Shivsena MLA Disqualification Verdict Latest Updates : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल आज अखेर लागला. सर्वोच्च न्यायालयाने १० जानेवारीची मुदत दिल्यानंतर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपला निकाल सुनावला. शिंदे आणि ठाकरे गटाच्या वतीने एकमेकांच्या विरोधात आमदार अपात्र प्रकरणी याचिका दाखल केली होती. एकूण ३४ आमदारांचे अपात्र प्रकरण होते. सर्व याचिकांना सहा गटात विभागणी करून राहुल नार्वेकर यांनी आपला निकाल दिला. मात्र कोणत्याही गटातील आमदारांना त्यांनी अपात्र ठरविले नाही. शिंदे यांचा गट अधिकृत असून त्यांचे प्रतोद भरत गोगावले यांनाही त्यांनी मान्यता दिली. मात्र त्यांच्या व्हिपनुसार ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरविले नाहीत. याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. त्याबद्दल खुद्द राहुल नार्वेकर यांनी निकालानंतर स्पष्टीकरण दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“शिवसेना एकनाथ शिंदेंची कधीच होऊ शकत नाही, कारण शिंदे आणि…”, उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बातचीत करत असताना राहुल नार्वेकर म्हणाले, “माझ्याकडे ज्या याचिका प्रलंबित होत्या त्यावर मी निर्णय दिला आहे. हा निर्णय शाश्वत असा आहे. निकालात प्रत्येक मुद्द्याची कराणे विस्तृतपणे मांडली आहेत. हा निर्णय देत असताना एखाद्या व्यक्तीला खूश किंवा नाराज करणे असे काही ध्येय नव्हते. संविधान, कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकषाचे तंतोतंत पालन करून निकाल देणे, हेच माझे ध्येय होते. जेणेकरून सामान्य माणसांचा संसदीय लोकशाहीवरील विश्वास अधिक बळकट होईल. मूळ प्रश्न होता की, कुणाचा गट अधिकृत आहे? याबद्दलचे स्पष्टीकरण आजच्या निकालातून देण्यात आले आहे. त्यानंतर त्या गटाच्या प्रतोदालाही आम्ही मान्यता दिली आहे. त्यामुळे त्या प्रतोदाचा व्हिप योग्य असल्याचा निकाल दिला. या निर्णयात सगळ्या कायदेशीर तरतुदींचे पालन केले आहे.

म्हणून ठाकरे गटाच्या आमदारांना पात्र ठरविले

दोन्ही गटांकडून आमदारांना अपात्र ठरविण्याबाबतच्या याचिका आल्या होत्या. याबाबतचा प्रश्न विचारल्यानंतर राहुल नार्वेकर म्हणाले की, आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी काही निकष आहेत. मुळ राजकीय पक्षाचा व्हिपच आपल्याला ग्राह्य धरायला लागतो. तो व्हिप योग्यरित्या दिला गेला आहे का? हेदेखील तपासावे लागते. एकनाथ शिंदे यांच्या गटाचा व्हिप जरी आपण ग्राह्य धरला तरी तो व्हिप योग्यरित्या बजावला गेला आहे का? हे तपासणे गरजेचे होते. माझ्या तपासानंतर लक्षात आले की, भरत गोगावले यांनी दिलेला व्हिप ठाकरे गटाच्या आमदारांना योग्यरित्या बजावला गेला नाही. त्यामुळेच ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र केले नाही.

निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर तीव्र आक्षेप घेतला. याबाबत बोलत असताना राहुल नार्वेकर म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी घाईत बोलण्यापेक्षा माझा निकाल पूर्ण वाचावा. वाचल्यानंतर त्यांचे निकालाबाबतचे आकलन होईल आणि तेदेखील याचे स्वागत करतील, अशी आशा नार्वेकर यांनी व्यक्त केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly speaker rahul narwekar explains about why thackeray faction mla didnt disqualified kvg