मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर स्वतःचा शिवसेनेचा गट अधिकृत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर मागच्या काही महिन्यांपासून यावर कायदेशीर खल सुरू आहे. सर्वोच्च न्यायलयात हे प्रकरण पोहोचल्यानंतर न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना आमदार अपात्र प्रकरणी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. अपात्र प्रकरणात १० जानेवारी रोजी निकाल जाहीर करावा, असेही निर्देश सर्वोच्च न्यायालयाने डिसेंबर महिन्यात दिले होते. त्यानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज दुपारी ४ वाजता निकाल जाहीर करणार आहेत. तत्पुर्वी सकाळी माध्यमांशी बोलत असताना त्यांनी या निकालाबाबत भाष्य केले.
माध्यमांशी बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले की, अपात्र प्रकरणी सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यानुसार निकाल आज देणार आहोत. हा निकाल कायद्याला धरून असेल. संविधानाच्या तरतुदीचे पालन करून सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिले आहेत. त्यावरच हा निकाल आधारित असेल. या निकालातून सर्वांना न्याय मिळेल. संविधानाच्या १० व्या परिशिष्टाचे आजवर न झालेले आकलन या निकालाच्या माध्यमातून होणार आहे, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले.
हे वाचा >> पक्षांतर बंदी कायदा म्हणजे काय; आमदारांवर काय कारवाई होते?
दहाव्या परिशिष्टाचे आकलन आजवर योग्यरित्या झालेले नव्हते. ते करण्याची गरज होती. या प्रकरणाच्या माध्यमातून आम्ही योग्य निर्णय घेणार असून त्याद्वारे दहाव्या परिशिष्टाबाबत एक पथदर्शी निकाल देण्यााच प्रयत्न केला जाणार आहे, असेही ते म्हणाले.
तसेच शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली होती. नार्वेकर यांनी हा निकाल दिल्लीवरून आणला आहे, असे ते म्हणाले. या टीकेला प्रत्युत्तर देताना राहुल नार्वेकर म्हणाले की, संजय राऊत काहीही टीका करू शकतात. ते उद्या म्हणतील की, हा निकाल लंडन, अमेरिकेवरून आणला आहे. त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नसतो. राऊत यांच्या टीकेला उत्तर देऊन आम्हाला त्यांना स्वस्तातली प्रसिद्धी द्यायची नाही. संजय राऊत यांचा अनुल्लेख केलेला बरा.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्र्याच्या भेटीवरून टीका केली होती. त्यावर उत्तर देताना राहुल नार्वेकर म्हणाले की, उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांना विधानसभा अध्यक्षांची भूमिका काय असते? त्यांना काय काय काम करावे लागते. मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष यांची १५ दिवस किंवा महिन्यातून एकदा भेट होतच असते, याची माहिती त्यांना कदाचित असणे आवश्यक होते. पण त्यांना याविषयाची माहिती घेण्याचा अधिकचा वेळ मिळालेला नसाव, असेच यातून वाटत असल्याचे नार्वेकर म्हणाले.