राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. या अधिवेशनात राज्यातील विविध प्रश्नांवर विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षण, ओबीसींच्या मागण्या, शेतकऱ्यांचे प्रश्न यासह आदी महत्वाच्या विषयांनी हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. तर महायुती सरकार या अधिवेशनात काही मोठ्या घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही दिवसांनी विधानसभेची निवडणूक असल्यामुळे विधिमंडळाचं हे अधिवेशन महत्वाचं मानलं जात आहे.

या अधिवेशनासाठी आज विधानभवनात सत्ताधारी पक्षातील नेते, मंत्री, आमदार तसेच विरोधी पक्षातील नेते, दाखल झाले. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील आज अधिवेशनासाठी विधानभवनात आले. मात्र, यावेळी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे एकाच लिफ्टमधून सभागृहात दाखल झाले. महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन मोठ्या नेत्यांची भेट झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. यानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना या भेटीवर मिश्किल शब्दांत प्रतिक्रिया दिली. “ना ना करते प्यार…”, असं म्हणत आता आमच्या पुढच्या गुप्त बैठका लिफ्टमध्येच करू, असा टोलाही त्यांनी लगावला.

हेही वाचा : विधान भवनात चंद्रकात पाटील – उद्धव ठाकरेंची भेट, राज्याच्या राजकारणात खळबळ; भेटीचं कारण काय?

नेमकं काय घडलं?

विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी देवेंद्र फडणवीस आणि इतर काही नेते सभागृहात जाण्यासाठी लिफ्टच्या बाहेर उभे होते. त्याचवेळी त्या लिफ्टच्या जवळ माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर आले. यानंतर उद्धव ठाकरे, मिलिंद नार्वेकर, देवेंद्र फडणवीस आणि इतर काही नेते एका लिफ्टमधून सभागृहात दाखल झाले. मात्र, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच लिफ्टमधून सभागृहात दाखल झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीवर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“लिफ्टमध्ये देवेंद्र फडणवीस आणि आम्ही एकत्र होतो. आता यावरून अनेकांना असं वाटलं असेल की ते एक गाणं आहे. ना ना करते प्यार…, म्हणून तुम्ही से प्यार कर बैठे, असं काही नाही. ती भेट एक योगायोगाने झालेली भेट होती. ते म्हणतात ना, भिंतीला कान असतात. मात्र, लिफ्टच्या भिंतीला कान नसतात. त्यामुळे आम्ही या पुढच्या आमच्या गुप्त बैठका लिफ्टमध्येच करू”, अशी मिश्किल प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

चंद्रकांत पाटलांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

विधानभवनात एक वेगळं चित्र राज्यातील जनतेला पाहायला मिळालं. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं विधानभवनात कार्यालय आहे. या कार्यालयात उद्धव ठाकरे विधिमंडळ परिसरात दाखल झाले. काही वेळाने भाजपा नेते तथा राज्याचे संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दानवे यांच्या कार्यालयात जाऊन उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाच्या सर्व आमदारांचं स्वागत केलं. चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व आमदारांचं स्वागत करून त्यांना चॉकलेटही दिलं. तर उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांना पेढा दिला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं.