ज्येष्ठ विचारवंत व कामगार नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा तपास करण्यात येत असलेले अपयश आणि राज्य शासनाच्या भूमिकेविरोधात डाव्या आघाडीने रविवारी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला शहरासह जिल्हय़ात अल्प प्रतिसाद मिळाला. या बंदला काँग्रेस-राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिला होता.  दर रविवारी नाशिकमधील बरीचशी दुकाने बंदच असतात. बस, रिक्षा यांसह सर्व वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू होती. शालिमार परिसरात काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष शरद आहेर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी सकाळी दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. रस्त्यावर ठिय्या दिलेल्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतले. डाव्या आघाडीचा बऱ्यापैकी प्रभाव असलेल्या सातपूर, अंबड, सिडको या परिसरांतही बाजारपेठांमधील सर्व व्यवहार सुरळीत होते. जिल्हय़ाच्या इतर भागांतही असेच चित्र दिसून आले.