जगविख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर व जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. सी.एन.आर. राव यांना देशातील सर्वोच्च असणारा ‘भारतरत्न’ हा सन्मान मिळाल्याबद्दल विधानसभेत बुधवारी त्यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला.
सचिन तेंडुलकर व डॉ. सी.एन.आर. राव यांना भारतरत्न मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अभिनंदनपर प्रस्ताव विधानसभेत मांडला. क्रीडा क्षेत्रातील व्यक्तीला प्रथमच भारतरत्न मिळाले आहे. क्रिकेट खेळण्यापासून निवृत्ती घेतल्यामुळे आता यापुढे सचिन मैदानावर क्रिकेट खेळताना दिसणार नाही, याचे वाईट वाटत आहे. डॉ. सी.एन.आर. राव यांनी दीड हजारावर शोधप्रबंध सादर केले असून रसायनशास्त्रावर ४५ पुस्तके लिहिली आहेत. ते देशाला दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करीत राहतील. त्यांचे कार्य देशवासीयांसाठी प्रेरणा देणारे ठरेल. देशाच्या या दोन सुपुत्रांचे ही विधानसभा अभिनंदन करीत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनीही सचिन तेंडुलकर व डॉ. सी.एन.आर. राव यांचे अभिनंदन केले. सचिनच्या कर्तृत्वाचा आढावा घेऊन त्याच्यासोबत खेळलेल्या एका प्रदर्शनीय सामन्यातील आठवण त्यांनी सांगितली. शिवसेनेचे गट नेते सुभाष देसाई, आमदार देवेंद्र फडणवीस यांनीही सचिन तेंडुलकर आणि डॉ. राव यांच्या कार्यावर प्रकाश टाकून अभिनंदन केले. क्रिकेटमध्ये सचिनचे उत्तुंग कार्य आहे. मुंबईत सुसज्ज असे क्रीडा संग्रहालय उभारण्याची घोषणा तत्कालीन अर्थमंत्री सुनील तटकरे यांनी २५ मार्च २०१० रोजी सभागृहात केली होती, त्याप्रमाणे क्रीडा संग्रहालय उभारण्यात यावे आणि सचिन तेंडुलकरवर पाठय़पुस्तकात एक धडा समाविष्ट करण्यात यावा, अशी मागणी या प्रस्तावावर बोलताना आमदार शिंदे यांनी केली. क्रीडा संग्रहालयाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात करावी, अशी मागणी विरोधी सदस्यांनी केली. याबाबत माहिती घेऊन सभागृहाला अवगत करण्यात येईल, असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यावर एकनाथ खडसे यांनी हे अधिवेशन संपण्यापूर्वी सरकारने क्रीडा संग्रहालयाची घोषणा करावी, अशी मागणी केली. हे संग्रहालय उभारण्यासाठी निधीची कमतरता पडू नये, गरज भासली तर सरकारने कर्ज काढावे. विरोधी पक्ष कोणतीही हरकत घेणार नाही, असेही खडसे म्हणाले.

Story img Loader