अलिबाग- रायगड जिल्ह्यात सातही मतदारसंघ प्रस्थापितांनी राखले आहेत. महायुतीचे सातही उमेदवार निवडून आले असून, महाविकास आघाडी मतदारांवर प्रभाव पाडण्यात निष्प्रभ ठरली आहे. कर्जत आणि उरण मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना झुंज द्यावी लागली, मात्र अखेरच्या फेऱ्यांमध्ये महायुतीचे महेश बालदी आणि महेंद्र थोरवे विजयी झाले..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाविकास आघाडीतील मतविभाजन पनवेल, उरण मतदारसंघात महायुतीच्या पथ्यावर पडले. लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरणाचे महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे प्रयत्नही अपयशी ठरले. मराठा आरक्षणाच्या मुद्दाचा फारसा प्रभाव दिसून आला नाही. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांची  वाटचाल सुकर झाली. तर लाडकी बहिण आणि वयोश्री योजनेचा प्रभाव मतदारांवर दिसून आला.    

जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे तीन, भाजपचे तीन तर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमेदवार निवडून आला. पनवेल मध्ये भाजपच्या प्रशांत ठाकूर यांनी शेकापच्या बाळाराम पाटील यांचा पराभव केला. पेण मधून भाजपचे रविशेठ पाटील शिवसेना ठाकरे गटाच्या प्रसाद भोईर यांचा पराभव करत निवडून आले. अलिबाग मध्ये शिवसेनेच्या महेंद्र दळवी यांनी शेकापच्या चित्रलेखा पाटील यांचा पराभव केला. श्रीवर्धन मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आदिती तटकरे विक्रमी मताधिक्याने निवडून आल्या. त्यांच्या विरोधात निवडणूक लढविणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अनिल नवगणे निष्प्रभ ठरले. महाड मध्ये शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले सलग चौथ्यांदा निवडून आले. शिवसेना ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप यांचा त्यांनी पराभव केला.

हेही वाचा >>> Mohit Kamboj : देवेंद्र फडणवीस यांना मोहित कंबोज यांनी उचलून साजरा केला विजयाचा आनंद, व्हिडीओ चर्चेत

उरण आणि कर्जत मतदारसंघात अटीतटीच्या लढती पहायला मिळाल्या. तिरंगी लढती महायुतीच्या पथ्यावर पडल्या. उरण मतदारसंघात भाजपच्या महेश बालदी यांना शेकापच्या प्रितम म्हात्रे यांनी शेवटच्या फेऱ्यांपर्यंत लढत दिली. मात्र शेवटच्या क्षणी बालदी विजयी झाले. शेकाप आणि शिवसेना ठाकरे गटातील मतविभाजन बालदींसाठी महत्वपुर्ण ठरले. कर्जत मतदारसंघात महायुतीच्या दोन घटक पक्षांत प्रमुख लढत झाली. शिवसेना शिंदे गटाच्या महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बंडखोरी सुधाकर घारे यांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंजवले. कधी थोरवे तर कधी घारे आघाडी घेत असल्याचे चित्र फेरी निहाय पहायला मिळाले. मात्र शेवटी थोरवे यांनी शेवटच्या काही फेऱ्यात घारे यांच्यावर मात करत थोरवे विजयी झाले.

रायगड अंतिम निकाल

एकूण जागा ७

जाहीर निकाल ७

भाजप – ३

शिवसेना शिंदे – ३

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – १

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly election 2024 mahayuti candidates won all seven assembly seats in raigad district zws