अलिबाग, पेण आणि उरणमध्ये उमेदवार जाहीर
अलिबाग : काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत शेकाप सहभागी असला तरी रायगड जिल्ह्य़ात शेकापच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार जाहीर केले. त्यामुळे आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र असले तरी विरोधातील सारी मते शिवसेना किंवा भाजपच्या पारडय़ात पडू नये म्हणूनच जाणीवपूर्वक काँग्रेसचे उमेदवार उतरविण्याची खेळी खेळल्याची चर्चा आहे. ही खेळी फायदेशीर ठरते की शेकापवर उलटते याबाबत उत्सुकता आहे.
रायगड जिल्ह्य़ात शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी आघाडी करून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. जागावाटपावरूनही आघाडीत आलबेल नव्हते. त्यातच अलिबाग, पेण आणि उरण मतदारसंघातून काँग्रेसने शेकाप विरोधात उमेदवार उभे केले आहेत. तर श्रीवर्धनमध्ये काँग्रेसचे बंडखोर राष्ट्रवादीच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरले आहेत. मात्र राजकीय खेळीचा भाग म्हणूनच शेकाप आणि काँग्रेसमध्ये जाणीवपूर्वक मैत्रीपूर्ण लढती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येते.
विधानसभा निवडणुकीपूर्वी रायगड जिल्ह्य़ात सातही जागा शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्रित लढवाव्यात, असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र उत्तर रायगडमधील काँग्रेस कार्यकर्त्यांचा शेकापशी आघाडीला विरोध होता. शेतकरी कामगार पक्ष हा काँग्रेसचा पारंपरिक विरोधी पक्ष असल्याने कार्यकर्ते ही आघाडी स्वीकारणार नाहीत, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. अशा वेळी पक्षाचा उमेदवार नसेल तर शेकाप आणि काँग्रेसची पारंपरिक मते युतीकडे वळण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे आघाडीबाबत सोयीस्कर धोरण स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अलिबाग, पेण आणि उरण या शेकापच्या वाटय़ाला आलेल्या तिन्ही मतदारसंघात काँग्रेसने शेकाप विरोधात उमेदवार जाहीर केले आहेत. अलिबागमधून श्रद्धा ठाकूर यांना, पेणमधून नंदा म्हात्रे यांना तर उरणमधून मनीष पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. फारशी तयारी नसलेले उमेदवार रिंगणात उतरविण्यात आले आहेत. वरवर पाहता यामुळे आघाडीत बिघाडी निर्माण झाल्याचे चित्र आहे. मात्र दोन्ही पक्षांची पारंपरिक मते कायम राहावीत यासाठी राजकीय खेळीचा भाग म्हणून तिन्ही मतदारसंघांत दोन्ही पक्षात मैत्रीपूर्ण लढती घडवून आणल्या जाणार आहेत.
उरणमध्ये काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण अलिबाग, पेणमध्ये शेकाप आणि काँग्रेसमध्ये मैत्रीपूर्ण लढत होऊ शकेल.
– आस्वाद पाटील, जिल्हा चिटणीस, शेकाप