नक्षलवाद्यांच्या गडात आरमोरी, गडचिरोली व अहेरी या तीन विधानसभा मतदारसंघात भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी, या तीन प्रमुख पक्षाच्या उमेदवारांमध्ये तिरंगी लढतीचे चित्र आहे.
गडचिरोली विधानसभा मतदारसंघात भाजपचे डॉ.देवराव होळी, काँग्रेसच्या सगुणा तलांडी व राष्ट्रवादीच्या भाग्यश्री आत्राम यांच्यात खरी लढत आहे. काँग्रेसमधील नाराजी व राजीनामा नाटय़ाचा फटका येथे सगुणा तलांडी यांना बसतांना दिसत आहे. विद्यमान आमदार असतांना तिकीट कापल्याने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी, माजी खासदार मारोतराव कोवासे व काँग्रेसचे अन्य बडय़ा नेत्यांनी स्वत:ला प्रचारापासून दूर ठेवल्याने तलांडी यांना संघर्ष करावा लागत आहे. लोकसभा निवडणुकीतील मताधिक्य व मोदी लाटेचा फायदा भाजपचे डॉ.नामदेव होळी यांना होतांना दिसत आहे. माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या भाग्यश्रींना येथे गटबाजी मारक ठरत आहे. तरीही त्यांनी प्रचारात बऱ्यापैकी मजल मारल्याने गडचिरोलीत भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी, अशा तिरंगी लढतीचे चित्र आहे. आरमोरी मतदारसंघात काँग्रेसचे आनंदराव गेडाम, शिवसेनेने माजी आमदार रामकृष्ण मडावी, भाजपने माना समाजाचे नेते कृष्णा गजबे यांच्यात तिरंगी लढत आहे. सलग ६० वष्रे काँग्रेसशी निष्ठावान राहिलेले अरविंद सावकार व प्रकाश सावकार पोरेड्डीवार भाजपात गेल्याने येथे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
येथून सेनेने माजी आमदार रामकृष्ण मडावी व राष्ट्रवादीचे सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी नामदेव वटी रिंगणात आहे. मात्र, सेना व राष्ट्रवादी कमकुवत असल्याने लढत मडावींविरुध्द गजबे, अशीच होणार आहे. राजघराण्याचा वारसा असलेल्या अहेरी मतदारसंघात राष्ट्रवादीचे धर्मरावबाबा आत्राम व भाजप-नाविसचे राजे अंब्रिशराव महाराज या काका-पुतण्यात सरळ लढत आहे.
राजघराण्याची पुण्याई राजकारणात नवखे असलेल्या अंब्रिशराज महाराज यांच्या पाठीशी आहे, तर धर्मराव यांना राजकारणाचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे येथे अनुभवाची लढाई जिंकते की राजघराण्याचा विजय होतो, याकडे सर्वाचे लक्ष आहे. त्यामुळेच येथील मतदारही संभ्रमावस्थेत आहे. अपक्ष असलेले आमदार दीपक आत्राम व काँग्रेसचे मुकेश्वर गावडे रिंगणात आहेत. मात्र,   काका-  पुतण्याच्या तुलनेत हे दोन्ही    उमेदवार माघारले आहेत.

Story img Loader