अहिल्यानगर:महाराष्ट्र बँकेच्या कर्मचाऱ्यांनी २० मार्चला लाक्षणिक संप पुकारला आहे तर त्यापूर्वी १७ मार्चला पुण्यातील मुख्य कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा निर्णय जाहीर केला आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज, बुधवारी अहिल्यानगर शहरातील बँकेच्या शाखेसमोर जोरदार घोषणाबाजी करत मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले. ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन संलग्न बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियनने हे आंदोलन पुकारले आहे.

अहिल्यानगरमध्ये झालेल्या आंदोलनात संघटनेचे पदाधिकारी प्रकाश कोटा, बाळासाहेब गायकवाड, वीरेंद्र भालसिंग, दत्ता म्याना, माणिक अडानी, कांतीलाल वर्मा, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे संघटनेचे पदाधिकारी सुजय नळे, हरिभाऊ गायकवाड, सचिन म्हसे, उमाकांत कुलकर्णी, विनायक मेरगू, राहुल मोकाशी, योगेश सोन्नीस, विजय भोईटे, गणेश मेरू, अमोल संत, भारतीय असुधानी, विजय साळवे, नाना उपाध्ये, नंदलाल जोशी, एन. डी. तांबडे, वाल्मीक बेर्डे आदी सहभागी झाले होते.

यासंदर्भात माहिती देताना संघटनेचे संघटक सचिव प्रकाश कोटा यांनी सांगितले की, संघटनेचे पदाधिकारी व व्यवस्थापन प्रतिनिधींची औद्योगिक संबंध विषयक बैठक झाली. व्यवस्थापन प्रतिनिधींनी नकारात्मक व असंवेदनशील भूमिका कायम ठेवल्याने महाराष्ट्र बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. हंगामी कर्मचारी कायम ठेवून विविध पदांची नवीन भरती करावी, सहाय्यक पदे भरावीत, द्विपक्षीय संबंध पद्धतीची पुर्नस्थापना करावी, संघटनांची कार्यालये पुन्हा संघटनांना उपलब्ध करावीत, आदी मागण्या आहेत.

मागण्या पूर्ण करण्यासाठी व्यवस्थापन प्रतिनिधींनी असमर्थता व्यक्त केल्याने आंदोलनात निषेध करण्यात आला. प्रत्येकी तिमाहीच्या अखेरीस विंडो ड्रेसिंग करून, अनैतिक पद्धतीचा वापर करून, नियमांचे उल्लंघन करून ताळेबंद सजवला जातो. प्रगतीचे आभासी चित्र निर्माण केले जाते. हे चित्र टिकणारे नाही. ते भ्रमक आहे. बँकेच्या हिताला बाधा आणणारे आहे. कासाठी ठेवीत घट, किरकोळ एनपीएमध्ये वाढ व इतर परिस्थिती ही काळजी करण्यासारखी असल्याकडे प्रकाश कोटा यांनी लक्ष वेधले.

बँक तरतुदीमध्ये बदल करून अल्पावधीत चांगला नफा दाखवू शकते, परंतु हे तात्पुरते असेल, हे धोरण बँक प्रमुखांच्या कार्यकाळापूरते मेळ घालणारे असते. बँक कर्मचारी केवळ प्रेक्षक म्हणून ही परिस्थिती पाहू शकत नाहीत. म्हणूनच बँक ऑफ महाराष्ट्र कुठे घेऊन जाणार, असा प्रश्न उपस्थित करत आंदोलन सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader