राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून (२७ जून) सुरु झाले आहे. या अधिवेशनात महायुती सरकार मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे विरोधक सरकारला विविध मुद्यावरून घेरण्याच्या तयारीत आहेत. राज्यातील विविध प्रश्नांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. तसेच आता येत्या काही महिन्यात विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे पावसाळी अधिवेशन महत्वाचे मानले जाते. या अधिवेशनात सरकार राज्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने काही महत्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे.
असे असेतानाच अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच राज्याच्या राजकारणात एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकाच लिप्टमधून प्रवास केला आहे. अधिवेशनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानवनात दाखल झाले होते. याचेवेळी उद्धव ठाकरे ही देखील विधानभवनात दाखल झाले. यावेळी सभागृहात जात असताना देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला. या काही मिनिटांच्या भेटी दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये काही राजकीय चर्चा झाली का? याबाबत आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.
हेही वाचा : उद्धव ठाकरे, फडणवीस विधान भवनाच्या एकाच लिफ्टमध्ये… काय चर्चा झाली? भुजबळ म्हणाले…
नेमकं काय घडलं?
देवेंद्र फडणवीस आणि इतर काही नेते सभागृहात जाण्यासाठी लिफ्टच्या बाहेर उभे होते. त्याचवेळी त्या लिफ्टच्या जवळ उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर आले. यानंतर उद्धव ठाकरे, मिलिंद नार्वेकर, देवेंद्र फडणवीस आणि इतर काही नेते एका लिफ्टमधून सभागृहात दाखल झाले. दरम्यान, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या भेटीवर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. या भेटीसंदर्भात उद्धव ठाकरे यांनीही स्पष्टीकरण दिलं असून ही भेट योगायोगाने झाली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
“लिफ्टमध्ये देवेंद्र फडणवीस आणि आम्ही एकत्र होतो. आता यावरून अनेकांना असं वाटलं असेल की ते एक गाणं आहे. ना ना करते प्यार…, म्हणजे ज्यांचा काही संबंध नाही. ना ना करते प्यार…, तुम्ही से प्यार कर बैठे, असं काही होणार नाही. ती भेट एक योगायोगाने झालेली भेट होती. ते म्हणतात ना, भिंतीला कान असतात. मात्र, लिफ्टच्या भिंतीला कान नसतात. त्यामुळे आम्ही या पुढच्या आमच्या गुप्त बैठका लिफ्टमध्येच करू”, अशी मिश्किल प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.
दरम्यान, या अधिवेशनात आरक्षणाचा विषय गाजण्याची शक्यता आहे. यावर सरकार कशा पद्धतीने मार्ग काढणार? विरोधक सरकारविरोधात कोणते मुद्दे मांडणार? याकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागलं आहे.