सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निर्णय देऊन आता जवळपास एक महिना झाला. न्यायालयाच्या निकालामध्ये आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांनाच असल्याचं मान्य करण्यात आलं. त्यामुळे यासंदर्भात आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरच निर्णय घेणार हे स्पष्ट झालं. तसेच, वाजवी वेळेत हा निर्णय घ्यावा, असंही निकालात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे आता राहुल नार्वेकर नेमका काय, कधी आणि कोणत्या आधारावर निर्णय घेतात? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना त्यांनी एक सूचक विधान केलं आहे. या विधानाची चर्चा सुरू झाली आहे.
…आणि गिरीश महाजनांनी डोक्यालाच हात लावला!
विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि राज्य सरकारमध्ये अनेक मंत्रीपदं भूषवलेले दिवंगत बाळासाहेब देसाई यांचा चरित्रग्रंथ ‘दौलत’ याचा बुधवारी प्रकाशन सोहळा पार पडला. या सोहळ्याला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उपस्थित होते. यावेळी समोर सत्ताधारी पक्षांचे अनेक आमदार-मंत्रीही बसले होते. यावेळी आपल्या भाषणात राहुल नार्वेकरांनी लवकरच क्रांतीकारी निर्णय घेणार असल्याचे सूतोवाच दिले आणि उपस्थितांमध्ये कुजबूज सुरू झाली. त्यांच्या या विधानावर समोर बसलेले मंत्री गिरीश महाजन यांनी चक्क डोक्यालाच हात लावला!
काय म्हणाले राहुल नार्वेकर?
राहुल नार्वेकरांनी यावेळी बाळासाहेब देसाई यांच्या कार्याचा गौरव केला. “ज्या ज्या खात्यात बाळासाहेब देसाई यांनी काम केलं, त्या त्या खात्यात क्रांतीकारी काम करून त्यांनी निश्चितपणे आपला वेगळा ठसा राज्यात आपल्या सर्वांसमोर मांडला. माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची त्यांच्याकडे सोपवलेली जबाबदारी म्हणजे १९७७-७८ या काळात विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं काम”, असं राहुल नार्वेकर यावेळी म्हणाले.
“सातत्याने माझा उल्लेख सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष म्हणून झाल्यामुळे माझं वय सगळ्यांनाच माहिती असेल. ७७ साली माझा जन्म झाला आणि त्याच वर्षी बाळासाहेब देसाईंवर विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी आली. ज्या प्रमाणे त्यांनी राजकीय आयुष्यात क्रांतीकारी निर्णय घेतले, त्यातून बरंचसं शिकून कदाचित मीही लवकरच क्रांतीकारी निर्णय घेईन”, असे सूतोवाच राहुल नार्वेकरांनी दिले.
दरम्यान, याचवेळी समोर बसलेल्या गिरीश महाजनांनी डोक्याला हात लावला. समोरच्या श्रोत्यांच्या प्रतिक्रिया पाहून नार्वेकरांनी लागलीच ” चिंता करायची गरज नाही. निर्णय काय असेल ते सांगितलेलं नाही”, असं म्हणत बाजू सांभाळून घेतली. त्यावर गिरीश महाजनांनी बसल्या बसल्याच ‘मेरिटवर निर्णय’ असं हसत म्हणताच नार्वेकरांनी त्याला दुजोरा देत “मेरिटवर निर्णय घेईन”, असं सांगून टाकलं.
दरम्यान, हे संभाषण चालू असताना पुढच्याच रांगेत बसलेले विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे मात्र हा संवाद बसल्या जागेवरून बघत होते!