केंद्र सरकारने रेल्वेभाडेवाढीचा निर्णय घेतल्यानंतर देशभरात याबद्दल निरनिराळ्या प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत. अगोदरच महागाईच्या ओझ्याने पिचलेल्या सामान्य नागरिकांनी या भाडेवाढीचा तीव्र निषेध केला होता. त्यानंतर आज (रविवार) महाराष्ट्र भाजपनेसुद्धा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या निर्णयाचा विरोध करत, हा निर्णयच मागे घेण्याची मागणी केली. रेल्वेच्या प्रवासी आणि मालवाहतुकीच्या दरांमध्ये वाढ करताना, मोदी सरकारकडून या भाडेवाढीच्या मोबदल्यात चांगल्या सुविधा देऊ करण्याचा युक्तिवाद करण्यात आला होता. त्याचाच आधार घेत महाराष्ट्र भाजपने आधी रेल्वेचा विकास आराखडा सादर करा आणि त्यानंतरच भाडेवाढ करा असा पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाला या निर्णयाचा फटका बसू शकतो, अशी भीती महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या निर्णयावर फेरविचार करावा अशी मागणी महाराष्ट्र भाजपकडून करण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह सध्या महाराष्ट्रात असून, त्यांच्यासमोर हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.