पवारांना मुलीला, तर ठाकरेंना मुलाला मुख्यमंत्री करायचे
सांगली : महाविकास आघाडीची सत्ता येणे अशक्य आहे, तरीही केवळ काँग्रेसमध्येच मुख्यमंत्रिपदासाठी डझनभर नेते गुडघ्याला बाशिंग लावून बसले आहेत. शरद पवार यांना त्यांच्या मुलीला, तर उद्धव ठाकरे यांना मुलाला मुख्यमंत्री करायचे आहे, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी शिराळा येथे प्रचार सभेत बोलताना केली.
शिराळा येथे भाजप उमेदवार सत्यजित देशमुख यांच्या प्रचारार्थ आज गृहमंत्री शहा यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर शिराळ्याचे उमेदवार देशमुख, वाळव्याचे महायुतीचे उमेदवार निशिकांत पाटील, खा. धैर्यशील माने, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे आदी उपस्थित होते.
हेही वाचा >>> Poonam Mahajan : ‘प्रमोद महाजन यांना ठार करण्याचं षडयंत्र कशासाठी आखलं गेलं?’ पूनम महाजन यांचं उत्तर, “त्यांना…”
शहा म्हणाले, की राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार सत्तेवर येणार आहे, यात शंका नाही. तरी देखील आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी आतापासूनच वाद सुरू आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष म्हणतात, निवडणुकीत आश्वासन देताना सांभाळून करा. मात्र, खटाखटवाले अशी आश्वासने देत आहेत, की जी कधी पूर्ण होऊच शकणार नाहीत.
आम्ही जम्मू-काश्मिरमधील ३७० कलम हटवले. मात्र, आता विधानसभेत हे कलम पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भाजप हे कदापि होऊ देणार नाही. यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या चार पिढ्या आल्या, तरी हे अशक्य आहे.
हेही वाचा >>> Nana Patole : “देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री कसे होतील? ते निवडून येणारच नाहीत..”; नाना पटोले काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश जगात सर्वांत शक्तिशाली बनला आहे. यामुळे राज्यात महायुतीचे सरकार बनावे यासाठी मतदारांनी साथ द्यावी. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर केंद्रातील सरकारच्या मदतीने महाराष्ट्र देशातील क्रमांक एकचे राज्य बनवले जाईल, असे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले. आम्ही औरंगाबादचे संभाजीनगर केले. मात्र, काही जण याला विरोध करत होते. यापुढे छत्रपती संभाजीनगर हे नाव कायम राहील, यात शंका नाही. वक्फ बोर्डाला उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा आहे का, हे त्यांनी जाहीर करावे, असे खुले आव्हान देत मंत्री शहा यांनी, जोपर्यंत मोदी सरकार आहे तोपर्यंत शेतकऱ्यांच्या जमिनीला कोणी हातही लावू शकणार नाही, असे सांगितले. शिराळ्यातील जगप्रसिद्ध नागपंचमीला कायद्याच्या चौकटीत बसवून गतवैभव प्राप्त करून देऊ, असे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले.