Satyapal Malik meets Uddhav Thackeray: जम्मू आणि काश्मीर, गोवा आणि मेघालय या राज्यांचे राज्यपाल पद भूषविलेले आणि एकेकाळी भाजपाशी संबंधित असलेल्या सत्यपाल मलिक यांनी आज शिवसेना उबाठा गटाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा आपण प्रचार करणार असून या निवडणुकीत भाजपाचा सुपडा साफ होईल, अशी प्रतिक्रिया मलिक यांनी या भेटीनंतर दिली.

उद्धव ठाकरेंची भेट घेऊन बाहेर आल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना सत्यपाल मलिक म्हणाले, “विधानसभा निवडणुकीत भाजपाला नुसताच फटका बसणार नाही तर या निवडणुकीत त्यांचा सुपडा साफ होईल. या निवडणुकीत उद्धव ठाकरे महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे कुणाला काळजी करण्याची गरज नाही.”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारवरी मलिक यांनी जोरदार टीका केली. इंग्रजीमधील ‘लास्ट नेल इन बीजेपी कॉफिन’ ही प्रसिद्ध ओळ उद्धृत करत मलिक म्हणाले की, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल हे भाजपासाठी अंताची सुरुवात असेल.

माध्यमांशी बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे महत्त्व विशद केले. विधानसभेचे जे निकाल येतील, त्याच्यावरून संबंध देशातील राजकीय परिस्थिती ढवळून निघणार आहे, असा अंदाज त्यांनी वर्तविला. सत्यपाल मलिक जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल असतानाच अनुच्छेद ३७० बाद करून जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्यात आला होता.

महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यादरम्यान ही लढाई होणार आहे.

शिंदे गटाकडून प्रत्युत्तर

सत्यपाल मलिक यांच्या भेटीवर प्रतिक्रिया देताना शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले की, राज्यपाल निवृत्त झाल्यानंतर भेटीगाठी घेतच असतो. त्यांनाही कुठे जागा राहिलेली नाही. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून पुन्हा राजकारणात प्रवेश करण्याचा प्रयत्न ते करत आहेत.