राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून (२७ जून) सुरु झाले आहे. या अधिवेशनात महायुती सरकार काही घोषणा करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे विरोधक सरकारला विविध मुद्यांवरून घेरण्याच्या तयारीत आहेत. राज्यातील विविध प्रश्नांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच विरोधकांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरुन महायुती सरकारला लक्ष्य केलं.
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मुद्यांसह शेतकरी आत्महत्याच्या मुद्द्यांवरुन महायुती सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना ते पंचतारांकित शेती करतात, असा टोला लगावला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या टिकेला प्रत्युत्तर देत लंडनमधील पंचतारांकित हॉटेलपेक्षा पंचतारांकित शेती कधीही चांगली, असा टोला मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला.
मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?
“शेताच्या बांधावर जाणारे लोक आम्ही आहोत. आता त्यांनी बांद्रा सोडून कधी शेतीचा बांध पाहिला आहे का? मग शेतकऱ्यांचं दुख: त्यांना कसं कळेलं. त्यासाठी शेतावर जावं लागतं. चिखल तुडवावा लागतो. इर्शाळवाडी सारख्या ठिकाणी जावं लागतं. त्यासाठी फिल्डवर जावून काम करावं लागतं. घरी बसून सर्व गोष्टी समजत नाहीत. आता वर्क फ्रॉम होम चालत नाही. फिल्डवर जाऊन काम करावं लागतं. लंडनमधील पंचतारांकित हॉटेलपेक्षा पंचतारांकित शेती कधीही चांगली”, असा टोला मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंना लगावला. तसेच शेतकऱ्यांना कुणी फसवलं? आम्ही तर शेताच्या बांधावर जाणारे माणसं आहोत. शेतकऱ्यांशी संवाद साधणारं हे सरकार, असंही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.
उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
“घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली तेव्हाच हे जाहीर केलं होतं. पण शेतकरी आत्महत्या करत आहेत. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचं ठीक आहे, कारण त्यांची शेती पंचतारांकित आहे. हेलिकॉप्टरने जाणारे ते एकमेव शेतकरी आहेत. अमावस्या, पौर्णिमेला वेगळं पिक मुख्यमंत्री काढतात असंही कळलं आहे, असा टोला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना लगावला होता.
लोकांची सहनशक्ती संपली
“डबल इंजिन सरकारने केंद्रातल्या सरकारची मदत घेऊन राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं पाहिजे. लाडकी बहीण प्रमाणे लाडका भाऊ अशीही योजना आणा. या योजनेत स्त्री आणि पुरुष भेद करु नका. कर्ता पुरुष असतो तसं अनेक घरांमध्ये कर्ती महिलाही असते. चंद्रकांत पाटील आज मला चॉकलेट देऊन गेले. तसंच मोफत शिक्षणाचंही चॉकलेट दिलं होतं ती योजना पोकळ ठरली आहे. आता लोकांची सहनशक्ती संपली आहे. गाजर दाखवून तुमचं काम होणार नाही”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले होते.