Maharashtra Budget Session 2025 Live Updates, 06 March 2025: विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. पहिल्या दिवशी राज्यपालांचे अभिभाषण आणि शोकप्रस्ताव झाल्यानंतर अधिवेशन स्थगित झाले होते. नंतरचे दोन दिवस मात्र धनंजय मुंडेंचा राजीनामा, राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांनी केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान, तसेच समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचा केलेला उदोउदो या विषयांवर गोंधळ झालेला पाहायला मिळाला. आज दोन्ही सभागृहाचे कामकाज सुरळीत सुरू आहे. मात्र काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेबाबत केलेल्या विधानामुळे विधानसभेत गोंधळ झाला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले.
Maharashtra Budget Session 2025 Live, Day 4
Maharashtra Assembly Budget Session 2025 LIVE: "देवेंद्रजी म्हणजे माणुसकी, देवेंद्रजी म्हणजे...", भाजपा आमदाराचे काव्य
राज्यपालांच्या अभिभाषणावर आज विधानपरिषद सभागृहात चर्चा सुरू आहे. भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी राज्यपालांच्या भाषणाचे अभिनंदन करत असताना सरकारने केलेल्या चांगल्या कामांची यादी सांगितली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत असताना प्रसाद लाड यांनी एक कविता सभागृहाला ऐकवली.
Maharashtra Assembly Budget Session 2025 LIVE: ‘जलसंपदा विभाग मोहित कंबोजच्या इशाऱ्यावर चालतो’, अंबादास दानवेंचा आरोप
जलसंपदा विभाग ग्रामीण भागासाठी अतिशय महत्त्वाचा असा विभाग आहे. या विभागातील अधिकारी मोहित कंबोज यांच्या इशाऱ्यावर काम करत आहे, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. जलसंपदा विभागाचे अधिकारी मोहित कंबोजने सांगितल्याशिवाय पाणीही पित नाहीत. कंबोजशिवाय या खात्यात पानही हलत नाही. ग्रामीण भागाचे निर्णय घेणारा मोहित कंबोज कोण आहे? असे प्रश्न अंबादास दानवे यांनी उपस्थित केले.
Maharashtra Budget Session 2025 Live: 'मुंबईचं गुजरातीकरण करण्याचा डाव', शिवसेना (ठाकरे) पक्षाची टीका; सरकारने चर्चा फेटाळली
मुंबईत राहणाऱ्याला मराठी भाषा आलीच पाहिजे असे काही नाही, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी मांडली होती. याचे तीव्र पडसाद विधानपरिषदेत उमटले. शिवसेना (ठाकरे) पक्षाने या विषयावर स्थगन प्रस्ताव मांडला. आमदार अनिल परब म्हणाले, मुंबईचे तुकडे पाडण्याचा डाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आखला जात आहे. मुंबई तोडून ती गुजरातमध्ये घेऊन जाण्याचा कट रचला जात आहे. सरकारने भैयाजी जोशी यांचा निषेध केला पाहीजे, अशी मागणी अनिल परब यांनी केली.
Maharashtra Budget Session 2025 Live: घाटकोपरची भाषा गुजराती? मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
“मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही. इथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. जसे की मुंबईतील घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे”, असे वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात केले होते. यावर विधानसभेत गदारोळ झाला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारतर्फे उत्तर दिले आहे. मुंबई आणि महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठीच आहे, असे ते म्हणाले. आम्ही प्रत्येक भाषेचा सन्मान करतो. पण मराठीला डावलता कामा नये, असेही ते म्हणाले.
रोहित पवार विरुद्ध नितेश राणे; विधानसभेत खडाजंगी! शरद पवारांना टार्गेट करताच भडकले आमदार