Maharashtra Political News Updates : अलिकडच्या काही दिवसांपासून राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मुख्यमंत्रीपदावरून राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. त्यात बुधवारी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काल झालेल्या पुण्यातल्या सभेत शिवसेनेच्या शिंदे गटासह भारतीय जनता पार्टीवर टीका केली. यावर आता राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. तसेच बुधवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची खासदार अमोल कोल्हे आणि अमृता फडणवीस यांनी मुलाखत घेतली. त्यावरही आज प्रतिक्रिया पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजुला रत्नागिरीतल्या बारसू येथील रिफायनरीला होत असलेला स्थानिकांचा विरोध आणि त्यावरून तापलेलं राजकीय वातावरण आजही पाहायला मिळेल.
Maharashtra News Today : राज्यासह देशातल्या महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकलवर
कर्नाटकमधली आपली सत्ता हातून जाणार असल्याची खात्री भाजपाला झाल्याचं शिवसेनेनं (ठाकरे गट) सामना या त्यांच्या मुखपत्राच्या अग्रलेखात म्हटलं आहे. “त्यामुळेच त्यांनी पुन्हा जातीय-धार्मिक दंगलींचा बागुलबुवा तेथे उभा करण्यास सुरुवात केली आहे. ‘कर्नाटकात काँग्रेस पक्ष सत्तेत आला तर राज्यात घराणेशाहीचे राजकारण पुन्हा जोर धरेल आणि दंगलींमध्ये हे राज्य होरपळून निघेल,’ असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. तेच नव्हे तर भाजपच्या ‘स्टार’ प्रचारकांचा ताफाच त्या ठिकाणी म्हणे प्रचाराचा धुरळा उडवीत आहे, पण तरीही केंद्रीय गृहमंत्र्यांना कानडी जनतेला दंगलींची भीती दाखवावीशी का वाटली?” असा सवाल ठाकरे गटाकडून उपस्थित करण्यात आला आहे.
कोण आहेत अमोल कोल्हेंचे ‘आदर्श मुख्यमंत्री’?
खासदार अमोल कोल्हे यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात बोलताना पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली. त्याचवेळी तेच आदर्श मुख्यमंत्री असल्याचाही अमोल कोल्हेंनी उल्लेख केला. “शिवस्वराज्य यात्रेची संपूर्ण आखणी सुरू असताना मी कायम बघायचो. अनेकदा आम्ही कधी कार्यालयात भेटायचो, कधी साहेबांच्या घरी भेटायचो. एका सुसंस्कृत घरातला तरुण काय असू शकतो, याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे प्रतीक दादा आणि राजवर्धन दादा. यात कुठेही अवाजवी, स्वत:हून काही सांगणं नाही. काही विचारल्याशिवाय स्वत:हून काही बोलणं नाही अशी त्यांची वागणूक राहिली”, असं कोल्हे म्हणाले.