाचे अध्यक्ष अजित पवार लवकरच जाहीर करतील. पक्षाची भूमिका हीच होती की कुठल्याही बेकायदेशीर कृत्याला पाठिशी घालणार नाही. आमची भूमिका न्यायाचीच राहिल. कुठल्याही चुकीच्या कृत्याला आम्ही समर्थन देणार नाही. धनंजय मुंडे यांनी नैतिकतेला धरुन राजीनामा दिला आहे, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
सरकार बरखास्त केलं पाहिजे, आदित्य ठाकरेंची मागणी
हे सरकार बरखास्तच केलं पाहिजे. कारण या सरकारला संवेदना उरलेल्या नाहीत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या घरी गेले होते आणि नंतर आजचा राजीनामा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना का बोलवून घेतलं नाही? असाही सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला आहे.
धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असून मी तो स्वीकारला आहे-मुख्यमंत्री
राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे, मी तो राजीनामा स्वीकारला आहे आणि तो राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बाब स्पष्ट केली.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी विरोधकांचं पायऱ्यांवर आंदोलन
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. आजच धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पाहिजे अशी मागणी करत विरोधकांनी पायऱ्यांवर आंदोलन केलं. जितेंद्र आव्हाड आज प्रतीकात्मक दगड घेऊन विधानभवनात आले. हे सरकार पाषाणहृदयी आहे म्हणून मी हे घेऊन आलो आहे असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे.
धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या अन्यथा सदन चालू देणार नाही-रोहीत पवार
गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी संतोष देशमुख यांची हत्या केली. त्यानंतर त्यांच्या शरीरावर लघुशंका केली. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण दोन महिन्यांपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे हे फोटो आले असावेत. तरीही धाडसी निर्णय घ्यावा असं तुम्हाला वाटत नसेल तर तुम्हाला मन आहे का? असा प्रश्न आम्हाला पडला. धनंजय मुंडेंचा राजीनामा हा आजच्या आज घेतलाच पाहिजे. वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा खास माणूस आहे हे जगाला माहीत आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडची पाठराखण करु नका हे मला सांगायचं आहे असं रोहीत पवार म्हणाले.
अजित पवार यांनी अधिवेशन सुरु होण्यापूर्वी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे. पंकजा मुंडेंनाही माझी विनंती आहे की मीडियासमोर या, तुमची भूमिका मांडा. आज जर थोरले मुंडे म्हणजेच गोपीनाथ मुंडे असते तर धनंजय मुंडेंना चाबकाने फोडून काढलं असतं आणि राजीनामा द्यायला लावला असता. आज सरकारने जर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही कामकाज चालू देणार नाही. महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस या सरकारला माफ करणार नाही. संतोष देशमुख प्रकरणाला काही लोक जातीय रंग देत आहेत. पण ते कुठल्याही जातीचे किंवा धर्माचे असते तरीही महाराष्ट्र असाच पेटून उठला असता. कारण अत्यंत क्रूर पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली.
संतोष देशमुख हत्या, वाल्मीक कराडकडून खंडणी प्रकरणामध्ये दोषारोपपत्र दाखल ( संग्रहित छायाचित्र )
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ या दिवशी हत्या करण्यात आली. या घटनेचे तीव्र पडसाद हिवाळी अधिवेशनातही उमटले. तर आता अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या एक दिवस आधी संतोष देशमुख यांची हत्या कशी करण्यात आली? यासंदर्भातले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.