Maharashtra Breaking News 22 October 2024 : राज्यात विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच नेत्यांकडून बैठकांचा धडाका सुरु आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागावाटपासंदर्भात चर्चा सुरु आहे. दुसरीकडे महायुतीमधील भारतीय जनता पक्षाने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. आज महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील सोमवारी दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. तसेच मनसेच्या उमेदवारांचीही यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी आजपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्व घडामोडींसह राजकीय घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra Breaking News Live Today, 22 October 2024 : विधानसभेची रणधुमाळी सुरू, उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात
नागपूर : मेडिकलशी संलग्नित सुपरस्पेशालिटी या शासकीय रुग्णालयात १ मे ते जुलै २०२४ दरम्यान २ हजार ३३१ रुग्ण दाखल झाले. त्यापैकी केवळ ४३ टक्केच रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ झाल्याचे माहितीच्या अधिकारातून पेशंट राईट फोरमने पुढे आणले.
वर्धा : राज्यातील शाळांना शासनातर्फे विविध सुविधा दिल्या जातात. शाळांचा सर्वांगीण विकास करण्याचा हेतू त्यामागे असतो. या प्रामुख्याने भौतिक सुविधा असतात. त्या देतांना शिक्षण विभागाकडून यू – डायसच्या माहितीचा आधार घेतल्या जात असतो.
दिवाळीच्या तोंडावर सोन्याच्या दराने ग्राहकांची चिंता वाढवली असतांनाच मंगळवारी (२२ ऑक्टोंबर) सराफा बाजार उघडल्यावर एक सुवर्णवार्ता पुढे आली आहे. त्यानुसार आठवड्याभरात प्रथमच सोन्याचे दर किंचीत कमी झाले आहे.
ऐन विधानसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत कटके यांच्या घरी छापा पडल्यामुळे खळबळ उडाली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी पैलवान दीनानाथ सिंह यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात पैलवान चित्रपटातील ‘पैलवान गीत’लाँच केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,’पैलवाना’मुळे महाराष्ट्राची पारंपरिक कुस्ती संस्कृती जागतिक स्तरावर पोहोचण्यास मदत होत आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार देवेंद्र भुयार, आमदार किरण लहामटे, आमदार शिवाजी गर्जे, आमदार अमोल मिटकरी उपस्थित होते. याप्रसंगी आबा काळे (मुंबई केसरी), सागर गरुड (उपमहाराष्ट्र केसरी), अमोल बराटे (हिंद केसरी), युवराज वहाग (दोन वेळा उपमहाराष्ट्र केसरी), सोनबा काळे (पुणे महापौर केसरी), अक्षय गरुड (युवा महाराष्ट्र केसरी), अक्षय हिरगुडे (हिंद केसरी, सुवर्णपदक विजेते) आणि ऋषिकेश भांडे (महाराष्ट्र चॅम्पियन) यांनीही पक्षात प्रवेश केला.
बदलापूर : मुरबाड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार किसन कथोरे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर सोमवरी शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी हाती तुतारी घेत राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला.
मुंबई : बालनिरीक्षण गृहात १७ वर्षांच्या मुलावर अत्याचार झाल्याची तक्रार डोंगरी पोलिसांना प्राप्त झाली असून याप्रकरणी डोंगरी पोलिसांनी १६ वर्षीय मुलाविरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे. यावेळी १६ वर्षांच्या मुलाने पीडित मुलाच्या तोंडात पांढऱ्या रंगाची पावडरही कोंबल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
मुंबई : ‘अल्ट बालाजी’वरील अश्लील दृश्यांप्रकरणी बोरिवली येथील एमएचबी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याप्रकरणी एकता कपूर, शोभा कपूर आणि ‘अल्ट बालाजी’ला पोलीस लवकरच नोटीस पाठवणार आहेत. अश्लील चित्रीकरणासाठी अल्पवयीन मुलीचा वापर करण्यात आल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
ठाणे : केंद्र शासनाने जुनी नागरी नोंदणी प्रणाली (सीआरएस पोर्टल) संकेतस्थळ बंद ठेवून ती अद्ययावत करत चार महिन्यांपुर्वी कार्यान्वित केली असली तरी या संकेतस्थळामधील तांत्रिक अडचणींमुळे ठाण्यात जन्म-मृत्यु दाखल्यांसाठी नागरिकांना महिनाभराची प्रतिक्षा करावी लागत आहे.
डोंबिवली – डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवरील दिवा बाजूकडील विस्तारित फलाटाच्या भागात छत उभारणीचे काम रेल्वे प्रशासनाने सुरू केले आहे. मागील दोन वर्षापासून या विस्तारित फलाटाच्या भागात छत नसल्याने प्रवाशांचे उन, पावसाच्या दिवसात हाल होत होते. या छताचे काम पूर्ण झाल्यावर प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
ठाणे – दिवाळीच्या मुहूर्तावर विविध खाद्यपदार्थ, पणत्या, शोभेच्या वस्तू, विद्युत रोषणाई यांची महिला बचत गटांकडून जोरदार विक्री करण्यात येते. यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे तालुक्यांच्या ठिकाणी भव्य असे सरस महोत्सव भरवले जातात. यातून काही लाख रुपयांची आर्थिक उलाढाल देखील होते. मात्र यंदा दिवाळीच्या कालावधीत विधानसभा निवडणुकीचा आचार संहितेचा काळ असल्याने हे सर्व सरस महोत्सव यंदा रद्द करण्यात आले आहे.
मुंबई : कुर्ला येथील खासगी शाळेतील शिक्षकांना दिवाळीच्या सुट्टीत, मतदानाच्या एक दिवस आधी आणि मतदानाच्या दिवशी निवडणूक कामे लावण्यात आली आहेत, असे निवडणूक आयोगाने सोमवारी उच्च न्यायालयात स्पष्ट केले. त्यानंतर, परीक्षाकाळात शिक्षकांना निवडणूक कामे लावण्याविरोधात पालकांनी केलेली याचिका न्यायालयाने निकाली काढली.
पुण्यातील खेड-शिवापूर परिसरात एका गाडीतून जवळपास ५ कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ऐन निवडणुकीत तब्बल ५ कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या जप्त करण्यात आलेल्या नोटा खऱ्या आहेत की खोट्या याबाबत आता पोलिसांनी माहिती दिली आहे. पत्रकार परिषदेत पोलिसांनी सांगितलं की,”पंचनामा केल्यानंतर असं निदर्शनास आलं आहे की, तब्बल पाच कोटींची कॅश जप्त करून ती रक्कम इनकम टॅक्स विभागाला पुढच्या चौकशीसाठी देण्यात आलेली आहे. चौकशी केली असता जप्त करण्यात आलेल्या रक्कमेतील सर्व नोटा खऱ्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या सर्व नोटा खऱ्या असून एकूण पाच कोटींची रक्कम आहे. पकडण्यात आलेली गाडी कोणाची आहे? याबाबतचा तपास सुरु आहे. सदरची गाडी ही मुंबईवरून कोल्हापूरच्या दिशेने जात होती. या प्रकणात राजकीय काही कनेक्शन आहे का? याबाबत आम्ही चौकशी करत आहोत”, अशी माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली.
ठाणे : भाजपा नेते गणेश नाईक यांचे पुत्र आणि नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक हे भाजपला रामराम करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याचे करणार असल्याचे समजते.
विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने अनेकजण एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता भारतीय जनता पक्षाचे नेते, निलेश राणे हे देखील शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. काही दिवसांपूर्वी निलेश राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. आता ते बुधवारी दुपारी कुडाळच्या मैदानावर शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती स्वत: निलेश राणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.
वर्धा : आर्वी विधानसभेची जागा भाजप प्रमाणेच काँग्रेस आघाडीसाठी अवघड जागेचे दुखणे ठरत असल्याच्या घडामोडी आहेत. सोमवारी रात्री या जागेबाबत बरीच काथ्याकुट झाल्याची माहिती आहे.
पुणे : शहरात सध्या ऑक्टोबर हीटमुळे उकाडा वाढला आहे. त्यातच ढगाळ वातावरण असून, पाऊसही पडत आहे. या खराब हवामानामुळे नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.
पुण्यातील खेड-शिवापूर भागात पोलिसांनी एका गाडीतून पाच कोटींची रोख रक्कम जप्त केले आहेत. ही गाडी एका सत्ताधारी आमदाराची असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत म्हणाले की, “पुण्यातील खेड-शिवापूर भागात दोन गाड्या होत्या. त्यामध्ये १५ कोटी रुपये होते. तुम्हाला माहिती असेल की, मी आआधी म्हटलं होतं की, एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा ५०-५० कोटी रुपये देण्याचे काम करत आहेत. त्यातील हा १५ कोटींचा पहिला हप्ता जात होता. जी गाडी पकडली त्यामध्ये सांगोल्याच्या आमदारांसाठी पहिला हप्ता जात होता. त्यामध्ये ५ कोटींचा हिशेब लागला. त्यातील १० कोटी सोडून देण्यात आले. एक फोन आला त्यानंतर एक गाडी सोडून देण्यात आली”, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
वसई : क्षुल्लक कारणांवरून खासगी शिकवणी घेणार्या शिक्षिकेने १० वर्षाच्या मुलीच्या कानाखाली मारल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. तिच्या श्वसनलिकेसह मेंदूला ईजा झाली असून तिच्यावर मुंबईच्या खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.
नागपूर : सत्ताधाऱ्यांच्या कटकारस्थानामुळे रामटेक मतदारसंघातून निवडणूक लढण्यापासून वंचित राहिलेल्या काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांना उमरेड राखीव मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा निर्णय काँग्रेस श्रेष्ठींनी घेतला आहे.
Vidhan Sabha Election : राज्यात विधानसभेची निवडणूक जाहीर (Maharashtra Assembly Election 2024) झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून २९ ऑक्टोबर या दिवसांपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत.
महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागावाटपासंदर्भात चर्चा महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागावाटपासंदर्भात चर्चा सुरु आहे. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जागावाटपारून मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या पार्श्वभूमीवरच शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये बैठकांवर बैठका सुरु आहेत. आज महाविकास आघाडीची उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.