मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्यात सत्तांतर झाले. या सत्तासंघर्षादरम्यान देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री होतील, असा अंदाज बांधला जात होता. मात्र अनपेक्षितपणे मुख्यमंत्रीपदाची माळ एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात पडली. तर दिल्लीवरून आदेश आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबादारी स्वीकारली. याच मुद्द्याला घेऊन राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी आज (२४ ऑगस्ट) विधीमंडळात जोरदार टोलेबाजी केली. त्यांनी पंतप्रधानदाच्या शर्यतीत असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आलं. भाजपाने हा महाराष्ट्राच्या एका नेत्याचा अपमान केला आहे, असा खोचक टोला लगावला.
हेही वाचा >>> “शिरसाट यांचं काय होणार? एक टोपी घेतली, दुसरीवर अन्याय का?” जयंत पाटलांची तुफान फटकेबाजी; सभागृहात पिकला हशा
“आमदार सुरत, गुवाहाटी असा प्रवास करून राज्यात परतले. या प्रवासानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे आम्हाला वाटत होते. माझी भारतीय जनता पक्षाबद्दल माझी नाराजी आहे. देवेंद्र फडणवीस हे वाढणारे नेते आहेत. ते पुढच्या आठ दहा वर्षात ते पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असतील. मात्र त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले. याच कारणामुळे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असणाऱ्या महाराष्ट्राच्या एका नेत्याचा अपमान भाजपाने केला आहे,” असे खोचक भाष्य जयंत पाटील यांनी केले.
हेही वाचा >>> “ज्याने अँटिलियासमोर स्फोटकं ठेवली त्यांच्याकडून उद्धव ठाकरे…”, अतुल भातखळकरांचे गंभीर आरोप
तसेच पुढे बोलताना त्यांनी भाजपा, शिंदे गटातील काही नेत्यांची नावे घेऊन खातेवाटपानंतर झालेल्या नाराजीनाट्यावर मिश्किल टिप्पणी केली. “चंद्रकांत पाटील यांच्यावर अन्याय झाला. त्यांना उच्च व तंत्रशिक्षण खातं देण्यात आलं. गुलाबराव पाटील हा एकच ध्रुवतारा तुमच्या मंत्रीमंडळात आहे. त्यांचं पाणीपुरवठा खातं कोणी बदललं नाही. शंभूराज देसाई यांना उत्पादन शुल्क मंत्रीपद देण्यात आलं. एखाद्या वाढणाऱ्या नेत्याला उत्पादन शुक्ल खातं देण्यात आलं. हे खातं चांगलं आहे का?” असे जयंत पाटील म्हणाले.
हेही वाचा >>> “इकडे या, कुठलीही भानगड न ठेवता मुख्यमंत्रीपद देऊ!” भर सभागृहात जयंत पाटलांची एकनाथ शिंदेंना ऑफर
“तुम्ही अब्दुल सत्तार यांना मंत्री केलं. संदीपान भुमरे यांना मंत्री केलं. आता आमच्या संजय शिरसाट यांचं काय होणार? शिरसाट यांना काही चान्स आहे का? एका जिल्ह्यात दोन मंत्री झाले. संजय शिरसाट यांना कसं अॅडजस्ट करणार? हरिभाऊ रोठोड यांनी आरएसएसचं काम खूप वर्षे केलं. त्यांना एकदा विधानसभेचं अध्यक्ष केलं. त्यावेळी ते चिडले होते. औरंगाबाद जिल्ह्याची एक टोपी घेतली मग दुसरी टोपी का नाही घेतली? जी निष्ठेची टोपी आहे ती बाहेर ठेवली,” अशी टोलेबाजी जयंत पाटील यांनी केली.