राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं निलंबन करण्यात आल्यानंतर महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. विधानसभा अध्यक्षांना उद्देशून अपशब्द वापरल्यामुळे जयंत पाटील यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत जयंत पाटील यांचं निलंबन असणार आहे. यानंतर जयंत पाटील यांनी ट्वीट केलं असून सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जयंत पाटील यांनी ट्वीट केलं असून या निर्लज्ज सरकारविरोधात लढत राहणार असं म्हटलं आहे. “या निर्लज्ज सरकारविरोधात लढत राहणार. बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय,” असं ट्वीट जयंत पाटील यांनी केलं आहे.

नेमकं काय घडलं?

विधानसभेमध्ये दिशा सालियान मृत्यू प्रकरणावर चर्चा झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाकडून अनेक दावे करण्यात आले होते. यादरम्यान झालेल्या गोंधळामुळे ६ वेळा कामकाज तहकूब करण्यात आलं. त्यानंतर कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांकडून आमदार भास्कर जाधव यांना बोलू देण्याची विनंती करण्यात आली. ही मागणी विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावली. त्यावरून विरोधकांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली.

“तुम्ही असा निर्लज्जपणा करू नका”, जयंत पाटलांनी थेट अध्यक्षांनाच सुनावलं, अधिवेशन संपेपर्यंत निलंबनाची कारवाई!

यानंतर अजित पवारांनीही भास्कर जाधव यांना बोलू देण्याची विनंती केली. दरम्यान, भास्कर जाधवांना बोलू दण्याची मागणी फेटाळून लावल्यानंतर जयंत पाटील यांना बोलू देण्याची विनंती करण्यात आली. भास्कर जाधवांनीही तशी मागणी करायला सुरुवात केली.”आमची हरकत आहे. १४ सदस्य समोरून बोलले, १४ वेळा कामकाज तहकूब केलं. आम्हाला एका सदस्याला बोलू देत नाही. तुम्ही सदस्यांचा जीव घेताल अध्यक्ष महोदय”, असं भास्कर जाधव म्हणाले.

याचवेळी जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना उद्देशून “तुम्ही असा निर्लज्जपणा करू नका”, असं म्हटलं. त्यावेळी सत्ताधारी बाकांवरून आमदारांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. “जयंत पाटील यांना निलंबित करा”, अशी मागणी आमदारांनी केली. विधानसभा अध्यक्षांनीही “जयंत पाटील, हे आपल्याकडून अपेक्षित नाही”, असं म्हणत नाराजी व्यक्त केली आणि कामकाज तहकूब केलं. यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीमध्ये विधानसभा अध्यक्षांविषयी असंवैधानिक शब्दप्रयोग केल्याचा आरोप जयंत पाटलांवर ठेवण्यात आला. यावर विधानसभा अध्यक्षांनी जयंत पाटलांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्याची कारवाई केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly session ncp jayant patil tweet after suspension during winter session sgy
Show comments