पक्ष बदलले गेले तरी चेहरे मात्र परस्पर विरोधकांचेच!
मोहनीराज लहाडे,नगर
कोणत्याही राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी अद्यापि जिल्ह्य़ातील कोणाचीही उमेदवारी जाहीर केली नसली, जागा वाटपाचे चित्र स्पष्ट झाले नसले तरी, भाजप-शिवसेना यांची युती होणारी की नाही, याचा स्पष्ट खुलासा झालेला नसला तरीही या सर्व पक्षांकडील प्रमुख इच्छुकांची नावे पाहता जिल्ह्य़ातील बाराही मतदारसंघांपैकी बहुसंख्य ठिकाणी पारंपरिक विरोधकांतच लढती होण्याची शक्यता अधिक आहे. पारंपरिक विरोधकांनी पक्ष बदलले असले तरी लढती मात्र नेहमीच्याच होण्याची दाट शक्यता आहे. अपवादात्मक ठिकाणीच्या लढतीतच नवे चेहरे दिसतील.
काँग्रेस-राष्ट्रवादीचे जागा वाटपाचे सूत्र ठरले असले तरी अद्याप जिल्ह्य़ातील कोणत्या जागा कोणाकडे याची माहिती जाहीर झालेली नाही. तसेच भाजप-शिवसेना यांच्यातील युतीच्या निर्णयाकडे प्रमुख लक्ष लागलेले आहे. युती झाली किंवा नाही, तरीही पारंपरिक लढतीच्या चित्रात फारसा फरक पडणार नाही. केवळ या इच्छुकांचे पक्ष बदललेले असतील. गेल्या दोन-तीन निवडणुकीत जे प्रमुख विजयी व पराभूत उमेदवार होते, तेच यंदाही कायम राहण्याची शक्यता अधिक आहे.
नगर शहरात राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप, शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड हे लढतीतील प्रमुख दावेदार असू शकतात. आ. जगताप यांच्या भूमिकेबद्दल अद्यापि संभ्रमावस्था आहे. युती होते की नाही, यावर त्यांचा पक्ष ठरण्याची शक्यता अधिक आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीचे उमेदवार माजी महापौर अभिषेक कळमकर व भाजपचे उमेदवार दिलीप गांधी किंवा महापौर बाबासाहेब वाकळे असण्याची शक्यता आहे. श्रीगोंद्यात राष्ट्रवादीचे आ. राहुल जगताप व भाजपचे बबनराव पाचपुते हेच पारंपरिक विरोधक समारोसमोर असू शकतात. तेथे काँग्रेसचे राजेंद्र नागवडे यांची भूमिका महत्त्वाची राहील. युतीच्या निर्णयानुसार त्यांची भूमिका राहील. पारनेरमध्ये शिवसेनेचे आ. विजय औटी यांच्याविरोधात राष्ट्रवादीने नीलेश लंके हा नवा चेहरा समोर आणला आहे. लंके हे सेनेतूनच राष्ट्रवादीत गेले आहेत. तेथे युतीच्या निर्णयानुसार राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत असलेले सुजित झावरे लढतीत उतरण्याची शक्यता आहे.
राहुरीत भाजपचे आ. शिवाजी कर्डिले व पारंपरिक विरोधक राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे लढतीत असू शकतात, प्राजक्त यांचा चेहरा निवडणुकीसाठी नवीन असला तरी तनपुरे कुटुंब व कर्डिले पारंपरिक विरोधक आहेत. तेथे शिवसेनेकडून अनेक इच्छुक आहेत. शेवगावमध्ये भाजपच्या मोनिका राजळे यांच्यापुढे राष्ट्रवादीकडून प्रताप ढाकणे यांचा नवा पर्याय समोर आणला आहे. तेथील राजळेंचे पारंपरिक विरोधक चंद्रशेखर घुले व नरेंद्र घुले यांनीच हा पर्याय दिल्याचे सांगितले जाते. नेवाश्यात भाजपचे आ. बाळासाहेब मुरकुटे व क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे शंकरराव गडाख यांच्यातच पुन्हा लढत होईल, मात्र जोडीला राष्ट्रवादीचे विठ्ठलराव लंघे असतील. कोपरगावमध्ये काळे-कोल्हेंचीच पारंपरिक लढत पुढे सुरु राहण्याची शक्यता आहे. युतीच्या निर्णयानुसार तेथे आशुतोष काळे यांच्या भूमिकेत बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते. या पारंपरिक लढतीत नगराध्यक्ष वहाडणे व राजेश परजणे कसा रंग भरतात, याकडे लक्ष राहील. अकोल्यात भाजपमध्ये प्रवेश केलेले वैभव पिचड यांच्या विरोधात एकच उमेदवार देण्याचे प्रयत्न असले तरी राष्ट्रवादीकडून पिचड यांचे पारंपरिक विरोधक डॉ. किरण लहामटे की अशोक भांगरे असतील, याचा फैसला पक्ष सर्वेक्षणाच्या आधारे ठरवणार आहे.
थोरात व विखे यांच्याविरोधात कोण?
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात संगमनेरमधून भाजपचा कोण उमेदवार असेल, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात ताणली गेली आहे. उमेदवार कोणीही असला तरी लढत थोरात विरुद्ध विखे अशीच होईल. जागा सेनेकडे गेली तरी त्याला पाठबळ विखेंचेच लाभणार आहे, अन्यथा भाजपचा उमेदवार विखे कुटुंबातील असू शकतो. श्रीरामपूरमध्येही शिवसेनेत प्रवेश केलेल्या भाऊसाहेब कांबळे यांच्या विरोधात कोण, हा प्रश्न अनुत्तीर्ण आहे. कर्जत-जामखेडमध्ये पालकमंत्री राम शिंदे यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून रोहित पवार हा नवा चेहरा असेल, रोहित हे खा. शरद पवार यांचे नातू आहेत. शिर्डीतही राधाकृष्ण विखे यांच्याविरोधात काँग्रेस की राष्ट्रवादी लढणार हे आणि इच्छुकही स्पष्ट झालेला नाही.