राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाचा दुसरा दिवस चांगलाच वादळी ठरला. अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. मागील काही दिवसांपूर्वी रंगलेल्या सत्तानाट्यावरही या अधिवेशनात नेत्यांनी भाष्य केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर आपल्या शिवसेनेतील बंडाबद्दल बोलताना तुफान फटकेबाजी केली. बंडखोर आमदारांना गुजरातमध्ये कसे नेण्यात आले? यावर बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना उद्देशून बाकीचं खासगीत सांगेन असे मिश्किल भाष्य केले. तसेच पुढे त्यांनी शिवसेनेने बेळगावमध्ये केलेल्या आंदोलनाचा खास किस्सा सांगितला.
हेही वाचा >> विधानसभेच्या दारात शिवसेनेच्या बंडखोर आमदाराला पाहताच त्याच्या जवळ जाऊन आदित्य ठाकरे म्हणाले, “तुम्ही असं…”
“छगन भुजबळ बेळगावला वेश बदलून गेले होते. तिकडे गेल्यावर भुजबळ यांच्यासोब असलेल्या लोकांनी कर्नाटकच्या पोलिसांना मारले. त्यानंतर महाराष्ट्रातून आमची १०० लोकांची तुकडी गेली. तेव्हा शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला त्या लोकांनी खूप मारलं. नंतर आम्हाला बेल्लारीच्या तुरुंगात टाकण्यात आलं. आम्ही १०० लोक ४० दिवसांसाठी तुरुंगात होतो,” अशी माहिती शिंदे यांनी दिली.
हेही वाचा >> महाभारत, रामायण ते पानिपतचं युद्ध, अधिवेशनात भास्कर जाधवांचं खणखणीत भाषण, भाजपावर टीकेचे आसूड
तसेच, “आम्ही ज्या तुरुंगात गेलो होतो, तिथे रविवारी अंडी खायला मिळत. मात्र आम्ही गेल्यावर तेही बंद करण्यात आलं. चाळीस दिवस आमचे खूप हाल झाले. पण आम्ही घाबरलो नाही. डगमगलो नाही. तेव्हा आनंद दिघे यांनी एक-एक लाख रुपये जमवून १०० लोकांना जामीन मिळवून दिला,” अशी आठवण एकनाथ शिंदे यांनी सांगितली.
हेही वाचा >> “देवेंद्र फडणवीस सर्वात नशीबवान आमदार” म्हणत विधानसभेत अजित पवारांची तुफान टोलेबाजी
तसेच, एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी लोकशाहीत आकडा बोलतो. आमच्याकडे बहुमत आहे. त्यामुळे आता सर्व विसरुन राज्याच्या विकासासाठी काम करुया. राज्य शेतकरी आत्महत्या मुक्त करायचे आहे. त्यासाठी आम्ही काम करु. तसेच लवकरच पेट्रोलवरील व्हॅट कमी करु, असे आश्वासनही त्यांनी दिले.