हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान यावेळी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवरुन विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. विधानसभा अध्यक्षांची निवड आवाजी मतदानानं होणार असून माजी मुख्यमंत्री आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष निवडणूक संदर्भातील नियम समितीचा अंतरिम अहवाल सभागृहात मांडला. यावर विरोधी पक्षाने आक्षेप घेतला.
“ज्या सरकारकडे १७० चे बहुमत सांगितले जाते, त्या सरकारच्या मनात अध्यक्ष निवडणुकीसाठी स्वत:च्या बहुमातावर विश्वास का नाही?,” अशी विचारणा यावेळी फडणवीसांनी केली. नियम बदलले तर किमान त्याचा सभागृहासमोरील विचाराचा कालावधी कमी करता येणार नाही असंही यावेळी त्यांनी सांगितलं.
भास्कर जाधवांनी केली नरेंद्र मोदींची नक्कल, विधानसभेत खडाजंगी; फडणवीसांनी केली निलंबनाची मागणी!
“महाराष्ट्राच्या इतिहासात इतके असुरक्षित सरकार मी पाहिले नाही. स्वतःच्या आमदारांवरच अविश्वास असणारे सरकार आम्ही महाराष्ट्राच्या इतिहासात कधी पाहिले नाही. महाराष्ट्र विधानसभेच्या स्थापनेपासून जी प्रथा होती, ती बदलण्याचा अट्टाहास का? तुम्ही हे रेटून नेणार असाल तर आम्ही आमची लढाई कायदेशीर लढू,” असा इशारा यावेळी फडणवीसांनी दिला.
नाना पटोलेंच्या घोडेबाजार शब्दावरुन आक्षेप
“पक्षांतर्गत जी घटनादुरुस्ती झाली त्याप्रमाणे घोडेबाजार बंद व्हावा हा त्यामागचा हेतू होता,” असं नाना पटोले यांनी यावेळी सांगितलं. यावेळी विरोधकांनी घोडेबाजार शब्दावर आक्षेप घेतला. यानंतर नाना पटोले यांनी घोडेबाजार म्हटल्यावर यांना एवढा त्रास का अशी विचारणा केली.
“जी काही संवैधानिक दुरुस्ती झाली, त्याप्रमाणेच आपल्या विधीमंडळाचंही कामकाज व्हावं अशी अपेक्षा आहे. नियम काही पहिल्यांदा बदलत नाही आहोत. हा जो नियम बदलला जात आहे त्यावरही विरोधकांचा आक्षेप आहे. पण हे नियमाप्रमाणे होत असून आमची या प्रस्तावाला मान्यता आहे,” असं नाना पटोले यांनी सांगितलं.