Maharashtra Hiwali Adhiveshan Updates : सध्या नागपूरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. हे अधिवेशन सध्या विविध मुद्द्यांनी गाजत आहे. अशात आज विधानसभा आणि विधान परिषदेत काय काय घडणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान १६ डिसेंबर रोजी सुरू झालेले हे हिवाळी अधिवेशन २१ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
सध्या नागपूरमध्ये सुरू असलेले विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजत आहे. यामध्ये प्रामुख्याने बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि परभणीतील हिंसाचारावर विरोधी पक्षांच्या आमदारांसह सत्ताधारी पक्षांच्या आमदारांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे.
दुसरीकडे आज रेशीमबागेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात महायुतीच्या आमदारांसाठी बौद्धिकाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी भाजपासह शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नेते आणि आमदार दाखल व्हायला सुरूवात झाली आहे. मात्र, महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे (अजित पवार) राजू कारेमोरे हे एकमेव आमदार रेशीमबागेत गेले आहे. उममुख्यमंत्री अजित पवार यांनी यंदाही या बौद्धिकाला दांडी मारल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराला आता आठवडा होत आला आहे. अशात आज नव्या मंत्र्यांना खातेवाटप होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. यासह हिवाळी अधिवेशनातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी.
Maharashtra Hiwali Adhiveshan Live News Updates, Day 4| यंदाचे हिवाळी अधिवेशन २१ डिसेंबरपर्यंत चालणार
अमित शहांच्या विधानातून संघाच्या द्वेष भावनेचे प्रदर्शन, पृथ्वीराज चव्हाण यांनी साधला निशाणा
कराड : केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधातील ते विधान हे अत्यंत दुर्दैवीच आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल किती द्वेषपूर्ण भावना भरलेली आहे, याचेच त्यातून प्रदर्शन झाल्याचा निशाणा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे माध्यमांशी बोलताना साधला.
कुर्ला बेस्ट अपघातातील आणखी एका जखमीचा मृत्यू, मृतांची संख्या नऊ
मुंबई : कुर्ला परिसरात बेस्ट बसच्या भीषण अपघातात जखमी झालेल्या आणखी एका व्यक्तीचा गुरुवारी मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या नऊ झाली आहे.
“महाराष्ट्राबरोबर कुणीही स्पर्धा करू शकत नाही"
नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसी यांनी आज विधानसभेत मुंबई मेट्रो ३, राज्यातील उद्योग आणि कृषी क्षेत्रासह विविध मुद्द्यांबाबत माहिती दिली. उद्योगाबाबात बोलताना फडणवीस म्हणाले की, “महाराष्ट्राबरोबर कुणीही स्पर्धा करू शकत नाही.”
कर्नाटकातील सरकारवर बेळगाववरून हल्लाबोल, शंभूराज देसाई म्हणाले…
नागपूर: बेळगाव वादावर शंभूराज देसाईंनी कर्नाटक सरकारवर हल्लाबोल केला. मराठी भाषिकांच्या पाठिशी महाराष्ट्र ठाम असल्याचे सांगत त्यांनी कर्नाटक सरकारवर संताप व्यक्त केला. महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी गुरुवारी मंत्री शंभूराज देसाई यांनी बेळगाव सीमा वादावर कर्नाटक सरकारवर कडाडून हल्ला चढवत पत्रकारांशी बोलताना सांगितले की, कर्नाटकवर अरेरावी आणि दादागिरी करत आहे. कर्नाटक सरकारने सतत वादग्रस्त भागातील मराठी भाषिकांच्या अधिकारांना डावलले आहे.
“काँग्रेस असो वा भाजपा…”, मुंबईच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंचा थेट काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना इशारा; म्हणाले…
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद दिवसेंदिवस चिघळत असून आता कर्नाटकातील आमदाराने थेट मुंबईला लक्ष्य केलं आहे. मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवा, अशी मागणी आमदार लक्ष्मण सवदी यांनी कर्नाटकातील विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात केली. त्यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात आता पडसाद उमटू लागले असून युवा आमदार आदित्य ठाकरेंनीही टीका केली आहे. त्यांनी थेट काँग्रेसला इशारा दिला आहे.
तुरीच्या दरात आठवडाभरात ९०० रुपयांची घसरण
अमरावती : नवीन तूर बाजारात यायच्या आधीच पश्चिम विदर्भातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये तुरीचे भाव कमी झाले असून दर आठवडाभरात ९०० रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
सोलापूर : समाजमाध्यमावर श्रद्धांजली वाहून एकाची आत्महत्या
सोलापूर : एका जेसीबी चालक तरुणाने प्रेमभंग झाल्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन इन्स्टाग्रामवर स्वतःच्या छायाचित्राला फुले वाहून श्रद्धांजली अर्पण केली आणि स्वतःला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार सांगोला तालुक्यातील कटफळ येथे उजेडात आला आहे.
मुंबई : अपघातग्रस्त बोटीची तज्ज्ञांच्या मदतीने तपासणी करणार, पोलिसांनी आतापर्यंत १० जणांचे नोंदवले जबाब
मुंबई : ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथून घारापुरीकडे निघालेल्या प्रवासी बोटीला नौदलाच्या ‘स्पीड बोट’ने धडक दिल्याप्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरूवात केली असून तज्ज्ञांच्या मदतीने अपघातग्रस्त बोटीची तपासणी करण्यात येणार आहे.
अकोला : मंत्रिपदाची संधी हुकली, मात्र पक्षाने दिली ‘ही’ मोठी जबाबदारी
अकोला : अकोला पूर्वचे भाजप आमदार तथा प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर यांची मंत्रिपदाची संधी हुकली. मात्र, पक्षाने त्यांच्या कार्याची विशेष दखल घेऊन मोठी जबाबदारी सोपवली आहे.
अमित शहांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन, अकोल्यात वंचित आक्रमक; राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम
अकोला : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणावरून वंचितच्या युवा आघाडीने आक्रमक भूमिका घेतली असून अमित शहा यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे बुधवारी रात्री दहन केले.
आदित्य ठाकरेंनी कोणत्या काँग्रेस आमदाराच्या बरखास्तीची मागणी केली?
नागपूर : मुंबईला केंद्रशासित प्रदेश जाहीर करण्याची मागणी करणाऱ्या आमदाराला बरखास्त करा, अशी मागणी शिवसेनाचे (उद्धव ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.
विरार मध्ये अल्पवयीन मुलीचा रस्त्यात विनयभंग, सिरियल मॉलेस्टरची शक्यता
विरार मध्ये भर रस्त्यात १४ वर्षीय मुलीचा अनोळखी तरुणाकडून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. यामुळे स्थानिकांमध्ये घबराट पसरली आहे. अल्पवयीन मुलींना अडवून त्यांच्यावर लैंगिक अत्यातार करणारे विकृत म्हणजेच सिरियल मॉलेस्टर पुन्हा सक्रीय झाल्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे.
सारंगखेड्यातील चेतक फेस्टिव्हलमधील अश्वनृत्य स्पर्धेची रसिकांना भुरळ
नंदुरबार : देशभरात प्रसिध्द असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे अश्वनृत्य स्पर्धेने चेतक फेस्टिव्हलला सुरुवात झाली. घोड्यांच्या मनमोहक नृत्यांनी अश्वशौकिनांना चांगलीच भुरळ घातली. अश्वनृत्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची वसतिगृहात आत्महत्या
सोलापूर : एका प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने महाविद्यालयातील वसतिगृहात आत्महत्या केली. आदित्य लक्ष्मण जवळे (वय १९, रा. अरळी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
मृत आदित्य सोलापुरात वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकलच्या प्रथम वर्गात शिक्षण घेत होता. शिक्षणासाठी पालकांनी त्याला याच महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृहात राहण्याची सोय केली होती. वसतिगृहातील खोलीमध्ये रात्री साडेदहापूर्वी त्याने छताच्या विद्युत पंख्याला नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास घेतला. ही माहिती कळताच जेलरोड पोलिसांनी तेथे तत्काळ धाव घेऊन खोलीचा दरवाजा तोडला आणि आदित्य यास गळफासातून सोडवून छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेचे निश्चित कारण लगेचच समजू शकले नाही. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
कल्याणमध्ये सासऱ्याचा जावयावर ॲसिड हल्ला, मधुचंद्रासाठी काश्मीर की मक्का मदिनेला जाण्यावरून वाद
कल्याण : नवीनच लग्न झाल्याने जावयाने मधुचंद्रासाठी काश्मीरला जाण्याचा बेत आखला होता. तर, जावयाने काश्मीरऐवजी पहिले पार्थनेसाठी मक्का-मदिनेला जावे, असा आग्रह सासऱ्याने जावयाकडे धरला होता. याविषयावरून सासरा-जावई यांच्यातील वादावादी वाढत गेल्याने गुरुवारी रात्री सासऱ्याने जावयावर ॲसीड हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले.
ऊसदरासाठी आता ऊसतोड बंद आंदोलन, ‘रयत क्रांती’चा ऊस परिषदेत इशारा
कराड : ऊसदराचा न्याय घरात बसून मिळणार नाही. त्यासाठी रस्त्यावरच्या लढाईसाठी शेतकऱ्यांनी तयार असले पाहिजे, उसाच्या तोडी बंद कराव्या लागणार असल्याचा इशारा ‘रयत क्रांती’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तथा राज्य शासनाच्या ऊसदर नियंत्रक मंडळाचे सदस्य सचिन नलवडे यांनी दिला.
रयत क्रांती संघटना व ऊस उत्पादक शेतकऱ्यांतर्फे ऊसदराची पहिली उचल ठरवण्यासाठी कोपर्डे हवेली (ता. कराड) येथे आयोजित ऊस परिषदेत ते बोलत होते. रयत क्रांती संघटनेचे युवा नेते सागर खोत, भरत चव्हाण, सुदाम चव्हाण आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग : चालकाला डुलकी लागली आणि कार कालव्यात कोसळून एकीचा मृत्यू
सावंतवाडी : चालकाला डुलकी लागली आणि कार कालव्यात कोसळली. यामध्ये एका महिलेने जीव गमावला आहे. ही घटना दोडामार्ग तालुक्यातील भेडशी जवळ घडली.
कोल्हापूर येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या पतीसोबत आपल्या लहान मुलाला ठेवून गुरुवारी लक्ष्मीपूजन करण्यासाठी घरी परतणाऱ्या पत्नीवर काळाने घाला घातला. ती आपल्या मोठ्या मुलासोबत कारने येत असताना कार अचानक भेडशी जवळ कालव्यात कोसळली व त्यात तिचा मृत्यू झाला. या अपघातात तिचा मुलगा किरकोळ जखमी झाला. शुभांगी शिवा परब (५५) असे तिचे नाव असून सचिन शिवा परब (दोघेही रा. वझरी, ता. पेडणे, गोवा) असे जखमी मुलाचे नाव आहे. साटेली भेडशी भोमवाडी येथे गुरुवारी मध्यरात्री २:३० वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी दुर्घटना घडली. चालकाला डुलकी आल्याने ही दुर्घटना घडली.
लग्न अभिवचन रजेवर कारागृहातून बाहेर आल्यानंतर पुन्हा परतलाच नाही
पिंपरी : छत्रपती संभाजीनगर येथील कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैदी अभिवचन रजेवर आला. मात्र रजा संपल्यानंतर तो कारागृहात परत गेला नाही. याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन संजय गिरी असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी कैद्याचे नाव आहे. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर कारागृहातील पोलीस अंमलदार सुभाष इंगळे यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन गिरी हा छत्रपती संभाजीनगर येथील कारागृहात शिक्षा भोगत होता. १८ जुलै २०२४ रोजी त्याला प्रवासासह चार दिवस लग्न अभिवचन रजा देण्यात आली. त्यानंतर त्याची रजा चार दिवसांनी वाढविण्यात आली. तो २५ जुलै २०२४ रोजी कारागृहात परत येणे अपेक्षित होते. मात्र तो रजा संपल्यानंतर कारागृहात परतला नाही. त्यामुळे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.
पिंपरी : घरात डोकावल्याचा जाब विचारल्याने महिलेला स्क्रू ड्रायव्हरने मारहाण
पिंपरी : घरामध्ये डोकावून पाहत असल्याचा जाब विचारल्याने तरुणाने महिलेला स्क्रू ड्रायव्हरने मारहाण केली. ही घटना बुधवारी सकाळी आठच्या सुमारास आंबेठाण येथे घडली. गणेश शांताराम जावळे (वय २४, रा. आंबेठाण, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी महिलेच्या पतीने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घरामध्ये गणेश याने डोकावून पाहिले. त्यामुळे फिर्यादी यांच्या पत्नीने गणेश याला जाब विचारत चापट मारली. त्या कारणावरून गणेश याने घरातील किचन ओट्यावर असलेला स्क्रू ड्रायव्हर घेतला. त्याने फिर्यादी यांच्या पत्नीच्या गळ्यावर, गालावर, हाताला, पायाला ठिकठिकाणी स्क्रू ड्रायव्हरने वार करत तिला गंभीर जखमी केले. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.
एकनाथ शिंदे म्हणाले, “संघाकडून निस्वार्थ भावनेने काम कसे करावे…”
नागपूर : समाजात निरपेक्ष भावनेने काम कसे करावे, हे संघ परिवाराकडून आम्ही शिकलो आहे. लहानपणी संघ शाखेत जात होतो. त्यानंतर शिवसेनाप्रमुख हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या शिकवणीतून आमच्यावर संस्कार झाले. संघ आणि बाळासाहेबांचे विचार सारखे होते त्यामुळे स्मृती मंदिर परिसर आमच्यासाठी प्रेरणास्थान असून या ठिकाणी आल्यावर उर्जा मिळत असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
संघ पदाधिकाऱ्यांचे महायुतीच्या आमदारांना बौद्धिक, म्हणाले…
नागपूर : राष्ट्रीय स्वयंवेक संघाच्या स्थापनेपासून संघ विस्ताराची माहिती देत संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त होणाऱ्या विविध उपक्रमामध्ये सर्वच आमदारांनी सक्रियतेने सहभागी होऊन काम करावे, अशी अपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.
नीलकमल बोट अपघात : प्रवासी बोटीवरील लहान मुलासह दोघेजण अद्याप बेपत्ता, नौदल, तटरक्षक दलाकडून शोध सुरू
मुंबई : ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथून घारापुरीकडे निघालेल्या प्रवासी बोटीला नौदलाच्या स्पीड बोटने धडक दिल्यानंतर ११५ प्रवाशांना समुद्रातून बाहेर काढण्यात आले असून अद्याप दोन प्रवासी बेपत्ता आहेत.
‘बाबासाहेब का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान’, अमित शहांच्या वादग्रस्त मुद्यावर विरोधक संतप्त
नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ अधीवेशनाच्या चौथ्या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभागृहावर मोर्चा काढला. संविधान चौकातून हा मोर्चा काढण्यात आला.
गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर संसद परिसरात सत्ताधारी विरोधकांमध्ये मोठा गदारोळ चालू आहे. यामध्ये भाजपाचे खासदार प्रताप चंद्र सारंगी जखमी झाले असून, त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. यानंतर सारंगी यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यामुळे त्यांना दुखापत झाल्याचा आरोप केला आहे.
केळ्यांसाठी शाळांना मिळणार अनुदान… काय करावे लागणार?
पुणे : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेत राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अंडी, केळी देण्यात येतात. त्यासाठी शाळांना प्रलंबित राहिलेले, तसेच चालू वर्षातील अनुदान देण्यात येणार असून, शाळांनी त्यासाठीचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी यांनी दिले.
२६०० कातकरी कुटुंबांचा घराचा प्रश्न वनविभागाच्या हाती ! वनविभागाच्या जागांना गावठाणाचा दर्जा मिळण्याबाबत प्रतीक्षा
ठाणे : आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहापूर तालुक्यातील सुमारे २ हजार ६०० कातकरी कुटुंबांचा घराचा प्रश्न मार्गी लागला आहे. काही महिन्यांपासून केंद्राच्या पंतप्रधान जनमन घरकुल योजनेच्या माध्यमातून घरकुल मंजूर झाले होते.
राजभवनातील शपथविधी सोहळा “त्या”च्या साठी ठरला जीवघेणा..
“तो” जखमेने विव्हळत होता.. “त्या” ला प्रचंड वेदना होत होत्या. एकीकडे राजभवनात शपथविधी सोहळा तर दुसरीकडे त्याच शपथविधी सोहळ्यामुळे त्याच्यावर जीवघेणे संकट उद्भवले होते. या राजकीय मांदियाळीत कुणी त्याच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही.
संघाविषयीच्या भूमिकेवरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत फूट, दोन आमदार संघस्थळी
नागपूर : संघ विचाराशी असहमत असल्याने आम्ही संघाच्या रेशीमबागमधील स्मृतिमंदिर स्थळी जाणार नाही, अशी स्पष्ट् भूमिका घेणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच राष्ट्रवादीचे विदर्भातील दोन आमदार गुरूवारी नागपूरच्या रेशीमबागेतील राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या स्मृतिमंदिर स्थळी हेडगेवारांच्या समाधीचे दर्शन घेऊन आले.
भाजपाचे आमदार राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे. आज विधान परिषदेचे कामकाज सुरू झाल्यानंतर ते सभापतींच्या खुर्चीवर विराजमान झाले.
अमित शाह यांच्या विधानाविरोधात महाविकास आघाडी आक्रमक
गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेच्या अधिवेशनादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे राज्यात विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. आज नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी निषेध नोंदवला.
सध्या नागपूरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. हे अधिवेशन सध्या विविध मुद्द्यांनी गाजत आहे. अशात आज विधानसभा आणि विधान परिषदेत काय काय घडणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान १६ डिसेंबर रोजी सुरू झालेले हे हिवाळी अधिवेशन २१ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.