Marathi News Updates : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण गेल्या महिन्याभरापासून चर्चेत आहे. या हत्येतील सहा आरोपींपैकी पाच आरोपींना अटक करण्यात आलेली आहे, तर एक आरोपी अद्यापही फरार आहे. दुसरीकडे खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड सध्या कोठडीत असून वाल्मिक कराडचा या घटनेत संबंध असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. तसेच वाल्मिक कराड कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे असल्याने विरोधकांकडून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. मात्र, या भेटीत नेमकं काय चर्चा झाली? हे अद्याप समोर आलेलं नाही. तसेच सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच राजकारण सुरु आहे. याबरोबरच एचएमपीव्ही विषाणूचे काही रुग्ण भारतातही सापडले आहेत. त्यामुळे याबाबत आरोग्य विभाग अलर्ट झालेला आहे.
Marathi News Live Updates : राज्यातील राजकीय आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात.
आयकर विभागाचा चालक बनला तोतया आयुक्त, नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना कोट्यवधींचा गंडा
वसई : आयकर विभागात चालक म्हणून काम करणाऱ्या एका भामट्याने चक्क आयकर अधिकारी असल्याचे भासवून अनेक तरुणांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. गुन्हे शाखा ३ च्या पथकाने या तोतया इमसाला अटक केली आहे.
दुर्गाडी किल्ला परिसरात जैसे थे स्थिती ठेवण्याचे कल्याण जिल्हा न्यायालयाचे आदेश
कल्याण : येथील दुर्गाडी किल्ल्या संदर्भात न्यायालयात ४८ वर्षांपासून सुरू असलेल्या दाव्यात अलीकडेच कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने दुर्गाडी किल्ल्याची जागा ही शासनाच्या मालकीची असल्याचा निर्णय दिला होता. ही जमीन मुस्लिम समाजाचा असल्याचा दावा फेटाळून लावला होता. या निर्णयाविरुध्द मजलिस ए मुशावरीन या मुस्लिम समाजाच्या संघटनेने स्थगितीची मागणी न्यायालयाकडे केली होती. कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांनी या मागणीवर मंगळवारी दुर्गाडी किल्ला व परिसरात स्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले.
मार्वे मनोरी जोडणाऱ्या पुलाला पर्यावरणाची मंजुरी
मुंबई : पश्चिम उपनगरातील मार्वे आणि मनोरी या दोन समुद्र किनाऱ्यांना जोडणारा पूल पालिकेच्यावतीने बांधण्यात येणार असून या पुलाला पर्यावरण विभागाची नुकतीच मंजूरी मिळाली आहे. महाराष्ट्र सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने (एमसीझेडएमए) ने मंजूरी दिल्यामुळे हा पूल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नाशिक : तक्रारदारांना पोलिसांकडून चोरीस गेलेला मुद्देमाल परत
नाशिक - महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त आयुक्तांच्या हस्ते विविध गुन्ह्यांचा तपास करुन जप्त केलेला मुद्देमाल तक्रारदारांना परत करण्यात आला.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहर परिसरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या मालमत्ताविषयक गुन्ह्यांची उकल करण्याच्या सूचना केल्या होत्या. गुन्हे शाखा विभाग एक आणि दोनचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अनेक गुन्हे उघडकीस आणले. त्याअंतर्गत संशयितांकडून एक कोटी, ६७ लाख, ५३ हजार ६६९ रुपयांचे सोन्याचे दागिने, ४८ लाख ५६ हजार ५३० रुपये रोख, ११ लाख, ८७ हजार, ५०० रुपयांच्या दुचाकी, २३ लाख, ७० हजार रुपयांच्या मोटारी, २९ लाख, २५ हजार ९०० रुपयांचे भ्रमणध्वनी आणि सात लाख, ३३ हजार ५०० रुपयांच्या इतर मौल्यवान वस्तु असा दोन कोटी, ८८ लाख, २७ हजार ९९ रुपयांचा मुद्देमाल परत मिळवला.
मोहदरी घाटात महिलेस लुटणारे दोन जण ताब्यात
नाशिक ते सिन्नर यादरम्यानच्या मोहदरी घाटात महिलेस लुटणाऱ्या चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी सिन्नर पोलिसांनी अवघ्या १२ तासात ताब्यात घेतले. संशयितांकडून नऊ लाखापेक्षा अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
संगमनेर येथील महिला नांदुरशिंगोटे येथे जाण्यासाठी मंगळवारी दुपारी सिन्नर एमआयडीसी परिसरात पांढऱ्या रंगाच्या खासगी वाहनात बसली असता चालक आणि वाहनातील एकाने शस्त्राचा धाक दाखवत महिलेकडील मुद्देमाल हिसकावून घेतला. संबंधित महिलेने सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे राजु सुर्वे आणि सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद पाटील यांनी वाहन, संशयितांचे वर्णन, पेहराव तसेच बोलीभाषा यावरून गुन्हेगार सिन्नर शहर परिसरातील असल्याचा अंदाज बांधला. पोलिसांनी संशयित संदीप वाघ (२८, रा. मापारवाडी), रोहित लहाने (२४, रा. सोनगिरी) यांना ताब्यात घेतले. त्यांनी महिलेचे सोने, चांदीचे दागिने आणि बॅग जबरीने चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी संशयितांकडील वाहन व अन्य सामान असा नऊ लाख नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोग्य विभागाच्या 'बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात' ४२ लाख रुग्णांवर उपचार!
मुंबई : राज्यातील गोरगरीब रुग्णांना सर्दी, खोकला व ताप आदी छोट्या आजारांसाठी बाह्यरुग्णसेवा मोफत उपलब्ध व्हावी या संकल्पनेतून आरोग्य विभागाने सुरु केलेल्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात गेल्या वर्षभरात ४२ लाख ४० हजार ७८० लोकांना बाह्यरुग्णसेवा देण्यात आली तर सुमारे पाच लाख रुग्णांची मोफत प्रयोगशाळा चाचणी आणि ६८ हजार ३७२ गर्भवती महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
महापालिका निवडणूक मनसे महायुतीबरोबर लढवणार का? मनसे नेत्याचं मोठं विधान
महापालिका निवडणूक मनसे महायुतीबरोबर लढवणार का? यासंदर्भात बोलताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं की, "मनसेचा पाठिंबा हा एकनाथ शिंदे यांच्यामुळे थांबला असं म्हणणं योग्य ठरणार नाही. विषय असा आहे की महायुतीच्या ज्या चर्चा सुरु आहेत. त्या शेवटपर्यंत लांबल्या. वेळ कमी होता. त्यामुळे समन्वयाचा अभाव राहिल्याने ती युती होऊ शकली नाही. मात्र, आता येणाऱ्या आगामी महापालिका निवडणुकीसाठी महायुती संदर्भातील चर्चा आतापासून सुरु कराव्यात, अशी भावना मनसेच्या पदाधिकाऱ्यांची आहे. त्यामुळे यावर योग्य तो निर्णय़ राज ठाकरे घेतील", असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलताना म्हटलं.
भंडारा : वाघिणीचे तुकडे करून फेकणे पडले महागात; तिघांना अटक
भंडारा : शिकार करून वाघिणीचे तुकडे करून फेकल्या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. वनविभाग व पोलिसांनी संयुक्तपणे कारवाईत चोवीस तासांत तीन आरोपींना पाचरा गावातून अटक केली आहे.
‘लाडक्या बहिणी’ तुपाशी, ओबीसी विद्यार्थी उपाशी, चार महिन्यांपासून…
नागपूर: महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच ओबीसी आणि भटके विमुक्तांसाठी स्वतंत्र ५२ वसतिगृह सुरू करण्यात आली. येथे ५ हजार २०० विद्यार्थ्यांचा चार महिन्यांपूर्वी प्रवेश निश्चित झाला.
तरुणांनो प्रेम करा, पण…
नागपूर : युवकांमधील व्यसनाधिनता व वाढती गुन्हेगारी याचा परस्परसंबंध असून या भयावह परिस्थितीत तरुणांनी शिक्षण, रोजगार आणि स्वविकासाला प्राधान्य देत कोणत्याही व्यसनाला बळी पडू नये. तरुणांनो प्रेम करा, पण प्रेमात निर्व्यसनीच जोडीदार निवडा असे कळकळीचे आवाहन पोलीस उपअधीक्षक डॉ. अशोक बागुल यांनी केले.
नागपूर, पुणे, मुंबईकरिता स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस
नागपूर : वंदे भारत एक्स्प्रेस ही भारतीय रेल्वेची महत्वाची आणि प्रमुख रेल्वेगाडी असून सर्वत्र या गाडीची मागणी आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासाकरिता स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचे प्रस्तावित आहे.
रस्ते, उड्डाणपुलांमुळे प्रसिद्ध नागपुरात एक रस्ता असाही आहे जो २५ वर्षापासून…
नागपूर : मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांमुळे नागपूर देशभरात चर्चेत आहे. शहराचा एकही असा भाग नाही जेथे रस्ते, पूल किंवा उड्डाणपुलाचे काम सुरू नसेल. वस्ती वर्दळीची असो किंवा दाटीवाटीची. खोदकाम, सिमेंट पिल्लर्सची उभारणी, क्रशर, सिमेंट मिक्सरच्या आवाजाने नागपूरकर त्रस्त झाले आहेत. मात्र याच शहरात एक रस्ता असाही आहे की जो तब्बल २५ वर्षांपासून रखडला आहे.
"मनेसचा विचार संजय राऊतांनी करू नये", अविनाश जाधव यांची संजय राऊत यांच्यावर टीका
संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या मनसेचा वापर बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडण्यासाठी होतो आहे असं म्हटलं आहे. यावर बोलताना अविनाश जाधव म्हणाले की, “शिवसेना संपवण्याचं महाराष्ट्रात सगळ्यात मोठं पाप जर कोणी केलं असेल तर ते संजय राऊत यांनी केलं आहे. २०१९ साली ज्या पद्धतीने अभद्र युती त्या माणसाने केली आणि काँग्रेसबरोबर गेले त्या दिवसापासून शिवसेनेची उतरती कळा सुरू झाली होती. बाळासाहेबांचा पक्ष आणि मराठी माणसाची लाज काढण्याचं काम कोणी केलं असेल तर ते संजय राऊतांनी केलं आहे. त्यामुळे मनेसचा विचार संजय राऊतांनी करू नये. आम्ही पुन्हा उभे राहू, पुन्हा आमच्या ताकतीवर उभे राहू. बाळासाहेबांना देखील उभं राहायाल ३७ वर्ष लागली होती. त्यामुळे आम्हाला काही घाई नाही. संजय राऊतांना सत्तेत बसण्याची, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता बसवण्याची घाई असते, त्यामुळे संजय राऊत हे शिवसेना पक्ष घेऊन डुबतील एवढं नक्की”, असेही अविनाश जाधव म्हणाले.
वांगणीतील घरे नापसंत, प्रकल्प रद्द करण्याची गिरणी कामगारांच्या संघटनांची मागणी, तर शेलूतील घरांच्या किमती सहा लाख करा, मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई : गिरणी कामगारांसाठी शेलू येथे ३० हजार तर वांगणीत ५१ हजार घरे बांधण्यासाठी दोन स्वतंत्र कंत्राटे देण्यात आली आहेत. पण काही गिरणी कामगार संघटनांनी वांगणीतील घरांच्या प्रकल्पास नापसंती दर्शविली आहे. वांगणीचा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी संघटनांनी उचलून धरली आहे.
कोकण किनारपट्टीतील समुद्रावर आता ड्रोनची नजर, परप्रांतिय घुसखोरी आणि एलईडी मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य विभागाचा उपाय
रत्नागिरी : कोकणातील सागरी किनारपट्टीत परप्रांतिय मासेमारी बोटींची होणारी घुसखोरी आणि एलईडी द्वारे होणारी मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य विभागाकडून यावर ड्रोन द्वारे नजर ठेवण्यात येणार आहे.
पुणे: शरद मोहोळ टोळीचा सदस्य विकीला पिस्तुलासह हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
हिंजवडी पोलिसांनी शरद मोहोळ टोळीचा सदस्य असलेल्या विकी दीपक चव्हाण ला पिस्तुलासह बेड्या ठोकल्या आहेत. हिंजवडी पोलिसांनी मेझा नाईन हॉटेल जवळ ही कारवाई केली आहे.
शाकंभरी नवरात्र महोत्सव, दुसर्या माळेला तुळजाभवानी देवीची रथअलंकार महापूजा
तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या शांकभरी नवरात्रोत्सवास मंगळवारी घटस्थापनेने प्रारंभ झाला. नित्योपचार पूजा, धार्मिक विधी व रात्री देवीची छबिना मिरवणूक पार पडल्यानंतर दुसर्या माळेला बुधवारी तुळजाभवानी देवीची रथअलंकार महापूजा बांधण्यात आली होती.
कल्याणमध्ये ट्रकने आई, मुलाला चिरडले; मनसेसह नागरिकांचे रस्ता रोको
कल्याण येथील पश्चिमेतील लालचौकी भागात बुधवारी सकाळी भरधाव वेगात असलेल्या एका ट्रक चालकाने रस्ता ओलांडत असलेल्या महिला आणि तिच्या मुलाला चिरडले.
केसाची जलद गतीने गळती होऊन टक्कल, पाण्यातील नायट्रेटचे प्रमाण वाढणे कारणीभूत!
बुलढाणा : शेगाव तालुक्यातील कमी अधिक सहा गावातील गावकऱ्यांच्या केसाची जलद गतीने गळती होऊन टक्कल पडण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे हजारो आबालवृद्ध गावकरी धास्तावले असून आरोग्य यंत्रणा बुचकळ्यात पडल्या आहे .
एसटी कर्मचाऱ्यांची पी. एफ.ची रक्कम थकली… महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस म्हणते…
नागपूर : एसटी महामंडळाकडून त्यांच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांची वेतनातून कपात केलेली १,१००कोटी रुपयांची रक्कम पी. एफ. ट्रस्टमध्ये भरली गेली नाही. त्यामुळे या सगळ्यांना त्यांच्या पीएफ मध्ये जमा रक्कमेतून अग्रीमची मागणी करणारे २,५०० कर्मचारी ऑक्टोंबर पासून पीएफ अग्रीम रक्कमेच्या प्रतीक्षेत आहे.
‘पाऊल’ अडते कुठे? असुविधांमुळे पादचारी पूल वापराविना; देखभालीकडे महापालिकेचे दुर्लक्ष
पुणे : कोट्यवधी रुपये खर्च करून शहरातील विविध भागांत महापालिकेने उभारलेले पादचारी पूल वापराविना पडून आहेत. अनेक पादचारी पुलांचा वापर नागरिकांकडून केला जात नाही. काही पादचारी पुलांच्या पायऱ्या तुटल्या आहेत. तर, काही पुलांची लिफ्ट बंद अवस्थेत आहे. काही पुलांवर घाणीचे साम्राज्य असून, मद्यपींकडूनही पुलाचा वापर होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
पुणे वर्तुळाकार रस्ता आणि जालना-नांदेड महामार्गाच्या भूमिपूजनाला लवकरच, मुहूर्त उद्या मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीत निर्णयाची शक्यता
मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) महत्त्वाकांक्षी अशा पुणे वर्तुळाकार रस्ता आणि जालना-नांदेड द्रुतगती महामार्ग प्रकल्पाच्या भूमिपुजनाची तारीख निश्चित केली जाण्याची शक्यता आहे. उद्या, गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एमएसआरडीसीच्या प्रकल्पांचा आढावा घेणार आहेत.
डोंबिवलीतील बेकायदा इमारतीचा नियमानुकूलचा प्रस्ताव नगररचना विभागाने फेटाळला; याचिकाकर्त्याची प्रशासनाविरुध्द अवमान याचिकेची तयारी
डोंबिवलीतील ६५ महारेरा प्रकरणातील रहिवासी, बांधकामधारकांनी आपली इमारत नियमानुकूल करावी, यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागाकडे प्रस्ताव दाखल केले आहेत. सविस्तर वाचा
गांजा तस्करांच्या मोटारीचा पोलिसांकडून थरारक पाठलाग; संशयितास पोलीस कोठडी
गांजाची तस्करी करणाऱ्यांचा पाठलाग करुन आडगाव पोलिसांनी २८ किलो गांजा जप्त करत एका संशयिताला ताब्यात घेतले. या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते अधिकारी आणि अंमलदार यांना प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देत गौरविण्यात आले.
Video : पुणे-पाचोरा एसटी बसचा दणदणाट…स्टेअरिंगचा थरथराट…प्रवाशांचा थरकाप…
देखभाल आणि दुरूस्तीकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बससेवा प्रवाशांसह चालकांसाठीही जणूकाही एखाद्या जत्रेतील मौत का कुंवा सारखी झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील बहुसंख्य आगारांच्या बसेस खिळखिळ्या झाल्या आहेत.
ठाणे पालिका मुख्यालयात मनसे पदाधिकारी खेळले फुटबॉल, बोरिवडे मैदान अतिक्रमण मुक्त करण्यासाठी मनसेचे अनोखे आंदोलन
ठाणे : घोडबंदर परिसरात बोरिवडे मैदानात ठेकेदाराकडून करण्यात आलेल्या अतिक्रमणाविरोधात सातत्याने पत्रव्यवहार करूनही कोणतीच कारवाई होत नसल्यामुळे मनसेचे बुधवारी अनोखे आंदोलन केले. पालिका मुख्यालय इमारतीमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी फुटबॉल खेळून आंदोलन केले.
यवतमाळचा विद्यार्थी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत
यवतमाळ : यवतमाळसारख्या शहरात शालेय शिक्षण पूर्ण करून पुणे येथे वकिलीचे शिक्षण घेवून थेट लंडन येथील प्रसिद्ध लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त करत येथील ॲड. प्रणव विवेक देशमुख या विद्यार्थ्याने यवतमाळच्या शिरपेचात मानाच तुरा रोवला.
अकोला : पैशांसाठी लग्न, पोलीस पत्नीचा छळ अन् पती निघाला समलैंगिक….
अकोला : महिला पोलिसाच्या पैशांवर डोळा ठेऊन तिच्याशी लग्न, लग्न झाल्यावर पैसा मिळताच पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ आणि पतीचे पुरुषांसोबत शारीरिक संबंध असल्याचा धक्कादायक प्रकार उघड…
सविस्तर वाचा...
डोंबिवली रेल्वे स्थानकात जाहिरात फलकांमुळे इंडिकेटर दिसत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी
डोंबिवली रेल्वे स्थानकातील स्कायवाॅकवर रेल्वे प्रशासनाच्या परवानगीने काही जाहिरात एजन्सीने आपल्या जाहिरतीचे फलक लावले आहेत. या जाहिरात फलकांमुळे दूरवरून इंडिकेटर दिसत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
कापूस उत्पादकांची परवड ‘सीसीआय’नेही घटवले दर…
अमरावती : राज्यात भारतीय कापूस महामंडळामार्फत (सीसीआय) हमीदराने कापूस खरेदी सुरू असली, तरी ओलाव्याच्या प्रमाणानुसार दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी कायम आहेत. कापसाचा हंगाम सुरू होऊन आता तीन महिने पूर्ण झालेले असताना बाजारात कापसाचे भाव शेतकऱ्यांना अपेक्षित असे नाहीत.