बेळगावमध्ये सीमावाद पेटलेला असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आपल्या नावे बनावट ट्वीट केले जात असल्याचा दावा केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह झालेल्या बैठकीत बोम्मई यांनी हा दावा केला होता. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बोलताना हे ट्वीट करणाऱ्याची माहिती मिळाली असल्याचं सांगितलं आहे.

हिवाळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच सीमावादाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर ताशेरे ओढत, आपल्या सरकारने बंद पडलेल्या सर्व योजना सुरु केल्याचं सांगितलं. तसंच सीमावासीयांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे असं आवाहन विरोधकांना केलं.

“अजित पवार यांनी मांडलेला मुद्दा महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. पण पहिल्यांदाच देशाच्या गृहमंत्र्यांनी याप्रकरणी हस्तेक्षप करत मध्यस्थी केली. मला वाटतं हे पहिल्यांदाच घडलं आहे. त्यांनी हा विषय गांभीर्याने घेतला आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय असल्याने त्यांनी बैठक घेतली. आम्ही यावेळी ठोस भूमिका घेतली. आमच्या लोकांना, गाडयांना अडवलं जात असल्याचं त्यांना सांगितलं. यावर आमच्याकडूनही प्रतिक्रिया उमटवू शकतात असंही आम्ही त्यांना म्हणालो,” अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

Maharashtra Assembly Session: “ए शांत बसा रे”, CM शिंदे विरोधकांवर संतापले; अजित पवारांना म्हणाले “भुजबळांनी मार खाल्ला आणि त्यांच्यामुळे…”

“अमित शाह यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनाही सूचना केल्या आहेत. प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे याचं भान सर्वांनी ठेवलं पाहिजे. त्यांनी स्वत: बाहेर येऊन केंद्र सरकारची भूमिका मांडली. त्यांनी स्पष्टपणे भूमिका घेतल्याचं अभिनंदन करायला हवं होतं,” असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

“यापूर्वी कोणती सरकारं केंद्रात, महाराष्ट्र आणि कर्नाटकात होती हे सर्वांना माहिती आहे. एकीकरण समितीने जे आंदोलन पुकारलं आहे, यापूर्वी असं आंदोलन कधी झालं आहे याची माहिती घ्या. कोणत्या सरकारने परवानगी दिली याचीही माहिती घ्या,” असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं.

“सीमाभागातील लोकांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. राजकारण करण्यासाठी अनेक मुद्दे आहेत,” असंही त्यांनी सांगितलं. “यापूर्वीच्या सरकारने मुख्यमंत्री धर्मादाय निधीचे पैसे बंद केले होते. आम्ही चार महिन्यात बंद केलेल्या योजना सुरु केल्या. सीमावासी लोक जे ठराव करतात त्यामागे कोणथे पक्ष असतात याची माहिती पोलिसांकडून आली आहे,” अशी माहिती शिंदेंनी दिली. यावेळी विरोधक आमदार गदारोळ घालत असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांना ‘ए बसा’ म्हणत फटकारलं.

“भगतसिंग कोश्यारींचा अश्वारूढ पुतळा उभारून…”; महापुरुषांच्या अपमानावरून शिवसेनेचं शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्र

“आम्ही मुख्यमंत्र्यांना समोरामसोर चर्चेदरम्यान तुम्ही ट्वीट करत असून हे चुकीचं आहे असं सांगितलं. त्यावर त्यांनी हे आमचं ट्वीट नाही सांगत नकार दिला. हे ट्वीट ज्यांनी केलं आहे त्यांचीही माहिती त्यांना मिळाली आहे. या ट्वीटमागे कोणता पक्ष आहे याचीही माहिती मिळेल,” असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

“सीमावासीयांसाठी भुजबळांनी मार खाल्ला आहे, त्यांच्यामुळे आम्हालाही मिळाला आहे. आम्ही जेल भोगले आहेत. त्यावेळी बोलणारे कुठे होते?,” अशी विचारणा मुख्यमंत्र्यांनी केली. यावर विरोधक गदारोळ घालू लागल्यानंतर शिंदेंनी पुन्हा एकदा त्यांना शांत बसा म्हटलं. सीमावासीयांच्या मागे उभं राहिलं पाहिजे, लढ्याला पाठिंबा दिला पाहिजे. बाळासाहेबांची हीच भूमिका होती असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

Story img Loader