नवी दिल्ली : भाजपने शनिवारी २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून पहिल्या यादीतील ९९ उमेदवारांसह आत्तापर्यंत भाजपने १२१ उमेदवारांची घोषणा केली आहे. दुसऱ्या यादीत विद्यामान आमदारांवरच भरवसा ठेवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुण्यामध्ये खडकवासलामधून भीमराव तापकीर, पुणे कॅन्टोन्मेंटमधून सुनील कांबळे या विद्यामान आमदारांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. तर, कसबा पेठेतील पोटनिवडणुकीत पराभूत झालेले हेमंत रासने यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने जतमधून गोपीनाथ पडळकर यांना तर, नाशिक मध्य मतदारसंघातून देवयानी फरांदे यांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
पंढरपूरमधून समाधान औताडे यांना उमेदवारी मिळाली असल्याने प्रशांत परिचारक यांची संधी हुकली आहे. सोलापूर मध्य मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आला असून तिथे देवेंद्र कोठे यांना उमेदवारी दिली आहे.
देवराम होळींना संधी नाही
दुसऱ्या यादीमध्ये विदर्भातील ९ जागांचा समावेश आहे. मेळघाट मतदारसंघ भाजपला मिळाला असून तिथे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणारे केवलराम काळेंना उमेदवारी दिली आहे. गडचिरोलीमधून मिलिंद नरोटे यांना उमेदवारी मिळाली असून भाजपचे विद्यामान आमदार देवराव होळी यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे.