Maharashtra Assembly Speaker Election Live, 03 July 2022: विधानसभेच्या दोनदिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. राहुल नार्वेकर यांनी बहुमताचा आकडा पार करत सहजपणे अध्यक्षपद जिंकलं. आधी आवाजी मतदान आणि नंतर प्रत्यक्ष मतमोजणी करण्यात आली. राहुल नार्वेकर यांनी १६४, तर शिवसेनेच्या राजन साळवी यांना १०७ मतं मिळाली. यानिमित्ताने एकनाथ शिंदे आणि भाजपाने पहिली लढाई जिंकली आहे. आता उद्या म्हणजेच सोमवारी विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार असून शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून शक्तीप्रदर्शन केलं जाण्याची शक्यता आहे.
सरकार स्थापन केल्यावर लगेचच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिंदे यांना बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार रविवार आणि सोमवार असे दोन दिवस विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. सोमवारी विश्वासदर्शक जाईल.
भाजपाचे राहुल नार्वेकर विधानसभेचे नवे अध्यक्ष, १६४ मतांनी विजयी; शिवसेनेच्या राजन साळवी यांना १०७ मतं
शिंदे गटाकडून प्रतोद भरत गोगावले यांनी व्हीपविरोधात मतदान करणाऱ्या १६ आमदारांविरोधात (ठाकरे गटातील) तक्रार दाखल केली आहे. शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहिण्यात आले आहे. अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात भरत गोगावले यांचा शिवसेनेचे प्रतोद असा उल्लेख करण्यात आला. विधानसभा अध्यक्ष यांनी भरत गोगावले यांच्या पत्राचं अधिवेशनादरम्यान वाचन केलं.
बंडखोर आमदारांचे निलंबन होणार आहे. यासाठी दोन तीन महिन्यांचा वेळ लागेल. विरोधी पक्षनेते पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची चर्चा होणार आहे. त्यासंदर्भात योग्य तो निर्णय शरद पवार घेतील, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी दिले.
“विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ३९ आमदारांनी व्हीप न पाळल्यामुळे राजन साळवी यांचा पराभव झाला. उपाध्यक्ष असताना निवडणूक झाली आणि त्याच वेळी आम्ही पत्र दिले आहे. त्यानंतर भरत गोगावलेंनी नव्या अध्यक्षांना पत्र दिल्याने मला वाटत नाही की त्या पत्राला काही अर्थ असेल,” असे सुनील प्रभू म्हणाले.
बंडखोर आमदारांनी व्हीप मोडलेला आहे आणि उपाध्यक्षांकडे याचा विरोध केला आहे. एकाही पळालेल्या आमदाराने डोळ्यात डोळे घालून पाहण्याची हिंमत केली नाही. सगळे डोळे चोरून खाली किंवा दुसरीकडे बघत होते. आज त्यांनी आमच्याकडे पाहिले नाही पण मतदारांकडे गेल्यानंतर काय सांगणार? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला.
कामकाजाच्या शेवटी शोकप्रस्ताव मांडण्यात आलं. नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शोकप्रस्ताव वाचून दाखवला. आजच्या दिवसाचं कामकाज संपलं आहे. आता उद्या सकाळी ११ वाजता विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार असून सरकारची मुख्य परीक्षा असणार आहे. राहुल नार्वेकर यांच्या निमित्ताने सरकारने पहिली लढाई जिंकली आहे.
मी जावई असल्याचं सांगत अजित पवार, जयंत पाटील यांनी काळजी घेण्यास सांगितलं. पण त्यांनीही जावयाची काळजी घेणं अपेक्षित आहे. त्यामुळे योग्य सहकार्य मिळेल यात शंका नाही असं राहुल नार्वेकर म्हणाले.
गेल्या काही दिवसात अनेक धक्के, भूकंप आले. त्यातील एक धक्का मलाही मिळाला. माझी निवड झाली असं सांगत त्यांनी पक्षाचे आभार मानले.
राहुल नार्वेकर यांनी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासहित सर्वांचे आभार मानले. महत्वाची विधायके चर्चेविना पारित केले जाणार नाहीत असं आश्वासन यावेळी त्यांनी दिलं. तसंच नियमांचं पालन केलं जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. याच सभागृहात चार माजी विधानसभा अध्यक्ष असल्याने हे माझं भाग्य असल्याचंही ते म्हणाले आहेत.
शिंदे गटाकडून प्रतोद भरत गोगावले यांनी व्हीपविरोधात मतदान करणाऱ्या १६ आमदारांविरोधात तक्रार केली आहे. शिवसेनेचे प्रतोद असा त्यांचा उल्लेख करण्यात आला. विधानसभा अध्यक्ष यांनी भरत गोगावले यांच्या पत्राचं वाचन केलं.
विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मोबाईलवरील एक मेसेज वाचून दाखवत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना टोला लगावला. या टोलेबाजीनंतर सभागृहात एकच हशा पिकला.
धनंजय मुंडे यांनी चुकून मिलिंद नार्वेकर उल्लेख केला असता यावेळी इतर सदस्यांनी रोखलं. यानंतर एकच हशा पिकला. यानंतर सुनील प्रभू यांनी हे नाव रेकॉर्डवरुन काढून टाकण्याची मागणी केली. "कोणतंही विधेयक चर्चेविना पारित केलं जाऊ नये. सर्वांना त्यावर बोलण्यासाठी वेळ दिला जावा," अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
पहिल्या रांगेतील सदस्य बोलण्यासाठी फार वेळ घेत असल्याने मागे बसणाऱ्यांना संधी मिळत नाही अशी खंत हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केली. संभाजीराजेंचे हाल करत मारणाऱ्याचं नाव शहराला मान्य नाही असं सांगत त्यांनी अबू आझमींना उत्तर दिलं. सर्वच मुस्लिमांना औरंगजेबाचं नाव मान्य नाही. अनेक मुस्लिम मुलांचं नाव औरंगजेब ठेवत नाहीत असं हरिभाऊ बागडे म्हणाले.
हे अभिनंदनाचं भाषण असल्याने राजकीय भाष्य करायचं नसतं. मगाशी येथे व्हीपचा उल्लेख झाला. आम्हीदेखील व्हीपचा उल्लेख करु शकलो असतो. आम्हीदेखील अपात्रतेची कारवाई करु शकतो. पण आज आम्हाला त्यावर बोलायचं नाही आहे असं सांगत दीपक केसरकर यांनी सुनील प्रभू यांच्यावर टीका केली आहे.
एक तरुण व्यक्ती महत्वाच्या स्थानी बसली आहे याचा आनंद आहे. राजकारणाची पातळी खूप खालावत चालली आहे. किती तरुणांना राजकारणात उतरावंसं वाटेल असं मी म्हणत असतो. तुम्ही हा विचार बदलला अशी आशा आहे. प्रत्येकाचा आवाज आपण ऐकावा अशी आशा आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.
सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवारांना कानात सांगण्यास सांगितलं. आम्ही फडणवीसांच्या कानात सांगितलं तसं झालं असतं तर आज वेगळी परिस्थिती असती असं सांगत आदित्य ठाकरेंनी टीका केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी विधानसभा अधिवेशनात नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविषयी बोलताना जोरदार टोलेबाजी केली. "राहुल नार्वेकर फार हुशार आहेत. त्यांच्याविषयी मला एका गोष्टीचं खूप कौतुक वाटतं. ते ज्या पक्षात जातात त्या पक्षाच्या नेतृत्वाला ते आपलंसं करतात," असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं. तसेच नार्वेकरांचं कायद्याचं ज्ञान चांगलं आहे. अशा लोकांवर आम्ही देखील लक्ष ठेवून असतो, असं नमूद केलं. यावेळी सभागृहात एकच हशा पिकला.
अध्यक्षांचा आदर व्हावा यासाठी आपण काही यंत्रणा आणली पाहिजे. सदस्याला पूर्ण बोलू द्यावं यासाठीही प्रयत्न करणं गरजेचं आहे. एखादा सदस्य व्यक्त झाल्यावर बोलण्याची संधी असते असं जयंत पाटील म्हणाले.
"आमचे जावई असल्याने आम्हाला योग्य न्याय मिळेल अशी आशा आहे. नाही तर संध्याकाळी आमच्या घरी मुलीला काय केलं ते कळवू. मग संध्याकाळी आपला समाचार घेण्याची विनंती करु," असं मिश्कीलपणे जयंत पाटील म्हणाले.
अजित पवार म्हणाले मुख्यमंत्री बनण्याविषयी माझ्या कानात सांगितलं असत तर आम्ही मुख्यमंत्री केलं असत. अजितदादा तुम्हाला वाटलं मुख्यमंत्री व्हावं तर मी सांगतोय येऊन आमच्या कानात सांगा असा टोलाही सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला. जयंत पाटील यांच्या कानात मात्र सांगू नका असंही ते मिश्कीलपणे म्हणाले.
"या सभागृहाचं कामकाज उत्तम होण्यासाठी आदित्य ठाकरे गुरुदक्षिणा देऊ शकतील. उरलेले इतरही देतील," असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे. "राहुल गांधींचा आदेश आला की तुम्ही झोपता पण या राहुल गांधींचं ऐकाल अशी आशा असल्याचंही ते म्हणाले. जावई हा देवासमान असतो ही आपल्या शास्त्रातील भावना आहे. त्यामुळे वरील सभागृहात काही अडणार नाही असा मला विश्वास आहे," असं सुधीर मुंनगंटीवार म्हणाले आहेत.
भास्कर जाधव यांनी अबू आझमी यांच्यावर आक्षेप घेतला आणि मुस्लिमांची नावं काढली जात आहे या वाक्याला विरोध केला. औरंगजेब अतिरेकी होता, त्याने आमच्यावर अत्याचार केला म्हणून नाव बदलून संभाजी महाराजांचं नाव दिलं आहे. मुस्लिम आणि हिंदू असा भेदभाव नाही इतकंच सांगायचं आहे असं ते म्हणाले.
शहरांची नावं बदलून काय होणार आहे? बाळासाहेबांच्या नावे मोठी शहरं बनवा, आम्ही टाळ्या वाजवून स्वागत करु. मुस्लिमांची नावं असलेल्या शहरांची नावं बदलून काय उदाहरण दिलं जात आहे? अशी विचारणा अबू आझमी यांनी केली आहे.
आपण अध्यक्ष होत असताना सदनात आमचा व्हीप जुगारुन ३९ सदस्यांनी विरोधात मतदान करत लोकशाहीची पायमल्ली केली हे इतिहास विसरणार नाही. ही खंत १३ कोटी जनतेच्या मनात असेल असं सांगत सुनील प्रभू यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला.
१०-१५ दिवसांपूर्वी सत्तेचे वारे वाहू लागले तुम्ही कायदेमंत्री व्हाल असं वाटलं होतं. या राज्यात काहीही घडू शकतं. ज्यांना मुख्यमंत्री म्हणून पाहत होतो ते उपमुख्यमंत्री झाले. आमचं दु:ख विसरुन फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याचं दु:ख वाटू लागलं असं सुनील प्रभू म्हणाले आहेत.
एकनाथ शिंदे शिवसेनेच्या शाखा प्रमुखापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले. आता फडणवीस तुमचं अभिनंदन कसं करावं असा प्रश्न पडला आहे. भुजबळांनी उल्लेख केलेल्या बुद्धिबळाच्या खेळाकडे तुमचंच लक्ष नव्हतं असं वाटत आहे असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
तुमची आदित्य ठाकरेंशी जवळीक होती. अजित पवारांना त्यांच्यासोबत असणारं नातं सांगितलं. पण मग तुम्ही काँग्रेसच का बाजूला ठेवली का असा प्रश्न बाळासाहेब थोरात यांनी विचारला. फडणवीस एका दगडात किती पक्षी मारले? असा प्रश्नही बाळासाहेब थोरात यांनी यावेळी विचारला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी एक मेसेज वाचून दाखवत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना टोला लगावला. जगातील सर्व खेळाडूंचा पराभव करणारे विश्वनाथन यांनी अमित शाह यांच्यासोबत खेळण्यास नकार दिला असल्याचं भुजबळ म्हणाले.
फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री जाहीर करताच अनेक भाजपा नेते रडू लागले. गिरीश महाजन तर डोक्यावरचा फेटा डोळ्यावर बांधून अश्रू पुसत आहेत. एकनाथ शिंदेंनी माझ्या कानात जरी सांगितलं असतं तर मीच उद्धव ठाकरेंशी बोलून मुख्यमंत्री केलं असतं असंही अजित पवार म्हणाले.
"याआधी सत्ताधारी आणि आता विरोधी बाकावरुन पाहिलं तरी समोर मूळचे भाजपाचे मान्यवर कमी आणि आमच्याकडून गेलेलेच जास्तच पहायला मिळत आहेत. ते पाहून मूळच्या भाजपाच्या लोकांचं वाईट वाटतं.पहिली लाईन पाहिली तरी लक्षात येईल. दिपक केसरकर तर आता कसले प्रवक्ते झाले आहेत. आम्ही शिकवलेलं वाया गेलं नाही," असा टोला अजित पवार यांनी लगावला.
"राहुल नार्वेकर कुठेही गेले तरी पक्षाच्या नेतृत्वाला फार जवळ करतात. शिवसेनेत गेल्यानंतर आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीत मला आणि भाजपात गेल्यानंतर फडणवीसांना जवळ केले. आता एकनाथ शिंदे तुम्हीही जवळ करा, नाहीतर काही खरं नाही," असं मिश्किल भाष्य अजित पवारांनी केलं.
"राज्याच्या विकासाचा गाडा पुढे नेण्याचा प्रयत्न आतापर्यंत सर्व अध्यक्षांनी केला आहे. तुमच्याकडूनही तीच अपेक्षा आहे. तुमच्या रुपाने एक अभ्यासू, तरुण नेतृत्व सभागृहाला मिळालं आहे. मुंबई, हिंदी आणि इंग्रजी भाषेवर आपलं प्रभुत्व आहे. आदित्य ठाकरेंसोबतही तुम्ही काम केलं. मला मावळमध्ये उमेदवार हवा होता तेव्हा मी तुम्हाला विनंती केली. मोदी लाटेत राहुल नार्वेकर यांचा पराभव झाला. पण ते फार हुशार आहेत, माझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा असं सांगितलं होतं," असं अजित पवार यांनी यावेळी म्हटलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन केलं. ते म्हणाले की, "आतापर्यंत सर्व अध्यक्षांनी न्याय देण्याचं काम केलं आहे. महाराष्ट्राच्या विकासाची कामं गतिमान होतील सभागृहाची अपेक्षा आहे. आपलं नाव जोडलं गेलं आहे हा मोठा सन्मान आणि जबाबदारी आहे".