जिल्ह्य़ात विद्यमान चार आमदारांना आव्हान देणारे निवडणुकीचे चित्र असून यावेळी आश्चर्यकारक निकाल लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कांॅग्रेसने चारपैकी तीन, तर भाजपनेही तीन जागा हमखास पदरात पडण्याचा दावा केला आहे.
वर्धा मतदारसंघात राकांॅचे विद्यमान आमदार प्रा.सुरेश देशमुख यांच्याशी कांॅग्रेसचे शेखर शेंडे व भाजपचे डॉ.पंकज भोयर हे कडवी झुंज देत आहेत. सेनेचे रविकांत बालपांडेंचेही तळागाळातील मतदारांमध्ये वलय असल्याने त्यांची उमेदवारी दखलपात्र ठरली आहे. जातीय धृवीकरणाचा सर्वात मोठा पैलू या मतदारसंघात दिसून येत असल्याने अल्पसंख्याक व दलित मते निर्णायक ठरतील. काही अपक्ष उमेदवारही पक्षीय मतांना खिंडार पाडत चुरस रंगतदार करीत आहे. देवळी मतदारसंघात कॉंग्रेसचे रणजित कांबळेंविरुध्द भाजपचे सुरेश वाघमारे, असा थेट दुहेरी सामना प्रारंभी दिसून येत असतांनाच बसपचे उमेश म्हैसकर यांची गत दोन दिवसात उसळलेली चर्चा लढतीचे चित्र पालटणारी ठरावी. कांॅग्रेसचा आजवर गड राहिलेल्या या मतदारसंघात मोदी फॅ क्टर हाच भाजप उमेदवाराचा एकमेव आधार ठरला आहे. भाजपच्या शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहिलेल्या उघड गटबाजीने कांबळेंना हायसे वाटत आहे.
हिंगणघाट मतदारसंघात सेनेचे विद्यमान आमदार अशोक शिंदेना राकांॅचे राजू तिमांडे व भाजपचे समीर कुणावार यांनी चांगलेच घायकुतीस आणले आहे. चमत्कारिक निकाल देण्यासाठी परिचित असलेल्या या मतदारसंघात पक्षचिन्ह नव्हे, तर उमेदवाराकडे पाहून मतदान केले जाते. विद्यमान आमदाराच्या निष्क्रियतेवर झोड उठवून प्रचाराची राळ राकांॅ व भाजपने उडविली आहे. शिंदेंसाठी ही आजवरची सर्वात कठीण निवडणूक समजली जाते. कॉंग्रेसच्या उषाकिरण थुटे, अपक्ष किसना व्यापारी यांची उपस्थिती आहेच. आर्वीत भाजपचे विद्यमान आमदार दादाराव केचेंना गत लोकसभा निवडणुकीपासूनच आव्हान मिळणे सुरू झाले होते. कांॅग्रेसच्या अमर काळेंशी त्यांची थेट लढत आहे. राकांॅचे संदीप काळेंच्या उमेदवारीने ही दुहेरी लढत अनिश्चिततेच्या भोवऱ्यात अडकली. सध्या जिल्ह्य़ात भाजपकडे असणाऱ्या या एक मेव जागेवर यावेळी प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते. सर्वात अटीतटीची निवडणूक म्हणून आर्वीकडे पाहिले जाते.
वर्धा जिल्ह्य़ात ४ आमदारांना आव्हान
जिल्ह्य़ात विद्यमान चार आमदारांना आव्हान देणारे निवडणुकीचे चित्र असून यावेळी आश्चर्यकारक निकाल लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कांॅग्रेसने चारपैकी तीन, तर भाजपनेही तीन जागा हमखास पदरात पडण्याचा दावा केला आहे.
First published on: 15-10-2014 at 06:39 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly election in vardha