Nagpur Winter Session 2023 Updates, 07 December 2023 : दाऊदशी संबंधित सलीम पटेल आणि हसीना पारकर यांच्याशी गोवावाला कपाऊंडच्या जमीन व्यवहारात अपहार केल्याचा आरोप असलेले नवाब मलिक सध्या जामिनावर आहेत. ते तुरुंगात असताना राष्ट्रवादीत बंडखोरी झाली. त्यामुळे नवाब मलिकांची भूमिका स्पष्ट झाली नव्हती. अखेर, ते आज विधानसभेत सत्ताधारी बाकावर जाऊन बसल्याने ते अजित पवार गटात असल्याचं स्पष्ट झालं आहे. यावरून विधान परिषदेत गोंधळ झाला. ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी नवाब मलिका यांच्यावरील आरोपांवरून त्यांचं नाव न घेता सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्या प्रश्नांवर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिप्रश्न उपस्थित केले. आजपासून (७ डिसेंबर) विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले. पहिल्याच दिवशी या मुद्द्यावरून विधान परिषदेत खडाजंगी पाहायला मिळाली.
अंबादास म्हणाले, “खालच्या सभागृहात एक सदस्य बसले आहेत, ज्याविषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सातत्याने अशी भूमिका घेत होते की आम्ही देशद्रोह्याच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही. त्यांच्याविरोधात काय गुन्हे होते, हे माहित आहे.” अंबादास दानवेंनी हा प्रश्न उपस्थित करताच सभागृहात गोंधळ सुरू झाला. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीही हा प्रश्न उद्या उपस्थित करण्याची विनंती केली. परंतु, अंबादास दानवे आपल्या प्रश्नावर ठाम राहिले. यावर अंबादास दानवे म्हणाले, “एक सभासद सभागृहात सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसले आहेत. त्यांच्याविषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी वारंवार जाहीर वक्तव्य केलं की एका देशद्रोह्याच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही. उघड उघड दाऊद इब्राहिमची वेगवेगळ्या पद्धतीने आर्थिक व्यवहार जाहीर केले. त्यामुळे याबाबत सरकारची भूमिका काय हे कळलं पाहिजे.”
हेही वाचा >> नवाब मलिक अजित पवार गटात! सर्वात शेवटी बसले सत्ताधारी बाकांवर, धर्मराव अत्राम यांनी व्यक्त केला होता ‘हा’ विश्वास
अंबादास दानवे यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की ज्यांच्या नेत्यांनी ही भूमिका घेतली की जेलमध्ये व्यक्ती असतानाही आम्ही मंत्रिपदावरून काढणार नाही. ते आता ही भूमिका मांडत आहेत. आम्ही कोणाच्याही मांडीला मांडी लावून बसलो नाही. मी आणि मुख्यमंत्री एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. आमच्या बाजूला अजित दादा मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यांच्या बाजूला, भुजबळ बसले आहेत. त्यामुळे आमची काळजी करू नका. देशद्रोह्याचा आरोप झाल्यानतंर ते जेलमध्ये असताना तुम्ही त्यांना मंत्रिपदावरून का काढलं नाही याचं उत्तर द्या आणि मग आम्हाला प्रश्न विचारा.
दरम्यान, शोकप्रस्तावानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज स्थगित करण्यात आलं आहे.