महाराष्ट्रात आता वेध लागले आहेत ते विधानसभा निवडणुकीचे. विधासभा निवडणुकीत आम्ही १८५ पेक्षा जास्त जागा जिंकू असा दावा महाविकास आघाडीने केला आहे. लोकसभेतल्या विजयानंतर त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. तर दुसरीकडे महायुतीनेही पराभवातून धडा घेत कंबर कसून तयारी सुरु केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार विधानसभा निवडणुकीत भाजपा १५५ जागा लढण्याची शक्यता आहे. असं खरंच घडलं तर मित्रपक्षांना काय मिळणार ? याची चर्चा आता रंगली आहे.

विधानसभेसाठी फॉर्म्युला ठरला?

भारतीय जनता पार्टी येत्या विधानसभा निवडणुकीत १५५ जागा लढवण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे रामदास आठवले यांनी १० जागांची मागणी केली आहे. २८८ पैकी १६५ जागा जर अशाच गेल्या तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला काय मिळणार? हा प्रश्न विचारला जाचतो आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ५० ते ५५ जागा तर शिवसेनेला ६० ते ६५ जागा भाजपा सोडणार आहे अशी चर्चा आहे. तर इतर मित्रपक्षांसाठी १५ जागा राखून ठेवण्यात येणार आहेत असंही समजतंल आहे. आता जागावाटपाचा पेच लवकर संपतोय का? तसंच फॉर्म्युला नेमका कसा असेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

हे पण वाचा- संजय राऊत यांचं मोठं विधान, “नोव्हेंबरनंतर महाराष्ट्रात आपलाच मुख्यमंत्री”

मित्रपक्षांना किती जागा मिळणार?

रामदास आठवले, राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे भाजपाचा १५५ जागांचा दावा मान्य करणार का? हेदेखील पहावं लागणार आहे. या वर्षी ऑक्टोबर महिन्यात निवडणूक लागू शकते. त्याबाबतची तारीख अद्याप जाहीर होणं बाकी आहे. मात्र राज्यात नोव्हेंबर नंतर आपलाच मुख्यमंत्री होणार असं खासदार संजय राऊत यांनी जाहीर केलं आहे. महाविकास आघाडीतही काही ठरलेलं नसताना संजय राऊत यांची ही घोषणा चर्चेत आली आहे. तर भाजपाने १५५ जागांवर दावा सांगितल्याची चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काय घडलं?

लोकसभा निवडणुकीत महायुतीला अवघ्या १७ जागांवर समाधान मानावं लागलं. तर मविआने ३० जागांवर बाजी मारली. एक अपक्ष जागा विशाल पाटील यांनी जिंकली. भाजपाला या निवडणुकीत फक्त ९ जागांवर यश मिळालं. २०१९ मध्ये त्यांची खासदार संख्या २३ होती. आता विधानसभा निवडणुकीत काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. भाजपाने १५५ जागा लढवल्या तर मित्र पक्ष कदाचित नाराज होऊ शकतात अशीही चिन्हं आहेत.

महाविकास आघाडीचा फॉर्म्युला काय?

महायुतीबाबत या चर्चा असताना महाविकास आघाडी ९६-९६-९६ असा समसमान जागावाटपाचा फॉर्म्युला घेऊन निवडणुकीला सामोरी जाऊ शकते अशी शक्यता आहे. मात्र याबाबत अधिकृतरित्या कुणीही माहिती दिलेली नाही.