Sharad Pawar NCP Vidhan Sabha Election 2024 Candidates Second List: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी आपली २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन दुसरी यादी जाहीर केली. तिसरी यादी पत्रकार परिषद न घेता लवकरच जाहीर केली जाईल, असेही जयंत पाटील यांनी सांगितले. धाराशिव जिल्ह्यातील परांडा विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने आपला उमेदवार जाहीर केला होता. मात्र राष्ट्रवादीने आज परांडा येथे डॉ. तानाजी सावंत यांच्या विरोधात माजी आमदार राहुल मोटे यांचे नाव घोषित केले आहे. या मतदारसंघात उमेदवार दिल्यानंतर आता मविआमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जयंत पाटील म्हणाले की, याबाबत आम्ही शिवसेनेशी चर्चा करू आणि वाद सोडविण्याचा प्रयत्न करू.

भूम-परांडा या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या राहुल मोटे यांनी २००४, २००९ आणि २०१४ साली असा सलग तीनवेला विजय मिळविला होता. मात्र २०१९ साली शिवसेनेच्या तानाजी सावंत यांनी त्यांचा पराभव केला. त्यामुळे शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने याठिकाणी पहिल्याच यादीत राहुल पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. यामुळे राहुल मोटे यांचे समर्थक नाराज होते. आज दुसरी यादी जाहीर करताना राष्ट्रवादीने राहुल मोटे यांना याठिकाणी उमेदवारी दिली आहे. जर ही चर्चा ठरवून झाली असेल तर परांडा विधानसभेत तानांजी सावंत विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पुन्हा पाहायला मिळेल. मात्र शिवसेनेने याला मान्यता दिली नाही तर मात्र महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.

हे वाचा >> राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची पहिली यादी जाहीर; बारामतीमध्ये अजित पवार वि. युगेंद्र पवार लढत निश्चित, रोहिणी खडसेही मैदानात

तसेच या यादीत छगन भुजबळ यांच्या विरोधात माणिकराव शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माणिकराव शिंदे यांचा २००९ साली भुजबळ यांनी पराभव केला होता. तेव्हा ते शिवसेनेतून निवडणूक लढविली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची दुसरी यादी

एरंडोल – सतीश अण्णा पाटील

गंगापूर – सतीश चव्हाण

शहापूर – पांडुरंग बरोरा

भूम-परांडा – राहुल मोटे

बीड – संदीप क्षीरसागर

आर्वी – मयुरा काळे

बागलान – दीपिका चव्हाण

येवला – माणिकराव शिंदे

सिन्नर – उदय सांगळे

दिंडोरी – सुनीताताई चारोसकर

नाशिक पूर्व – गणेश गिते

उल्हासनगर – ओमी कलानी

जुन्नर – सत्यशील शेरकर

पिंपरी – सुलक्षणा शिलवंत

खडकवासला – सचिन दोडके

पर्वती – अश्विनीताई कदम

अकोले – अमित भांगरे

अहिल्यानगर शहर – अभिषेक कळमकर

माळशिरस – उत्तम जानकर

फलटण – दीपक चव्हाण

चंदगड – नंदिनीताई कुपेकर

इचलकरंजी – मदन कारंडे