राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डी येथे झालेल्या पक्षाच्या शिबिरात श्रीराम यांच्याबाबत विविध विधानं केली होती. त्यावरून राज्यसभरात गदारोळ माजला. विरोधक, भाजपा, अजित पवार गटाकडून या विधानाचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. आता महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसनेही त्यावर प्रतिक्रिया दिली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत असताना या विषयावर बोलले. त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या रामाबद्दलच्या एका विधानाला पाठिंबा दिला. तसेच त्याबद्दलचे पुरावे कुठे असतील, हेही सांगितले. मात्र राम मांसाहारी होते का? यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही.
काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
“राम बहुजन समाजाचे होते, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. त्यात तथ्य असू शकते. कारण राम मर्यादा पुरुषोत्तम होते. रामाच्या नितीनुसार देश चालविण्याचा सर्वात पहिल्यांदा महात्मा गांधी यांनी प्रयत्न केला होता. आज श्रीरामाच्या नावाने जे राजकारण करत आहेत, ते रामाच्या नितीमूल्यांवर चालत नाहीत. त्यांच्याकडून रामाचे नाव केवळ राजकारणासाठी घेतले गेले. जनतेचे हित साधण्यासाठी त्यांनी रामाचा कधीही वापर केला नाही”, अशी प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली.
जितेंद्र आव्हाड खरं बोलत आहेत
तसेच विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले, “जितेंद्र आव्हाड ज्याप्रमाणे म्हणाले की, राम बहुजन समाजाचे होते. त्यांच्या या वाक्याचे पुरावे वाल्मिकी रामायणात मिळतात. तुलसीदास यांच्या रामायणात याचे पुरावे मिळणार नाही. आजवर हजारो रामायण लिहिली गेली आहेत. वाल्मिकी रामायण वाचल्यानंतर जितेंद्र आव्हाड खरं बोलत आहेत, हे आपल्याला कळेल. प्रभू रामचंद्र हे क्षत्रिय होते. ते लढाऊ होते. म्हणूनच धनुष्य-बाण घेऊन ते अन्यायाच्या विरोधात लढले. त्यांच्याप्रमाणेच भगवान कृष्णही ओबीसी समाजाचे होते.”
राम बहुजन-ओबीसी समाजाचे असल्याचे सांगत असताना विजय वडेट्टीवार यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या मांसाहारी या विधानापासून मात्र अंतर राखले. “त्यावेळी कोण काय खात होतं? तर ही तेव्हाची गोष्ट आहे. आज यावर बोलू शकत नाही. पण वाल्मिकी रामायणानुसार श्रीराम बहुजन होते हे नक्की”, अशी प्रतिक्रिया देऊन वडेट्टीवार यांनी आपला रोख स्पष्ट केला.