महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे. रविवारी तालकटोरा स्टेडियमवर झालेल्या राष्ट्रवादीच्या आठव्या राष्ट्रीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर करण्यात आलेल्या टीकेवरुन बावनकुळे यांनी राष्ट्रवादी पक्षाचा उल्लेख ‘टोळी’ असा केला आहे. मात्र त्याचवेळी बावनकुळे यांनी शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी केलेल्या कामाचाही उल्लेख केला आहे.

नक्की वाचा >> अजित पवारांच्या नाराजी नाट्याची चर्चा: NCP च्या राष्ट्रीय अधिवेशनात भाषण का केलं नाही? विचारलं असता म्हणाले, “मी भाषण…”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धुळ्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधत असताना बावनकुळे यांना राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण न करु दिल्याच्या संदर्भातून प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, “कोणाला भाषण करु देणे कोणाला न करु देणे हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण एक गोष्ट खारी आहे की, राष्ट्रवादीमध्ये अनेक विषयांवरुन धुसपूस सुरु आहे. ती अनेकदा सार्वजनिक पद्धतीने बाहेर सुद्धा आली आहे. पण ही धुसपूस कशी थांबवायची हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे,” असं बावनकुळे यांनी सांगितलं आहे.

“या धुसपूसमध्ये राष्ट्रवादीतून कोणी भाजपामध्ये आलं तर आपण स्वागत कराल का?” असा प्रश्न बावनकुळेंना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना पक्षाच्या नियमांनुसार काम करणाऱ्या सर्वांसाठी आमची दारं खुली असल्याचं सूचक विधान बावनकुळे यांनी केलं. “भाजपामध्ये जो येत असेल त्याच्यासाठी आमचं कमळ तयार आहे. आम्हाला हे करा, ते करा अशी कोणतीही अट आम्ही घालणार नाही. भाजपामध्ये आमच्या संघटनेच्या शिस्तीप्रमाणे काम करणाऱ्यासाठी जो कोणी येत असेल त्याला आम्ही माननीय नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश द्यायला तयार आहोत. आम्ही त्याचं स्वागत करु. त्यांचा मानसन्मान करु. त्यांना ज्या पक्षात होते. त्या पक्षापेक्षाही चांगली वागणू देऊ,” असं बावनकुळे म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांनी केलेल्या टीकेवरुन प्रश्न विचारला असता बावनकुळे यांनी राष्ट्रवादी ही एक टोळी असल्याचा टोला लगावला. “त्यांचा पक्षच तुष्टीकरणाच्या आधारावर टिकून आहे. राष्ट्रवादीकडे काही व्हीजन आहे का? हा व्हीजन असणार पक्ष आहे का?” असे प्रतिप्रश्न बावनकुळे यांनी उपस्थित केले. तसेच, “राष्ट्रवादीने म्हणजे नेत्यांनी तयार केलेली एक टोळी असून त्या टोळीतून निर्माण झालेला हा पक्ष आहे. ज्या ठिकाणी नेता आहे त्या ठिकाणी टोळी आहे. नेता गेला की राष्ट्रवादी गेली. त्यामुळेच या पक्षाला काही व्हीजन नाही,” असंही बावनकुळे म्हणाले.

शरद पवार सोडल्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडे काही व्हीजन नाही असंही बावनकुळेंनी म्हटलं आहे. “माननीय शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी अनेक वर्ष काम केलेलं आहे. पण पक्ष म्हणून जर विचार केला तर या पक्षाला कुठलंही व्हिजन नाही,” असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra bjp chief chandrashekhar bawankule slams ncp scsg
Show comments