राज्यात महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे चार शेतकऱ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ सोमवारी राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. लखीमपूर खेरी जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ७० किमी अंतरावर टिकुनिया येथे झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी चार शेतकरी होते. लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांना तातडीने आपल्या पदावरुन काढून टाकावे यासाठी काँग्रेसतर्फे राजभवानसमोर मूक आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी राजभवानात जाऊन राज्यपालांकडे यासंदर्भात निवेदन दिले. यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी माध्यमांशी संवाद साधला.

“आम्ही फडणवींसानां अनेक वेळा सल्ला दिला की दुष्काळाच्या काळात दौरे करण्यापेक्षा केंद्र सरकारचा राज्य सरकारच्या बाबतीत जो दुजाभाव बोलावे. आताही राज्य सरकारने केंद्र सरकारकडे १५ हजार कोटींची मागणी केली आहे. त्याला नाममात्र पैसे देण्याचे केंद्राने मान्य केले आहे. राज्य सरकारवर आरोप करण्यापेक्षा देवेंद्र फडणवीसांनी केंद्राकडे जाऊन राज्याच्या सरकारला आणि राज्यातला शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत होईल यासाठी काम करायला हवे. मात्र ते जे बोलतायत त्यावरून फडणवीसांचा ढोंगीपणा राज्याच्या शेतकऱ्यांना दिसून येत आहे,” असे नाना पटोले म्हणाले.

“मावळच्या घटनेचा काँग्रेसने मोठ्या प्रमाणावर निषेध केला होता. राहुल गांधी स्वतः त्या ठिकाणी गेले होते. शेतकऱ्यांबद्दल आमची भूमिका स्पष्ट आहे. पोटात वेगळे आणि ओठावर वेगळे अशी काँग्रेसची भूमिका कधीही राहिली नाही. लखीमपूरच्या घटनेनंतर आमच्या नेत्या प्रियंका गांधीचे ज्यापद्धतीने अपहरण केल्याचे समर्थन भाजपा करत असेल. महिलांचा विरोध करणारे, शेतकऱ्यांचा व्यापाऱ्यांचा विरोध करणाऱ्यांचे समर्थन भाजपा करत असेल तर ते त्यांना लखलाभ आहे,” असे नाना पटोले म्हणाले.

दरम्यान, याआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर टीका केली होती. “आजचा बंद हा ढोंगीपणाचा कळस आहे. हीच ती मंडळी आहेत ज्यांनी मावळमध्ये पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. लखीमपूर घटनेबद्दल तिथलं सरकार दोषींवर कारवाई करत आहेत. मात्र राज्य सरकार त्या घटनेवर राजकीय पोळी भाजता येईल का या संकुचित विचाराने बंद करत आहे. प्रशासनची मदत घेऊन, वापर करून, दमदाटी करुन लोकांना बंद ठेवायला प्रवृत्त केले जात आहे. आत्ता कुठे दुकाने सुरू होत होती, छोट्या व्यावसायिकांची गाडी रुळावर यायला सुरुवात झाली होती. मात्र पुन्हा या सरकारने दुकाने बंद केली आहेत,” असे फडणवीस म्हणाले.

Story img Loader