Mumbai-Maharashtra News in Marathi : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवं सरकार अस्तित्वात आल्यानंतरचं पहिलंच अधिवेशन सध्या सुरू आहे. त्यामुळे राजकीय दावे-प्रतिदावे आणि आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण अधिवेशनात पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी केली असून या मुद्द्यांवर सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी सज्ज आहेत.

Live Updates

Maharashtra Political Crisis Live Updates : विधिमंडळ कामकाजाच्या महत्त्वाच्या अपडेट एका क्लिकवर

19:29 (IST) 24 Aug 2022
लैंगिक अत्याचारप्रकरणात भाजपच्या जिल्हाध्यक्षाला अटकपूर्व जामीन नाकारला

भाजपच्या एका ३३ वर्षांच्या पदाधिकारी तरूणीला लग्नाचे आमीष दाखवून तिच्यावर अनेक दिवस लैंगिक अत्याचार केले आणि नंतर धमकावल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा अटकपूर्व जामीनअर्ज सोलापूरच्या सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.

सविस्तर वाचा

19:19 (IST) 24 Aug 2022
पोलीस कोठडीत आरोपीचा मृत्यू; पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

रेल्वे पोलिसांच्या पोलीस कोठडीत असताना आरोपीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागेश रामदास पवार (वय २९, हडपसर, मुळ रा.मोहोळ, सोलापूर) असे मृत आरोपीचे नाव आहे.

सविस्तर वाचा

19:12 (IST) 24 Aug 2022
पुणे : अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी ३० ऑगस्टला

मुंबई महानगर प्रदेश, पुणे, पिंपरी चिंचवड, अमरावती, नागपूर आणि नाशिक या महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आता विशेष फेरीद्वारे अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येईल. त्यासाठी पहिल्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, २५ ते २७ ऑगस्टदरम्यान विद्यार्थ्यांना नोंदणी, प्रवेश अर्जाचा भाग दोन भरून महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरता येतील, तर ३० ऑगस्टला गुणवत्ता यादी आणि महाविद्यालय प्रवेश जाहीर करण्यात येतील. बातमी वाचा सविस्तर…

18:46 (IST) 24 Aug 2022
पिंपरी-चिंचवड : जबरदस्तीने वर्गणी मागितल्यास होणार गुन्हा दाखल – पोलीस आयुक्त अंकुश शिंदेंचा इशारा!

पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जबरदस्तीने वर्गणी मागणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. या अगोदर अनेकांना अशा प्रकरणात बेड्या ठोकल्याचा उल्लेख करत तंबी दिली आहे. नियमांच्या चौकटीत राहून गणेश उत्सव साजरा करण्याच आवाहन त्यांनी गणेश मंडळांना केले आहे. ते लोकसत्ता ऑनलाइनशी बोलत होते. वाचा सविस्तर बातमी…

18:17 (IST) 24 Aug 2022
अकोला : अन् ‘तो’ चक्क वेषांतर करून विद्यार्थिनींच्या वसतिगृहात शिरला, चित्रफीत प्रसारित

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील विद्यार्थिनींच्या वसतिगृहात एक विद्यार्थी वेषांतर करून शिरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अभाविपने आंदोलन करून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांना निवेदन दिले. वाचा सविस्तर बातमी…

18:13 (IST) 24 Aug 2022
ठाणे : ‘केडीएमटी’च्या कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती योजना लागू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा महत्वपूर्ण निर्णय

कल्याण-डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमातील २००५ पूर्वी लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन १९८२ ची योजना लागू करण्याचा आणि १८ वर्षापासून कंत्राटी पदावर कार्यरत ५९ वाहकांना कायम करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज (मंगळवार) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण डोंबिवली पालिका परिवहन कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यां बरोबर झालेल्या बैठकीत घेतला. वाचा सविस्तर बातमी…

18:02 (IST) 24 Aug 2022
ठाणे पालिकेचा अतिक्रमण विभाग चौकशीच्या फेऱ्यात सापडण्याची चिन्हे; भाजपचे आमदार संजय केळकर यांचे गंभीर आरोप

ठाणे, कोपरी, घोडबंदर, कळवा, मुंब्रा आणि दिवा भागात बेकायदा बांधकामे सुरु असल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्याने महापालिकेच्या कारभारावर टिका होत असतानाच, भाजपचे आमदार संजय केळकर यांनी शहरातील बेकायदा बांधकामांचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करत या बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.

सविस्तर वाचा

17:50 (IST) 24 Aug 2022
पुणे : श्वसनाच्या आजारांबाबत जनजागृतीसाठी केईएम रुग्णालयातर्फे लघुपटाची निर्मिती

ग्रामीण भागात श्वसनाच्या आजारांबाबत जनजागृती करण्यासाठी तसेच उपचार, समज, गैरसमज यांबाबत प्रबोधन करण्यासाठी पुण्यातील केईएम हॉस्पिटल रीसर्च सेंटरतर्फे एका विशेष लघुपटाची निर्मिती करण्यात आली आहे. बातमी वाचा सविस्तर…

17:33 (IST) 24 Aug 2022
सट्टेबाज सोनू जालानविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल

क्रिकेटमध्ये सट्टेबाजी करणाऱ्या सोनू जालान त्याचे साथिदार केतन तन्ना आणि जय तन्ना या तिघांविरोधात ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सविस्तर वाचा

17:21 (IST) 24 Aug 2022
भंडारा : मोबाईलवर बदनामीकारक बोलल्याच्या कारणावरून विद्यार्थिनीला मारहाण

मैत्रिणीसोबत मोबाईलवर ‘चॅटिंग’ करणे विद्यार्थिनीला चांगलेच महागात पडले. साकोली येथील एका शाळेतील विद्यार्थिनीला दोन युवकांनी शाळेत जाऊन मारहाण केली. बातमी वाचा सविस्तर…

17:06 (IST) 24 Aug 2022
पाच वर्षांत रस्ते दुरुस्तीसाठी १२ हजार कोटी खर्च : आक्रमक झालेल्या काँग्रेसची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी

गेल्या पाच वर्षांमध्ये मुंबई महानगरपालिकेने रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तब्बल १२ हजार कोटी रुपये खर्च केले. मात्र तरीही मुंबईकरांना खड्डयांचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पाच वर्षांत रस्त्यांच्या दुरुस्तीच्या नावाखाली भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी केला आहे. या घोटाळ्याची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सविस्तर वाचा

17:06 (IST) 24 Aug 2022
डॉ. संगीता बर्वे यांच्या ‘पियूची वही’ला साहित्य अकादमी पुरस्कार

पुणे : प्रसिद्ध बालसाहित्यकार आणि कवयित्री डॉ. संगीता बर्वे यांच्या ‘पियूची वही’ या पुस्तकास साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.साहित्य अकादमीच्या वतीने बाल साहित्य पुरस्कारांची बुधवारी घोषणा करण्यात आली. बातमी वाचा सविस्तर…

17:05 (IST) 24 Aug 2022
पिंपरी : आयुक्तांची बदली होताच गणवेश सक्तीच्या आदेशाला केराची टोपली

पिंपरी पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशिष्ट गणवेश (ड्रेस कोड) बंधनकारक करण्याची घोषणा यापूर्वीचे आयुक्त राजेश पाटील यांनी केली होती. मात्र, पाटील यांची बदली होताच, गणवेशाच्या सक्ती आदेशाला सर्वांनी मिळून केराची टोपली दाखवली आहे. बातमी वाचा सविस्तर

17:04 (IST) 24 Aug 2022
आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण : ईडीला तडाखा; ओमकार रिॲल्टर्सचे दोन पदाधिकारी दोषमुक्त

ओमकार रिॲल्टर्स आणि डेव्हलपर्सचे प्रवर्तक बाबूलाल वर्मा आणि अध्यक्ष कमल किशोर गुप्ता यांना विशेष न्यायालयाने बुधवारी आर्थिक गैव्यवहाराच्या आरोपांतून दोषमुक्त केले. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याबाबत (पीएमएलए) सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालाच्या आधारे दिलेला हा पहिलाच निर्णय असून अंमलबजावणी संचालनालयासाठी (ईडी) हा मोठा धक्का आहे.

सविस्तर वाचा

17:00 (IST) 24 Aug 2022
ओला-उबर चालकांना लुटणारी टोळी अटकेत

चाकूचा धाक दाखवून ओला-उबर चालकांना लुटणाऱ्या एका टोळीला शिवाजी नगर पोलिसांनी अटक केली. या आरोपींनी शहरात अनेकांना लुटल्याचा पोलिसांना संशय असून याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सविस्तर वाचा

16:57 (IST) 24 Aug 2022
“कोणी काहीही म्हणू दे, पण छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरू हे…”; अमोल कोल्हेंचं राज्यपाल कोश्यारींसमोर विधान!

“कोणी काहीही म्हणू दे, पण छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरू हे शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ हेच आहेत.” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या समोर स्पष्टपणे सांगितलं. वाचा सविस्तर बातमी…

16:48 (IST) 24 Aug 2022
दहीहंडीमध्ये उंचावरुन पडल्यामुळे मेंदूमृत झालेल्या तरुणाचे अवयवदान; चार गरजू रुग्णांना जीवदान

सदर मेंदूमृत अवयवदाता हा चिखली येथील २८ वर्षांचा तरुण रहिवासी होता.  अर्थार्जनासाठी तो रीक्षा चालवत असे. दहीहंडी उत्सवात सहभाग घेतल्यानंतर उंचावरुन पडल्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. उपचारांसाठी त्याला डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने त्याला मेंदूमृत जाहीर करण्यात आले.

सविस्तर वाचा

16:47 (IST) 24 Aug 2022
अपंगांना बेस्टचे स्मार्ट कार्ड घरपोच मिळणार

अपंग प्रवाशांना देण्यात येणारे सवलतीचे ओळखपत्र किंवा कागदी ओळखपत्र बदलण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला असून आता अपंग प्रवाशांना स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे. स्मार्ट कार्ड मिळविण्यासाठी या प्रवाशांना आगार किंवा बस स्थानकात खेटे घालण्याची गरज नाही. त्यांना ते घरपोच मिळेल, अशी माहिती बेस्ट उपक्रमातील अधिकाऱ्यांनी दिली.

सविस्तर वाचा

15:41 (IST) 24 Aug 2022
‘आरे’ कारशेडप्रकरणी ३० ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी

‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’साठी गोरेगावमधील आरे वसाहतीत उभारण्यात येणाऱ्या कारशेड विरोधातील याचिकेवरील पुढील सुनावणी ३० ऑगस्टला होणार आहे. राज्य सरकार, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरडीसी) काही कागदपत्रे जमा करण्यासाठी मुदत मागितली होती. न्यायालयाने अखेरची संधी म्हणून कागदपत्रे सादर करण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली आहे. न्यायालयाने पुढील सुनावणी ३० ऑगस्टला ठेवली आहे. वाचा सविस्तर बातमी…

15:02 (IST) 24 Aug 2022
नागपूर : लता मंगेशकर रुग्णालयातील आंतरवासिता डॉक्टर संपावर

एन. के. पी. साळवे वैद्यकीय महाविद्यालय व लता मंगेशकर रुग्णालयातील आंतरवासिता डॉक्टरांना पूर्ण क्षमतेने वैद्यकीय सेवा दिल्यावरही त्यांना कमी मानधन दिले जाते. त्यामुळे संतप्त डॉक्टरांनी सोमवारपासून मानधन वाढवण्याच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. तब्बल दीडशे डॉक्टर संपावर गेल्याने येथील रुग्णसेवा प्रभावित झाल्याचा आंदोलकांचा दावा आहे. वाचा सविस्तर वृत्त

14:03 (IST) 24 Aug 2022
सोनिया गांधी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडणार?

सोनिया गांधींनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदाची ऑफर दिली असल्याचा दावा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी फेटाळला आहे. काँग्रेसच्या श्रेष्ठींनी आपल्यावर जबाबदारी टाकलेली असून, आपण त्याच्याशी तडजोड करणार नाही असंही ते म्हणाले आहेत. “मला प्रसारमाध्यमांकडूनच ही माहिती मिळाली आहे. मला याबद्दल काहीच माहिती नाही. माझ्यावर दिलेल्या जबाबदाऱ्या मी पार पाडत आहे,” असं अशोक गहलोत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

सविस्तर बातमी

13:45 (IST) 24 Aug 2022
पुणे : वर्तुळाकार रस्ता प्रकल्पबाधितांचा मोबदला थेट बँकेच्या खात्यावर

वर्तुळाकार रस्त्याच्या भूसंपादनासाठी अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेल्या निधीपैकी पहिल्या टप्प्यातील २५० कोटींचा निधी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॅार्पोरेशन – एमएसआरडीसी) वर्ग करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने भूसंपादनासाठी तालुकानिहाय नियुक्त केलेले उपजिल्हाधिकारी आणि रस्ते महामंडळाचे कार्यकारी अभियंता या दोघांचे मिळून बँकेत संयुक्त खाते तयार करण्यात आले आहेत. मागणी झाल्यानंतर वाणिज्य विभागामार्फत थेट बँक खात्यावर निधी हस्तांतरीत करण्यात येणार आहे. वाचा सविस्तर बातमी…

13:28 (IST) 24 Aug 2022
मुंबई : गणेशोत्सवातील मंडपासाठी अखेरच्या दिवसापर्यंत २७३२ अर्ज

गणेशोत्सव अवघ्या सहा दिवसांवर आला असून मुंबई महानगरपालिकेकडे रस्त्यावर मंडप उभारण्यासाठी यंदा २७३२ अर्ज आले आहेत. अर्ज करण्याची २३ ऑगस्टपर्यंत मुदत होती. मुदतीच्या अखेरच्या दिवशी १,९४७ मंडळांना मंडप परवानगी देण्यात आली. तर ४१५ मंडळांना परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. वाचा सविस्तर बातमी…

13:16 (IST) 24 Aug 2022
“अरे हाड! ते काय…,” विरोधकांनी धक्काबुक्की केली का? विचारताच भरत गोगावले संतापले

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद झाल्यानंतर आता आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. तर, दुसरीकडे शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी अंगावर आलात तर शिंगावर घेऊ असा इशारा प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे.

सविस्तर बातमी

13:07 (IST) 24 Aug 2022
गणेशोत्सवासाठी कोकणात जाताय, प्रवासासाठी मोजावे लागणार २ हजार २०० रुपये

रेल्वे गाड्या आणि एसटीचे आरक्षण मिळत नसल्यामुळे गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी अनेकांना आरायमदायी खासगी प्रवासी बसची निवड करावी लागत आहे. मात्र, या बसमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना अव्वाच्या सव्वा भाडे मोजावे लागत आहे. मुंबई, ठाण्यातून रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत वातानुकूलित बसमधील शयनयान श्रेणीसाठी २,२०० ते २,५०० रुपये भाडे आकारण्यात येत आहे. अन्य पर्याय उपलब्ध नसल्याने अनेकांना नाईलाजाने खिशाला खार लावून कोकणाची वाट धरावी लागणार आहे. वाचा सविस्तर बातमी…

13:04 (IST) 24 Aug 2022
संभाजीनगरमध्ये महिला अधिकाऱ्याला नग्न महिलेचे पेपरवेट दाखवून अश्लील चाळे, भाजपा आमदाराची थेट अधिवेशनात तक्रार

महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनात भाजपा आमदार सुभाष देशमुख यांनी संभाजीनगरमधील महावितरण कार्यालयात अधीक्षक अभियंता महिला अधिकाऱ्याला नग्न महिलेचं चित्र असणारं पेपरवेट दाखवून चाळे करत असल्याची तक्रार केली आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करून निलंबन करावे, अशी मागणी सुभाष देशमुखांनी केली. विशेष म्हणजे हा प्रकार जानेवारी २०२२ पासून सुरू असल्याचंही देशमुखांनी नमूद केलं आहे.

सविस्तर बातमी…

13:04 (IST) 24 Aug 2022
मंत्री चांगलंच उत्तर देतील अशी हमी तुम्ही कशी देता? जयंत पाटलांच्या खोचक प्रश्नावर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर म्हणाले…

महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे-फडणवीस सरकारसोबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनाही चांगलंच धारेवर धरलेलं दिसत आहे. बुधवारी (२४ ऑगस्ट) विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अंतिम आठवडा प्रस्ताव लवकर चर्चेसाठी घेण्याची मागणी केली. यावर नार्वेकरांनी तुमचं समाधान होईल असं उत्तर घेऊ, असं उत्तर दिलं. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटलांनी आक्षेप घेत खोचक प्रश्न विचारला. याची सध्या जोरदार चर्चा आहे.

सविस्तर बातमी…

12:48 (IST) 24 Aug 2022
नागपुरात अग्निवीरांसाठी विशेष कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम, सेवामुक्तीनंतर होणार लाभ

संरक्षण दलात अग्निवीर म्हणून नियुक्त झाल्यावर चार वर्षांनी सेवामुक्त होणाऱ्यांसाठी नागपुरातील अंबाझरी यंत्र इंडिया लि. (जुने नाव आयुध निर्माणी बोर्ड) येथे विशेष कौशल्यावर आधारित पदविका, पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा…

12:34 (IST) 24 Aug 2022
जुन्या ठाण्यातील पुनर्विकासातील अडथळे दूर होण्याची चिन्हे

ठाणे शहरातील अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला मान्यता मिळालेली नसतानाही त्या प्रकल्पाच्या नावाखाली जुन्या ठाण्यातील म्हणजेच, नौपाडा भागातील धोकादायक अधिकृत इमारतींच्या पुनर्विकासास पालिकेकडून परवानगी नाकारली जात आहे. या संदर्भात भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेचे लक्षवेधी सुचनेद्वारे लक्ष वेधले असून तालिका सभापती प्रसाद लाड यांनी सभापतींच्या दालनात विशेष बैठक बोलाविण्याचे निर्देश दिले आहेत. वाचा सविस्तर बातमी…

12:31 (IST) 24 Aug 2022
’पन्नास खोके एकदम ओक्के’ ही घोषणा शिंदे गटाला जिव्हारी लागली – अजित पवार

आज अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्याच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचे बघायला मिळाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि महेश शिंदे यांनी एकमेकाला धक्काबुक्की केली. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे गटातील आमदारांवर जोरदार टीका केली आहे.’पन्नास खोके एकदम ओक्के’ ही घोषणा त्यांना जिव्हारी लागली असून त्यातून हा प्रकार घडला, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. सविस्तर वाचा

महाराष्ट्र विधानसभा (संग्रहीत छायाचित्र)

Maharashtra Political Crisis Live Updates : विधिमंडळ कामकाजाच्या महत्त्वाच्या अपडेट एका क्लिकवर