Maharashtra Assembly Speaker Election Live, 03 July 2022: विधानसभेच्या दोनदिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. राहुल नार्वेकर यांनी बहुमताचा आकडा पार करत सहजपणे अध्यक्षपद जिंकलं. आधी आवाजी मतदान आणि नंतर प्रत्यक्ष मतमोजणी करण्यात आली. राहुल नार्वेकर यांनी १६४, तर शिवसेनेच्या राजन साळवी यांना १०७ मतं मिळाली. यानिमित्ताने एकनाथ शिंदे आणि भाजपाने पहिली लढाई जिंकली आहे. आता उद्या म्हणजेच सोमवारी विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार असून शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून शक्तीप्रदर्शन केलं जाण्याची शक्यता आहे.
सरकार स्थापन केल्यावर लगेचच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिंदे यांना बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार रविवार आणि सोमवार असे दोन दिवस विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. सोमवारी विश्वासदर्शक जाईल.
भाजपाचे राहुल नार्वेकर विधानसभेचे नवे अध्यक्ष, १६४ मतांनी विजयी; शिवसेनेच्या राजन साळवी यांना १०७ मतं
योगायोग म्हणजे राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष असून त्यांचे सासरे निंबाळकर विधानपरिषदेचे सभापती आहेत. जावई आणि सासऱ्याचं एकमत होत नाही असं म्हणतात असं मिश्किलपणे फडणवीस यावेळी म्हणाले.
आज महाराष्ट्राने नवा रेकॉर्ड केला आहे. राहुल नार्वेकर महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष आहेत. हे कायदेमंडळ असून वेगवेगळे कायदे करतो. प्रत्येकाचा विचार, आशा, अपेक्षा या सभागृहात सदस्यांच्या माध्यमातून मांडल्या जातात. त्या सोडवण्याची क्षमता या सभागृहात आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
न्यायदान करताना कायद्यापुढे सर्व समान याप्रणामेच निर्णय होतील अशी आशा आहे. आम्ही सत्ताधारी बाकावर असलो तरी झुकतं माप द्यावं अशी इच्छा नाही. पारदर्शक पद्धतीने आम्हाला कारभार चालवायचा आहे. आपण मार्गदर्शनदेखील करावं अशी आशा आहे. तरुण आमदारांच्या चिंता दूर करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
न्यायदान करताना कायद्यापुढे सर्व समान याप्रणामेच निर्णय होतील अशी आशा आहे. आम्ही सत्ताधारी बाकावर असलो तरी झुकतं माप द्यावं अशी इच्छा नाही. पारदर्शक पद्धतीने आम्हाला कारभार चालवायचा आहे. आपण मार्गदर्शनदेखील करावं अशी आशा आहे. तरुण आमदारांच्या चिंता दूर करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
राज्यात शिवसेना-भाजपाचं सरकार स्थापन झालं आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार, भूमिका घेऊन आम्ही पुढे जात आहोत. आतापर्यंत ज्या घटना घडल्या त्याची देशाने नोंद घेतली आहे. मी नगरविकास मंत्री होतो आणि माझ्यासोबत ८ मंत्री पायउतार झाले. एकीकडे सत्ता, मोठे नेते आणि दुसरीकडे बाळासाहेबांचा, दिघे साहेबांचा सैनिक होता. पण ५० विधानसभा सदस्यांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवला हे आमचे भाग्य आहे. एका आमदाराला मी स्वत: चार्टर्ड विमानाने पाठवलं. त्यामुळे कोणावरही जबरदस्ती झालेली नाही असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
विधानभवन लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे. अध्यक्षांची उच्च परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. अनेकांना यानंतर मोठी संधी प्राप्त झाली आहे. देशपातळीवरही त्यांना गौरवण्यात आलं आहे. सर्वोच्च पदावर विराजमान होत असताना फक्त राज्यातील नव्हे तर देशातील आणि परदेशातील लोक हा ऐतिहासिक क्षण डोळे भरुन अनुभवत आहेत. कालपर्यंत आपण कुलाबा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होतात. पण आता व्यक्तिमत्वाला या न्यायालयातील शिरपेच मिळाला आहे. या पदाचा, मान, सन्मान, दर्जा मोठा आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानतंर सभागृहात 'जय श्रीराम'च्या घोषणा देण्यात आल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर यांना खुर्चीपर्यंत नेलं.
राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याचं उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी जाहीर केलं आहे.
समाजवादी पक्षाचे दोन आमदार आणि एमआयएमचा एक आमदार तटस्थ राहिले आहेत. राहुल नार्वेकर यांना १६४ मतं मिळाली असून महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना १०७ मतं मिळाली आहेत. राहुल नार्वेकर विजयी झाले असून विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना एकूण १०७ मतं मिळाली आहेत. १०० मतं पूर्ण झाल्यानंतर टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आलं. तीन आमदार तटस्थ राहिले असून यामध्ये समाजवादी पक्ष आणि एमआयएमचा समावेश आहे.
आमदार कैलास किसनराव गोरंट्याल यांनी प्रत्यक्ष मतदान करताना “ऐसे वैसे कैसे कैसे हो गये. और कैसे कैसे ऐसे वैसे हो गये” अशी शायरी म्हणत सत्ताधाऱ्यांना टोला लगावला.
राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे. राहुल नार्वेकर यांनी बहुमताचा आकडा पार केला आहे. राहुल नार्वेकर यांनी १६४ मतं मिळाली आहेत. मनसेचे राजू पाटील तसंच बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनीदेखील राहुल नार्वेकर यांच्या बाजूने मतदान केलं आहे.
सभागृहात प्रत्यक्ष मतमोजणी सुरु असताना काही सदस्य गोंधळ घालत आहेत. काही सदस्य आसन क्रमांक सांगत असल्याने देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला. यावर जयंत पाटील यांनीदेखील उभं राहून प्रक्रिया व्यवस्थित राबवण्यास सांगितलं.
विधानसभेत निवडणुकीला सुरुवात झाली आहे. राहुल नार्वेकर आणि राजन साळवींच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला. चंद्रकांत पाटील यांनी राहुल नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला तर राजन साळवींसाठी थोपटेंनी प्रस्ताव मांडला. आवाजी मतदानानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात करण्यात आली आहे.
मला सर्वात प्रथम राज्यपालांचे आभार मानायचे आहेत. गेले अनेक महिने महाराष्ट्राच्या विधानसभेला याची प्रतिक्षा होती. वारंवार आम्ही विनंती करुनही त्यांनी निवडणूक लावली नाही. ते कशाची वाट पाहत होतो हे आमच्या लक्षात आलं. हे आधीच सांगितलं असतं तर एकनाथ शिंदेंनी हे आधीच केलं असतं. राज्यपालांनी देशाला आदर्श घालून दिला आहे. आता त्यांनी १२ आमदारांची पाठवलेली यादी तात्काळ मान्य करावी असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.
यावर देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांच्यामुळे हा दिवस पहायला मिळाला. मित्र म्हणून ते जागले आहेत असं सांगत प्रत्युत्तर दिलं आणि आभार मानले.
विधानभवनातील शिवसेना विधानभवन कार्यालय आम्हीच सील केलं आहे. त्याची चावी आमच्याकडेच आहे अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. कसाबच्या वेळीदेखील इतका बंदोबस्त लावण्यात आला नव्हता. बसमधून आणलेल्या आमदारांचं मला वाईट वाटतं, कसाबलाही असं आणलं नसेल. कोणी पळणार आहे का? अशी विचारणा आदित्य ठाकरे यांनी केली आहे. शिवसेनेचंच व्हीप अधिकृत आहे असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे.
“आम्हाला धोका दिला ठीक आहे, पण मुंबईकरांना धोका देऊ नका,” असंही आवाहन त्यांनी आरे कारशेडचा उल्लेख करत म्हटलं. आम्हीच कार्यालय सील केल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी यावेळी दिली.
एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसहित विधानभवनात दाखल झाले आहेत. विधानभवन प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकारी, मान्यवरांसह अभिवादन केले.
शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण हे पिता-पुत्र किंवा वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक या काका-पुतण्याच्या जोडीने राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले. आता विधान परिषद आणि विधानसभेचे पीठासीन अधिकारीपद हे सासरे आणि जावयाकडे जाणार आहे. पिता-पुत्र, काका-पुतणे यानंतर सासरे आणि जावयाची जोडी राज्याच्या सत्ताकेंद्रात बघायला मिळणार आहे.
एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार यांनी आमच्यामागे महाशक्ती असल्याचं सांगितलं आहे. राज्यपालांवर आम्ही जो संशय व्यक्त केली होता तो खरा ठरला आहे. आम्ही निवडणूक मागत असताना न्यायव्यवस्थेत असल्याने कारवाई करता येणार नाही सांगत होते. राज्यपालांनी निवडणूक लावली आहे त्यावरुन कोणती महाशक्ती आहे हे समजत आहे. हुकूशमाही आणि दडपशाही सुरु असून त्याचा वापर विधानसभेत होऊ नये अशी आग्रही विनंती आहे. अन्यथा महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला काळीमा फासला जाऊ शकतो असं आमचं म्हणणं आहे असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं आहे.
भाजपाचे विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार राहुल नार्वेकर विधानभवनात पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी विजयाचं चिन्ह दाखवत आपणच विजयी होऊ अशा खात्री दर्शवली. राहुल नार्वेकर यांचे सासरे रामराजे नाईक निंबाळकर हे सध्या विधान परिषदेचे सभापती आहेत. राहुल नार्वेकर विजयी झाल्यास सासरे आणि जावई यांची जोडी महाराष्ट्राच्या विधी मंडळावर पाहायाला मिळू शकते.
एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांनी कुलाबा येथील बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याला अभिवादन केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार येथे पोहोचले आहेत. भाजपा नेते प्रसाद लाडही यावेळी उपस्थित होते. बाळासाहेब आमचे दैवत आहेत अशी प्रतिक्रिया यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नियमात करण्यात आलेल्या बदलांना आक्षेप घेत प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने गेल्या मार्चमध्ये निवडणुकीची तारीख निश्चित करण्यास नकार देणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सत्ताबदल होताच नव्या नियमानुसार अध्यक्षांची निवडणूक घेण्यास मान्यता दिली आहे. याबरोबरच विधान परिषदेतील १२ नामनियुक्त सदस्यांची नियुक्ती झाल्याशिवाय भाजपला सभापती पद मिळणार नसल्याने गेली दीड वर्षे यावर काहीच निर्णय घेण्याचे टाळणाऱ्या राज्यपालांची सत्ताबदलानंतर भूमिका काय असेल, याबाबतही राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
विधानसभेतील शिवनेसेचं कार्यालय सील करण्यात आलं आहे. यामुळे शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार विधान भवनात दाखल झाले आहेत. अजित पवार यांना करोनाची लागण झाल्याने ते विश्रांती घेत होते. चाचणी निगेटिव्ह आली असता अधिवेशनासाठी ते पोहोचले आहेत.
आजपासून महाराष्ट्र विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनास सुरुवात होणार आहे. दुपारी ११ वाजता अधिवेशनाच्या कामकाजास सुरुवात होईल. शिंदे आणि फडणवीस सरकारचे हे पहिलेच अधिवेशन आहे. बहुमत चाचणी, अध्यक्षांची निवडणूक सारखे अनेक सत्र या अधिवेशनादरम्यान पार पडणार आहेत.
अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर, तर शिवसेनेचे राजन साळवी यांच्यात लढत होणार आहे. भाजपचे १०६ तर अपक्ष, छोटे पक्ष असे एकूण १२० आमदार भाजपच्या गटात आहेत. शिंदे यांच्याबरोबर अपक्षांसह ४६ आमदार आहेत. विधानसभेत सरकारला १७० पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे. यामुळे भाजपचे नार्वेकर निवडून येण्यात काहीच अडचण येणार नाही.
अध्यक्षपदासाठी नव्या नियमानुसार म्हणजे आवाजी पद्धतीने मतदान होईल. गेल्या डिसेंबरमध्ये महाविकास आघाडी सरकारने अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीऐवजी आवाजी मतदान पद्धतीने घेण्याचा बदल केला होता. या नव्या बदलानुसारच ही निवडणूक होईल. उमेदवाराच्या नावाचा प्रस्ताव पुकारल्यावर सदस्यांनी उभे राहून मत नोंदवायचे आहे.
शिवसेना विधिमंडळ पक्षाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी साळवी यांना मतदान करण्याचा पक्षादेश लागू केला आहे. हा पक्षादेश शिंदे गटालाही लागू पडतो, असा शिवसेनेचा दावा आहे. तर पक्षप्रतोद म्हणून भरत गोगावले यांची निवड दोनतृतीयांशपेक्षा अधिक आमदारांनी केली असल्याने प्रभू यांचा पक्षादेश आम्हाला लागू होत नाही, असा शिंदे गटाचा दावा आहे. उलट शिवसेनेच्या सर्वच आमदारांना गोगावले यांचा पक्षादेश लागू होतो, असे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांचे म्हणणे आहे. विधानसभा अध्यक्षपद किंवा विश्वासदर्शक ठरावावर प्रत्यक्ष मतदान झाल्यास हा कायदेशीर मुद्दा येणार आहे. यातूनच अध्यक्षांची निवडणूक आणि विश्वासदर्शक ठराव हे दोन्ही आवाजी मतदानाने मंजूर केले जाण्याची शक्यता जास्त आहे. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारकडे पुरेसे संख्याबळ नसतानाही आवाजी मतदानाने गोंधळातच विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्यात आला होता.
-विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर आणि शिवसेनेचे राजन साळवी यांच्यात लढत.
-भाजपचे १०६ तर अपक्ष, छोटे पक्ष असे एकूण १२० आमदार भाजपच्या गटात, शिंदे यांच्याबरोबर अपक्षांसह ४६ आमदार
-सरकारला १७० पेक्षा जास्त आमदारांच्या पािठब्याचा मुख्यमंत्री शिंदेंचा दावा. भाजपचे नार्वेकर यांच्याच निवडीची शक्यता.
(Express Photo by Amit Chakravarty)