लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपुष्टात आल्यानंतर आता विविध राज्यांमधील विधानसभेच्या निवडणुकांचं रणशिंग फुंकलं जात आहे. येत्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणा या तीन राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना आणि निवडणुकीच्या तयारीलाही वेग आला आहे. अशातच आता महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मालेगाव, धुळे परिसरातील मतदारांच्या मतदान कार्डांमध्ये मोठा घोळ झाला असल्याचा आरोप केला आहे.
हेही वाचा : भय इथले संपत नाही….इरशाळवाडीच्या दरड दुर्घटनेची वर्षपूर्ती, वर्षभरानंतरही कायमस्वरूपी पुनर्वसन नाही
काय म्हणाले बावनकुळे?
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले की, “धुळे आणि मालेगाव लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांमध्ये तीन हजारच्या वर मतदारांच्या नोंदणींमध्ये घोळ झाला आहे. या मतदारांची नोंदणी मालेगावमध्येही आहे आणि धुळे विधानसभा मतदारसंघामध्येही आहे. मतदान कार्डावरील क्रमांक, फोटो यांसारख्या सगळ्याच बाबी एकसारख्या आहेत. जर निवडणूक आयोग सगळ्या नोंदी डिजीटलायझेशनने करतो, तर ही बाब त्यांच्या लक्षात का येत नाही? हेच तीन हजार लोक धुळ्यातही मतदान करणार आणि तेच मालेगावमध्येही करणार, अशी अवस्था आहे. जर धुळ्याची जागा पाडायची असेल तर धुळ्यात मतदान करायचे आणि मालेगावची जागा पाडायची असेल तर मालेगावमध्ये मतदान करायचे, या मानसिकतेतून असे प्रकार महाराष्ट्रातील ३०-४० विधानसभा मतदारसंघांमध्ये घडले आहेत, असे मला वाटते. आम्ही आज निवडणूक आयोगाकडे यासंदर्भातील तक्रार दाखल केली आहे. जे अधिकारी या प्रकारचे काम करतात, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी भाजपाने केली आहे.”
यामागे मोठं षडयंत्र असल्याचा बावनकुळेंचा आरोप
पुढे ते म्हणाले की, “हे एक मोठं षडयंत्र आहे. खासकरुन ही सगळी मते एका समाजाची आहेत. आम्ही कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही. मात्र, खासकरुन मुस्लीम समाजाचीच तीन हजार मते धुळ्यात आहेत, तीच मते मालेगावमध्ये आहेत. सारखेच, क्रमांक, सारखेच फोटो आणि सारखेच मतदान कार्ड दोन्ही मतदारसंघांमध्ये कसे असू शकतात? याचा अर्थ हे जाणूनबुजून करण्यात आलेले षड्यंत्र आहे.”
हेही वाचा : मला धमकी देणाऱ्यामागे ‘या’ नेत्याचा हात; वसंत मोरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले, “१५ दिवसांपूर्वी…”
२०१९ मध्येही असाच प्रकार घडल्याचा आरोप
पुढे आणखी एक आरोप करत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “२०१९ मध्ये काही बूथवर असणाऱ्या आमच्या मतदारांची नावेच मतदार यादीतून रद्द करण्यात आली आहेत. आता आम्ही निवडणूक आयोगाला पुन्हा विनंती केली आहे की, जिथे जिथे असा प्रकार घडला आहे, तिथे जाऊन, चौकशी करुन पुन्हा त्यांची नावे मतदार यादीत घेण्यात यावीत.”
महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये होणार विधानसभेची निवडणूक
महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे राज्याच्या राजकारणातील दोन्ही मुख्य पक्ष फुटलेले असल्याने या निवडणुकीत अधिक चुरस पहायला मिळणार आहे. सध्या शिवसेना (शिंदे गट), भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे तिन्ही पक्ष सत्तेत असून विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती म्हणून ते एकत्र लढणार आहेत; तर दुसऱ्या बाजूला शिवसेना (उद्धव ठाकरे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार आहेत. महाराष्ट्रात २८८ जागांसाठी विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे.