सातारा : राज्यात शरद पवारांचा करिश्मा कधीच नव्हता. आजपर्यंत त्यांनी पायात पाय घालण्याचे आणि पाडापाडीची कामे केली. त्याची पोचपावती त्यांना मिळाली आहे. आत्ताचा निकाल हा त्याचाच परिणाम आहे. ‘जशी करणी तशी भरणी’ असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधानसभेच्या निकालानंतर सातारा येथे पत्रकारांशी बोलताना खासदार उदयनराजे म्हणाले, राज्यात लोकांनी प्रगतीला आणि सकारात्मकतेच्या विचारांना मतदान केले आहे. महाविकास आघाडी नकारात्मक दृष्टीने चालत होती. त्यांना लोकांनी झुगारले आहे. हे होणारच होते. महायुतीने राजकारण नव्हे तर लोकांसाठी समाजकारणच केले. त्यामुळेच आज महायुतीला बहुमत मिळाले आहे. राज्यकारभार करताना लोकांना केंद्रबिंदू मानूनच काम करावे लागते. त्याचाच परिणाम म्हणजे आजचा निकाल आहे. यापुढेही समाजाची सर्व सेवा महायुतीकडून होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – महाराष्ट्र नवनिर्माणाचे इंजिन १८ वर्षांनंतरही यार्डातच, विधिमंडळातील अस्तित्वही संपुष्टात

उदयनराजे म्हणाले, राज्यात शरद पवारांचा करिश्मा कधीही नव्हता. कायम पायात पाय घालायचे आणि पाडापाडीचे राजकारण केले. आत्ताही त्यांनी हसन मुश्रीफ, वळसे पाटील, मकरंद पाटील, धनंजय मुंडे यांना पाडा असे सांगितले होते. परंतु लोकांनी त्यांच्या बोलण्याला बगल देत त्यांचेच उमेदवार पाडले आहेत. त्यांनी जे केलं त्याच्या कामाची त्यांना पोचपावती मिळाली आहे. जशी करणी तशी भरणी जे केलं ते कर्म म्हणतात त्याचं त्यांना फळ मिळालं.

शरद पवार यांना महत्त्व का मिळाले, याविषयी बोलताना ते म्हणाले की, लोकांना त्यावेळी योग्य तो पर्याय नव्हता, म्हणून लोकांनी शरद पवार हा पर्याय स्वीकारला होता. आता राज्यातील लोकांना प्रगतीच्या दृष्टीने योग्य तो पर्याय सापडला आहे. त्यामुळेच महायुतीला मोठ्या संख्येने मतदान झाले आहे. शरद पवारांनी मिळालेल्या संधीचे सोने करायला हवे होते, असेही उदयनराजे म्हणाले.

जिल्ह्यातील सर्व महायुतीचे उमेदवार मोठ्या मतांनी विजयी झाले. तसेच शिवेंद्रसिंहराजे भोसले राज्यात पहिल्या क्रमांकाची मते मिळवून विजयी झाले. ते आमच्या पूर्वजांचे आणि शिवरायांच्या विचारांचे पुण्य आहे. महायुतीनेही शिवरायांचा विचार अमलात आणूनच काम केले आहे. शिवेंद्रसिंहराजेंना मंत्री पद मिळणार काय ते मिळाल्यात जमा आहे. त्यांना मिळालेल्या संधीच्या माध्यमातून लोकांची जास्तीत जास्त सेवा व्हावी आणि त्यांनी यशाची फार उंची गाठावी असेही उदयनराजे म्हणाले.

हेही वाचा – चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीतील मताधिक्य टिकवून ठेवण्यात काँग्रेसला अपयश; नेत्यांमधील चढाओढ कारणीभूत

खोटं पसरवलेले फार काळ टिकत नाही. त्याचे परिणाम म्हणजे आत्ताचे निकाल आहेत. दुसऱ्या बाजूला जरांगे पाटलांपासून सगळ्यांनी एकदा बसावे. कोणाला काय पाहिजे ते त्यांनी बैठक घेऊन ठरवावे. नक्की काय पाहिजे. आरक्षण मिळालंच पाहिजे. यापूर्वीच ते मिळायला हवं होतं. २३ मार्च १९९४ च्या अधिसूचनेनंतर हे जर मिळाले असते. तर आरक्षणाचा मुद्दा शिल्लक राहिला नसता. लोकांना बरे वाटेल असे बोलून लोकांची फसवणूक होत आहे. मी मात्र लोकांना बरं वाटेल असं बोलत नाही. जे खरे आहे तेच बोलले पाहिजे, असे उदयनराजे यांनी सांगितले.

काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर देशात, प्रत्येक राज्यात राज्य केले. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने महाराष्ट्रात राज्य केले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा राजकारण आणि निवडणुकीपुरता वापर केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly elections 2024 udayan raje criticize sharad pawar satara district assembly election results shivendra singh raje victory ssb