विधीमंडळ अधिवेशन सुरू होण्यापूर्वी आज (२४ ऑगस्ट) विधीमंडळ पायऱ्यांवर विरोधक घोषणाबाजी करत असताना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि शिंदे गटातील आमदार महेश शिंदे यांच्यात धक्काबुक्की झाली. या घटनेनंतर विधीमंडळातही मोठा गदारोळ झाला. दरम्यान, या घटनेनंतर शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी मिटकरी हे प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी माकडचाळे करत असतात, असे विधान केले. त्यांच्या याच विधाला आता मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. गुवाहाटी आणि सुरतमध्ये तुम्ही काय चाळे केले, हे लवकरच सांगणार आहे, असा पलटवार मिटकरी यांनी केला. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> “एक नाही दहा नाही, हजार वेळा माफी मागणार, पण…,” विधीमंडळ पायऱ्यांवरील धक्काबुक्कीनंतर अमोल मिटकरी आक्रमक

“प्रताप सरनाईक माझ्यापेक्षा मोठे आहेत. त्यामुळे मी माकडचाळे करतो असे ते म्हणत असतील तर हरकत नाही. पण अमोल मिटकरी घाबरणारा नाही. कोणाच्या दहशतीला घाबरून जाणारा पळपुटा नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. नवाब मलिक, अनिल देशमुख हे पळून नाही गेले. ती शरद पवार यांची शिकवण आहे,” असे अमोल मिटकरी म्हणाले.

हेही वाचा >> “पायऱ्यांवरती फिफ्टी-फिफ्टी, गद्दार, खोके बोलून…”; मुख्यमंत्री शिंदेंच्या खासदार पुत्राचा आदित्य ठाकरेंना टोला

“तुम्ही मला माकडचाळे म्हणा किंवा आणखी काही म्हणा. पण तुम्ही काय चाळे केले आहेत हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. गुवाहाटी, सुरतला राहून त्यांनी काय चाळे केले, हे भविष्यात नक्की सांगेन,” अशी टीका त्यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर केली.

हेही वाचा >> झारखंड : मुख्यमंत्री सोरेन यांच्या निकटवर्तीयाच्या निवासस्थानी ईडीची छापेमारी, ए.के.४७ रायफल्स आणि जिवंत काडतुसे जप्त

प्रताप सरनाईक काय म्हणाले?

शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर झालेल्या गोंधळावर भाष्य केले. यावेळी त्यांनी अमोल मिटकरी यांच्यावर टीका केली. “कोणीही कोणाला धमकावण्याचा प्रयत्न केला नाही. अमोल मिटकरी प्रसिद्धीमध्ये येण्यासाठी जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्ये करतात. ते काही ना काही उपद्व्याप आणि माकडचाळे करत असतात. दुसरे अनेक आमदार होते. मात्र त्यांनी धक्काबुक्की का केली नाही? अमोल मिटकरी हे जाणीवपूर्वक स्वत:ची पोळी भाजण्यासाठी अशा प्रकारचे काम करतात,” असे प्रताप सरनाईक म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly session amol mitkari criticizes pratap sarnaik on guwahati and surat tour of shinde group mla prd