राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वात मोठी फूट पडून अवघे दोन आठवडे उलटले आहेत. गेल्या दोन आठवड्यांत अजित पवारांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी, त्यांच्यासह गेलेल्या इतर ८ जणांना मंत्रीपदं, खातेवाटप, शिंदे गटातील आमदारांच्या नाराजीच्या चर्चा, बच्चू कडूंनी सोडलेला मंत्रीपदावरचा दावा ते पावसाळी अधिवेशनाला सुरुवात अशा अनेक राजकीय घडामोडी राज्यात पाहायला मिळाल्या. या पार्श्वभूमीवर आता राजकारणात काहीही होऊ शकतं, अशी चर्चा सर्वत्र रंगू लागली असताना आज विधानसभेत काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार व शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांच्यात कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकरी मदत व शेतकरी योजनांसंदर्भातल्या प्रस्तावांवर चर्चा झाली. या चर्चेत काँग्रेस आमदार व माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बाजू मांडताना सरकारवर टीका केली. यावेळी गुलाबराव पाटलांनी बसल्या बसल्याच केलेल्या टिप्पणीवर विधानसभेत एकच हशा पिकल्याचं दिसून आलं.
नेमकं काय झालं?
विजय वडेट्टीवार यांनी यावेळी बोलताना २०१४ साली आलेलं सरकार असो वा आत्ता सत्तेत आलेलं सरकार असो, शेतकऱ्यांसाठी खूप काही केल्याचा आव आणला गेला, असा दावा केला. “आता तर काँग्रेस सोडून सर्वपक्षीय सरकार अस्तित्वात आलं आहे. तुम्ही गुलाबराव पाटील बसल्या बसल्या बोलत आहात. सांभाळून राहा जरा. कोई अंदर आता है, तो कोई बाहर जाता है.. तो सोचते रहो.. हम तो खुश है.. पर आप भी खुश रहो. हमारे दोस्त हो आप पुराने”, असं वडेट्टीवार यावेळी म्हणाले.
“हे सरकार आहे की कोण आहे? निर्लज्जपणाचा कळस…”, भास्कर जाधवांनी सांगितली ‘ती…
विजय वडेट्टीवार यांनी असं म्हणताच समोरच्या बाकांवर बसलेल्या गुलाबराव पाटील यांनी “फिर हम तुम्हारे साथ आ जाएंगे”, असं म्हणतातच सभागृहात एकच हशा पिकला. त्यावर “बहोत खुशी होगी हमें.. और वो दिन दूर नहीं ऐसा हमें लगता है”, असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला.
“सगळे संजय रिकामे करून टाकले”
दरम्यान, यावेळी आपल्या भाषणात विजय वडेट्टीवार यांनी मंत्रीपदावरून खोचक टोला लगावला. “समोरच्या बाकांवर १० सोडले तर १८ आमचेच आहेत. पुढच्या १२ पैकी ७ इकडचेच आहेत. मी काल मोजत होतो. काय अवस्था करून ठेवली. सरकार कुणाचं कळेना”, असं ते म्हणाले.
“तुमची साठमारी एवढी झालीये, काही रडतात कोपऱ्यात जाऊन. गोरेसाहेब, तुम्हीच तर पुसत होतात ना अश्रू? शिवाय संजय नावाच्या लोकांची एवढी पंचाईत करून टाकली. सगळे संजय रिकामे. ते तर बाशिंग बांधून तयार होते. पहिल्या बेंचवर १२ पैकी ७ आमचे आहेत, पाचच तुमचे आहेत १०५ पैकी”, असा टोला वडेट्टीवार यांनी यावेळी लगावला.