राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनामध्ये अनेक मुद्द्यांवरून सध्या सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये किरीट सोमय्या प्रकरण व नीलम गोऱ्हेंच्या अपात्रतेचा मुद्दा गाजल्यानंतर आज तिसऱ्या दिवशी बोगस बियाण्यांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. मात्र, त्याचवेळी दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यात एक मिश्किल कलगीतुरा रंगल्याचंही पाहायला मिळालं.
मुद्दा होता प्रश्न विचारण्याचा!
विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर पहिल्या तासाभरातच सत्ताधारी व विरोधकांमध्ये बियाण्यांच्या मुद्द्यावरून खडाजंगी पाहायला मिळाली. मात्र, प्रश्नोत्तराचा तास संपता संपता फडणवीस व भास्कर जाधवांमध्ये जुंपली. प्रश्नोत्तराचा तास संपताना भास्कर जाधवांनी आपल्याला ठरवून बोलण्याची संधी दिली जात नाही, असा थेट आरोप विधानसभा अध्यक्षांवर केला. यावरून देवेंद्र फडणवीसांनी लागलीच भास्कर जाधवांच्या विधानावर आक्षेप घेतला.
“भास्कर जाधव, आपण वरीष्ठ सदस्य आहात. अशा प्रकारे अध्यक्षांवर हेत्वारोप करणं योग्य नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. मात्र, “मी निषेध करतो, माझ्यावर कारवाई करा. मी किती वेळा हात वर करतो, पण मला संधी दिली जात नाही”, असं म्हणत भास्कर जाधवांनी फडणवीसांचा मुद्दा खोडून काढण्याचा प्रयत्न केला.
“अध्यक्षांवर हेत्वारोप अयोग्य”
“भास्कर जाधव जे काही बोलले ते रेकॉर्डवर नाहीये. ते वरीष्ठ सदस्य आहेत. एका वेळी १०० सदस्यांचे हात वर असतात. अनेक लोक प्रत्येक प्रश्नात हात वर करतात. म्हणून प्रत्येक वेळी सगळ्यांना बोलायला देता येतं असं नाहीये. ज्यांचे प्रश्न असतात, त्यांना प्राधान्य मिळतं. त्यामुळे ठरवून भास्कर जाधवांना बोलू देऊ नये, असा कुणाचा हेतू असण्याचं कारण नाहीये. अशा प्रकारचा हेत्वारोप अध्यक्षांवर करणं योग्य नाहीये. भास्कर जाधव अनेकदा जास्त चिडतात. आपण चिडलो, की आपल्या तोंडून अनेकदा असे शब्द निघतात. हे योग्य नाहीये. तुम्ही अशी भूमिका बिलकुल मांडू नका, ही चुकीची भूमिका आहे”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.
भास्कर जाधवांची टोलेबाजी!
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांच्या या विधानावर भास्कर जाधवांनी मिश्किल टिप्पणी केली. “उपमुख्यमंत्रीमहोदय, आपल्या वाकचातुर्याला तोड नाहीये. आपण गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. काल अध्यक्षांनी सांगितलं की बटण दाबा, तुमचा नंबर येईल. त्यानंतर मी त्यांना इशारा केला तेव्हा ते बोलायला संधी देतो म्हणाले. मी अध्यक्षांकडे ४-५ वेळा जाऊन अनेकदा सार्वजनिक हिताची लक्षवेधी असल्याचं सांगून किमान दोन लक्षवेधी लावा असं सांगतो. मी त्यांच्याकडे अनेकदा जातो, चहा पिउन येतो. काही चुकीचं झालं तर त्यांच्या कानावर घालतो. त्यांची कारकिर्द अधिक उज्ज्वल कशी होईल, यासाठी माझा अनुभव त्यांना सांगतो. त्यांच्याशी माझं व्यक्तिगत भांडण नाहीये. मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष असताना त्यांच्या प्रचाराला मीच गेलो होतो”, असं भास्कर जाधव यांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला.
“…तर भाजपाच्या १०५ आमदारांसाठी विधानसभेबाहेर खुर्च्या लावाव्या लागतील”…
“मला वाटतं तुम्ही खासगीत अध्यक्षांना काही सांगून ठेवलंय का? मला माहिती नाही. ते जर सांगून ठेवलं असेल तर मला एकदा तुम्हीच त्यांच्याकडे घेऊन चला आणि विषय मिटवून टाका”, असा टोलाही भास्कर जाधवांनी लगावला.
फडणवीसांची मिश्किल टिप्पणी, सभागृहात हशा
दरम्यान, भास्कर जाधवांच्या या टिप्पणीवर देवेंद्र फडणवीसांनीही मिश्किल टिप्पणी केली आणि सभागृहात हास्याची लकेर उमटली. “अध्यक्षमहोदय, मला लक्षात आलंय यामागचं कारण. तुम्ही त्यांना फक्त चहा प्यायला देताय. त्यांना केक खायला घालत नाही आहात. आज त्यांना एखादा गोड केक खाऊ घाला”, अशी टिप्पणी फडणवीसांनी केली.