विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सध्या चालू असून वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये सुंदोपसुंदी पाहायला मिळत आहे. आज विधानसभेत भेसळयुक्त पदार्थांच्या मुद्द्यावर चर्चा चालू असताना अंमली पदार्थांचा मुद्दाही चर्चेला आला. यावेळी मालेगावमधील एमआयएमचे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनी कारवाईची माहिती दिली. यावेळी कुत्तागोळी आणि त्याचबरोबर ‘कुत्तीगोळी’चाही मुद्दा निघाला. शेवटी अध्यक्ष राहुल नार्वेकरांना कुत्तागोळीसाठीचा वैज्ञानिक शब्द वापरण्याची विनंती सदस्यांना केली.
नेमकं काय झालं?
मालेगाव मध्यचे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी मालेगावमधील अमली पदार्थांच्या प्रसाराचा मुद्दा उपस्थित केला. “मालेगावात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची खरेदी-विक्री होत आहे. कुत्तागोळीमुळे व इतर अमली पदार्थांमुळे नवी पिढी बरबाद होत आहे. मालेगावात नार्कोटिक्सचं ऑफिस नाहीये. त्यामुळे तिथे प्रभावी कारवाई होत नाही. सरकारकडून यावर काय कारवाई होईल?”, असा प्रश्न त्यांनी केला. त्यावर मंत्री धर्माराव बाबा अत्राम यांनी “कुत्तागोळी म्हणजे अलप्रोझोलम टॅबलेट”, अशी माहिती दिली.
“मी फ्रेंचमधून उत्तराची परवानगी देऊ शकत नाही”
धर्मराव बाबा अत्राम हिंदीतून उत्तर देत असतानाच समोरच्या बाकांवरून त्यांना “मराठीतून उत्तर द्या”, असं सांगण्यात आलं. त्यावर “त्यांनी हिंदीतून प्रश्न विचारला, हिंदीत उत्तर देईन. गोंडी म्हणाल तर त्यात उत्तर देईन. मराठीत विचारलं तर मराठीत उत्तर देईन. तेलुगुमध्ये म्हणाल तर तेलुगूत उत्तर देईन. इंग्रजीत विचारलं तर इंग्रजीत उत्तक देईन. जी भाषा महाराष्ट्रात चालते त्या भाषेत उत्तर देईन. संस्कृत येत नाही मला. फ्रेंच म्हणाल तर फ्रेंचमध्ये उत्तर देईन”, असं म्हणत विरोधकांना मिश्किल भाषेत टोला लगावला.
मात्र, अत्राम यांना मध्येच टोकत राहुल नार्वेकरांनी स्पष्टीकरण दिलं. “पण मंत्रीमहोदय, फ्रेंच भाषेत बोलायची परवानगी मी तुम्हाला देऊ शकत नाही. या सभागृहात जी अधिकृत भाषा आहे, त्यातच तुम्हाला बोलावं लागेल”, असं नार्वेकरांनी सांगताच सभागृहात हशा पिकला.
कुत्तागोळीचं काय?
दरम्यान, यावेळी धर्मराव बाबा अत्राम यांनी अमली पदार्थांसंदर्भात सरकारनं केलेल्या कारवाईबाबत माहिती दिली. त्यावर अनिल देशमुखांनी पुन्हा एकदा कुत्तागोळीचा विषय काढला. “कुत्तागोळी मार्केटमध्ये आहेच. एक कुत्तीगोळीही आहे. कुत्तागोळी म्हणजे स्ट्राँग आणि कुत्तीगोळी म्हणजे माईल्ड याची माहिती आपल्याला आहे का? ही गोळी कुठून येते? याची माहिती घेतली जाईल का? यात मध्य भारतात एकही एनसीबीचं मुख्यालय नाहीये. नागपूर अमली पदार्थांचं हस्तांतरण केंद्र आहे. त्यामुळे नागपूरला एनसीबीचं केंद्र उघडलं जाणार का?” असा सवाल अनिल देशमुख यांनी केला.
एक उमेदवार हरणार हे नक्की, पण तो कुणाचा? वाचा विधानपरिषद निवडणुकीसाठीचं पक्षीय बलाबल!
त्यावर नार्वेकरांनी “कुत्तागोळीला काहीतरी वैज्ञानिक नाव असेल. त्या नावाचा आपण वापर केला पाहिजे” असं म्हटल्यानंतर अत्राम यांनी त्याला अलप्रॅन्झोलम टॅबलेट असं नाव असल्याचं सांगितलं. यावेळी “कुत्तीगोळीबाबत मला काही माहिती नाही त्यावर माहिती घेऊन सभागृहासमोर ठेवेन. त्याशिवाय एनसीबी केंद्राबाबत गृहमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ”, असं धर्मराव बाबा अत्राम म्हणाले.