मतदान उद्यावर येऊन ठेपले तरी मतदारांचा स्पष्ट कौल कुणाला, हे निश्चित न झाल्याने मतदारांसह राजकीय पक्षही संभ्रमावस्थेत असले तरी या दोन जिल्ह्य़ातील सर्व मतदारसंघांचा आढावा घेतला असता भंडारा जिल्ह्य़ातील तीनही ठिकाणी तिरंगी, तर गोंदियातील चार ठिकाणी चौरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत.
गोंदिया-भंडारा जिल्ह्य़ातील सात विधानसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत ३ जागा कांॅग्रेस, ३ भाजप व १ सेनेकडे होती. या विधानसभा निवडणुकीत या जागा कायम राहतात की, लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करणारी राष्ट्रवादी कांॅग्रेस वेगळी झाल्यानंतर काही चमत्कार दाखवते, याकडे संपूर्ण जिल्ह्य़ाचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यापासून भाजपतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, देवेन्द्र फडणवीस, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग, मध्यप्रदेशचे शिवराजसिंग चौहान, सेनेतर्फे उद्धव ठाकरे, तर कांॅग्रेसतर्फे सोनिया गांधी, माणिकराव ठाकरे, कमलनाथ, तर बसपाकडून मायावती यांनी आपापल्या उमेदवारांसाठी दोन्ही जिल्ह्य़ातील मतदारसंघांमध्ये हजेरी लावली. राष्ट्रवादीच्या वतीने गोंदिया-भंडारा जिल्ह्य़ातील प्रचाराची धुरा राष्ट्रवादीचे केंद्रीय नेते खासदार प्रफुल्ल पटेल स्वत सांभाळत असल्याचे दिसले. नरेंद्र मोदी, सोनिया गांधी व बसपच्या मायावती यांच्या सभेला गर्दी झाली असली तरी या गर्दीचा त्यांना मतदानाचा किती लाभ मिळणार, हा प्रश्न तसाच कायम आहे.
आमगाव-देवरीत भाजप िरगणात राहणार किंवा नाही, ही बाब अपक्ष सहेसराम कोरेटी ठरविण्याची शक्यता आहे. अर्जुनी मोरगावात भाजप, सेना, कॉंग्रेस, राष्ट्रवदी, अशा चौरंगी लढतीत भाजप बंडखोर व सेनेची उमेदवार किरण कांबळे किती मते घेतात, यावर भाजपचे भवितव्य, तर दोन मोठे बंडखोर कॉंग्रेसला शर्यतीतून बाहेर तर करणार नाही, अशी चर्चा आहे. तिरोडा विधानसभा मतदारसंघातील लढत भाजप, राष्ट्रवादी व कॉंग्रेसमध्ये राष्ट्रवादीशी बंडखोरी करणारे माजी आमदार दिलीप बंसोड यांची बंडखोरी राष्ट्रवादीला कितपत प्रभावी करते व भाजपचे पंचम बिसेन यांची बंडखोरी भाजपची किती मते कमी करते, यावर निर्णय अवलंबून आहे. भंडारा विधानसभा मतदारसंघात मुख्य लढत भाजप, बसप व सेनेत असून कॉंग्रेस व राष्ट्रवादी दोन्ही मागे पडल्याचे चित्र आहे.
साकोली विधानसभेत भाजप, राष्ट्रवादी व कांॅग्रेसच्या उमेदवारात अटीतटीची लढत आहे. तुमसर विधानसभेतील तिरंगी लढत रंगतदार ठरत असून सेनेच्या उमेदवाराने कांॅग्रेस उमेदवाराला घाम फोडला आहे, एकंदरीत गोंदिया व भंडारा जिल्ह्य़ातील विधानसभेचे निकाल धक्कादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भंडारा जिल्ह्य़ात तिरंगी, तर गोंदियात चौरंगी लढतीचे चित्र!
मतदान उद्यावर येऊन ठेपले तरी मतदारांचा स्पष्ट कौल कुणाला, हे निश्चित न झाल्याने मतदारांसह राजकीय पक्षही संभ्रमावस्थेत असले तरी या दोन जिल्ह्य़ातील सर्व मतदारसंघांचा आढावा घेतला असता भंडारा जिल्ह्य़ातील तीनही ठिकाणी तिरंगी, तर गोंदियातील चार ठिकाणी चौरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत.
First published on: 15-10-2014 at 06:41 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly election in gondia