लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा सुफडा साफ झाला होता. त्यानंतर राष्ट्रवादीला प्रचंड गळती लागल्यानं विधानसभा निवडणूक एकतर्फी होईल असंच चित्र महाराष्ट्रात निर्माण झालं होत. तसं वातावरण निर्माण व्हावं म्हणून भाजपानेही प्रचंड मेहनत घेतली. पण, शरद पवार यांनी केलेल्या राज्याच्या दौऱ्यांमुळे निवडणुकीत रंगत आली. त्यामुळे निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी-काँग्रेसच्या विजयाचं श्रेय पवारांना दिलं जात आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या यशात पक्षातील इतर महत्त्वाच्या नेत्यांचा सिंहाचा वाटा आहे.

खासदार डॉ. अमोल कोल्हे

लोकसभा निवडणुकीआधी डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला. त्यांनी शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला. त्यानंतर कोल्हे चर्चेत आले. पडद्यावरील चेहरा असल्यानं कोल्हे राज्यभरात परिचयाचा चेहरा होते. पण, गळती लागलेल्या राष्ट्रवादीमध्ये  पुन्हा हवा भरून नवं बळ देण्याचं काम त्यांनी केलं. राष्ट्रवादी शिवस्वराज्य यात्रा हाती घेतलं होतं. याची जबाबदारी उदयनराजे भोसले यांच्यावर देण्यात येणार होती. पण, ऐनवेळी त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे ही जबाबदारी अमोल कोल्हे यांच्यावर आली. ही यात्रा कोल्हे यांनी यशस्वी करून दाखवली. या यात्रेच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांचा परिणाम निकालात दिसून आला आहे. वकृत्व आणि आक्रमक शैलीमुळे त्यांचा प्रभाव ग्रामीण भागातील मतदारांवर झाला. याचबरोबर प्रचाराच्या काळातही कोल्हे यांनी प्रचंड दौरे केले. मात्र, शरद पवार चर्चेत राहिल्यामुळे ते पडद्यामागे राहिले.

धनंजय मुंडे –

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते संपूर्ण निवडणुकीच्या काळात चर्चेत राहिले ते परळी विधानसभा मतदारसंघातील लढतीमुळे. पण, धनंजय मुंडे यांनीही विधानसभा निवडणुकीच्या आधीपासून शरद पवारांच्या पाठोपाठ धनंजय मुंडे यांनीही महाराष्ट्रात प्रचाराच्या काळात दौरे केले. विशेष म्हणजे परळी मतदारसंघात पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यासह अनेकांच्या सभा घेतल्या. दुसरीकडं पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराबरोबरच धनंजय मुंडे यांनी परळीची जागा राखली.

अमोल मिटकरी-

राष्ट्रवादीचे प्रवक्ते असलेले अमोल मिटकरी यांच्या लोकांना भूल पाडणार वक्तृत्व आहे. शिवस्वराज्य यात्रा असेल, प्रचाराच्या काळातील उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या सभा असतील यामध्ये अमोल मिटकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीसह भाजपाच्या नेत्यांवर लोकांना अपील होईल, अशी टीका केली. राष्ट्रवादीमध्ये आणि राष्ट्रवादीबाहेरही त्यांच्या भाषणांचा चाहता वर्ग आहे. अमोल मिटकरी यांनी घेतलेल्या सभांमुळे पश्चिम महाराष्ट्रात घुसखोरी करू पाहणाऱ्या भाजपाला रोखण्यात राष्ट्रवादीला यश मिळाले.

अजित पवार-

शिखर बँक घोटाळ्यात शरद पवार यांचं नाव येईपर्यंत शांत असलेल्या अजित पवार यांनी प्रचाराच्या काळात मात्र फ्रंटफूटवर बँटिंग केली. स्वतःच्या बारामती विधानसभा मतदारसंघात फारसं लक्ष न देता त्यांनी पश्चिम महाराष्ट्रासह पुणे आणि उर्वरित महाराष्ट्रात दौरे केले. अजित पवारांचं व्यक्तिमत्व तापट असलं तरी ग्रामीण भागातील लोकांना ते अपील होतं. त्यामुळे अजित पवारांचाही या विजयात मोठा वाटा आहे.