राज्य हिंदी साहित्य अकादमीचा अखिल भारतीय हिंदी साहित्य सेवेसाठी दिला जाणारा महाराष्ट्र भारती पुरस्कार यंदा मराठी व हिंदीचे ज्येष्ठ कवी, समीक्षक प्रा. चंद्रकांत पाटील यांना जाहीर झाला आहे. रोख एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या ३० जुलैला प्रा. पाटील यांना मुंबईच्या रवींद्रभवनमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण होईल.
मराठी व हिंदी भाषेत डॉ. पाटील यांची ५० पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. यात कविता, समीक्षा, अनुवाद अशा सर्वच क्षेत्रांना त्यांनी स्पर्श केला. नि:संदर्भ, इत्थंभूत, बायका आणि इतर कविता, दिक्काल हे कवितासंग्रह, तर आणि म्हणूनच, आणि तोपर्यंत, कवितेसमक्ष ही समीक्षेची पुस्तके आहेत. प्रा. पाटील यांना यापूर्वी भीष्म साहनी यांच्या ‘तमस’ या कादंबरीच्या मराठी अनुदावादासाठी साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कार देण्यात आला. कवितांतरण या त्यांच्या काव्य संपादनासाठी अमेरिकेच्या महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे त्यांना गौरविण्यात आले आहे.
अखिल भारतीय श्रीकांत वर्मा स्मृती अनुवाद अभ्यासवृत्ती (भोपाळ), उत्तर प्रदेश साहित्य अकादमीचा सौहार्द सन्मान, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा गजानन माधव मुक्तिबोध पुरस्कार असे अनेक महत्त्वपूर्ण पुरस्कार पाटील यांना मिळाले आहेत. त्यांच्या अनेक पुस्तकांना सरकारच्या वतीने राज्य पुरस्कार मिळाले आहेत. पाटील हे मराठी व िहदी भाषांतील महत्त्वाचा दुवा मानले जातात. मराठीतील अनेक महत्त्वाच्या कवींना त्यांनी हिंदी भाषेत अनुवादित केले आहे. हिंदीतील केदारनाथसिंह, चंद्रकांत देवताले, विष्णू खरे आदींच्या कवितांचे त्यांनी मराठीत अनुवाद केले. नुकतेच मराठवाडा साहित्य परिषदेने पाटील यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले.
पाटील यांनी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कविसंमेलन व चर्चासत्रात महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवला. पणजी, पाटणा, हैदराबाद, तिरुअनंतपुरम अशा ठिकाणी त्यांनी कविता, निबंध सादर केले आहेत. साहित्य अकादमीतर्फे भारतीय लेखकांच्या प्रतिनिधी मंडळात सदस्य म्हणून बीजिंग (चीन) आणि विश्व िहदी संमेलनात जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका) येथे त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. दुबईत पार पडलेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनात कविसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले.
नॅशनल बुक ट्रस्ट, साहित्य अकादमी, अखिल भारतीय साहित्य महामंडळ आदी अनेक महत्त्वाच्या साहित्य संस्थांमध्ये त्यांनी सदस्य म्हणून काम केले. राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कबीर सन्मान (भोपाळ), साहित्य अकादमी (दिल्ली), भारतीय भाषा संस्थान (म्हैसूर), वर्णमाला पुरस्कार (ओडिसा) आदी महत्त्वाच्या पुरस्कार समित्यांच्या निवड समितीवर त्यांनी काम केले. प्रा. पाटील यांना जाहीर झालेल्या महाराष्ट्र भारती पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

Story img Loader