पाण्याच्या टाक्यांचे वाटप आणि जलपुनर्भरण मदत हवेतच!

सत्ता आली की सत्तेसोबत काही गुण सत्ताधाऱ्यांना चिकटतात, असे जाणकार मंडळी सांगतात. त्यात आश्वासने, घोषणा यांचा कृतीशी संबंध ठेवायचा नाही हे पूर्वीच्या काँग्रेस-राष्ट्रवादीप्रमाणे सत्ताधारी भाजपनेही ठरवल्याचे लातूरकरांना आता कळून चुकले आहे.

लातूरच्या पाणीप्रश्नाची तीव्रता लक्षात घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसेसह विविध स्वयंसेवी संस्थांनी भरीव मदत केली. त्यात सातत्य ठेवले. १५ मे रोजी भाजपचे राज्यातील १४ खासदार एकाच दिवशी जिल्हय़ातील दहाही तालुक्यांत गेले. लोकांशी संवाद साधला. सायंकाळी अधिकाऱ्यांची बठक घेतली. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत टाऊन हॉलच्या मदानावर जंगी सभा झाली. या सभेत लातूरकरांना टँकरचे २०० लिटर पाणी घेणे सोयीचे व्हावे, यासाठी प्रदेश भाजपतर्फे ५ हजार टाक्यांचे वाटप केले जाईल, अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी केली. शहरातील जलपुनर्भरण योजनेसाठी वस्तुरूपात ५० टक्के मदत पक्षातर्फे केली जाईल, पक्ष तुमच्या सोबत असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

दानवे यांचे भाषण सुरू असतानाच पाण्याची टाकी दिली जाईल, असे सांगून सभेला आणलेल्या महिलांनी आमची टाकी कधी मिळणार, म्हणत आरडाओरडा केला, तेव्हा कार्यकत्रे तुमच्या घरी टाकी आणून देतील, असे व्यासपीठावरून सांगण्यात आले. त्यामुळे महिलांचा रोष तात्पुरता निवळला, परंतु महिना उलटून गेला, पाऊस चांगला झाला तर जुल महिन्यात कदाचित टँकर बंद करण्याची वेळही येईल, मात्र अजूनही लातूरकर भाजपच्या टाक्यांच्या प्रतीक्षेतच आहेत.

लातूर शहरवासीयांनी या वर्षी मोठय़ा प्रमाणावर घराच्या छतावरील पाणी आवारात मुरवण्याचे अभियान घेतले. एकटय़ा अतुल ठोंबरे यांच्या पुढाकारातून एक हजार जणांनी पुनर्भरण केले, मात्र भाजपने अजून एकाही मालमत्ताधारकास वस्तुरूपात मदत केली नाही. लोकांनी अपेक्षा न करता आश्वासने द्यायची आणि त्याची पूर्तता मात्र करायची नाही, अशी एकूण तऱ्हा!

Story img Loader