Maharashtra Assembly Election partywise strike rate: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल हा आश्चर्यकारक आणि अनपेक्षित असल्याची प्रतिक्रिया राजकीय नेत्यांनी व्यक्त केली आहे. आपणच सरकार स्थापन करू, असा विश्वास महाविकास आघाडीचे नेते व्यक्त करत होते. मात्र महायुतीने तब्बल २३५ जागा मिळवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. भाजपा १३२ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. २०१४ पेक्षाही (१२२) सर्वात मोठा विजय यावेळी भाजपाने मिळविला आहे. निवडणुकीचा विजय आणि पराजय हा स्ट्राइक रेटमध्ये मोजण्याची पद्धत गेल्या काही निवडणुकांपासून सुरू झाली आहे. त्यामुळे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाचा किती स्ट्राइक रेट आहे, हे पाहू.
महायुतीचा विजयाचा स्ट्राइक रेट हा सर्वाधिक आहे. महायुतीने २३६ जागा जिंकल्या आहेत. महायुतीचा स्ट्राइक रेट ७४.७९ टक्के इतका आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचा दारूण पराभव झाला होता. ४८ पैकी केवळ १७ जागा त्यांना जिंकता आल्या. मात्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने उसळी घेत मोठा विजय प्राप्त केला आहे.
हे वाचा >> विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट; कोणत्या पक्षाला किती जागा? वाचा एका क्लिकवर
पक्षनिहाय स्ट्राइक रेट
महायूती
भाजपा १४९ पैकी १३२ जागांवर विजय
स्ट्राइक रेट – ८८.५९ टक्के
शिवसेना (शिंदे) ८७ पैकी ५७ जागांवर विजय
स्ट्राइक रेट – ७०.३७ टक्के
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ५९ पैकी पैकी ४१ ठिकाणी विजयी
स्ट्राइक रेट – ६९.४९ टक्के
महाविकास आघाडी
काँग्रेस १०१ जागांपैकी १६ ठिकाणी विजय
स्ट्राइक रेट – १५.८४ टक्के
शिवसेना (ठाकरे) पक्षाने ९५ पैकी २० ठिकाणी विजय
स्ट्राइक रेट – २१.०५ टक्के
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) ८६ पैकी १० जागांवर विजयी
स्ट्राइक रेट – ११.६२ टक्के
शरद पवारांचा सर्वात कमी स्ट्राईक रेट
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा यावेळी सर्वात कमी स्ट्राइक रेट पाहायला मिळाला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने १० पैकी ८ जागा जिंकल्या होत्या. तर साताऱ्याची जागा पिपाणी चिन्हामुळे गेली होती. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांचा स्ट्राइक रेट ८० टक्के होता. मात्र विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांचा स्ट्राइक रेट ११.६२ टक्के इतका आहे.